सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्यात तब्येतीची काळजी घेण्याबरोबरच डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. डोळा हा शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. पंचेद्रियांपैकी चक्षु हे इंद्रिय मानवी शरीरातील सर्वात जास्त विकसित इंद्रिय आहे. मेंदूचा भाग जो डोळ्याच्या कार्याचे प्रतिनिधित्व करतो तो इतर 4 इंद्रियांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मेंदूच्या भागापेक्षा क्षेत्रफळाने जास्त आहे. नियमित नेत्र तपासणी गरजेची आहे का? कोणी-कोणी ही नेत्र तपासणी करणे गरजेचे आहे? ही तपासणी कुठे करावी याविषयीची माहिती..
सर्वांना वाचून आश्चर्य वाटेल पण 80 टक्के दृष्टीचा अधूपणा हा टाळण्याजोगा असतो. स्पष्ट व अचूक दृष्टी जीवनाचा दर्जा सुधारु शकते व मानसिक धैर्य देऊ शकते. बऱ्याच वैज्ञानिक चाचण्यांनुसार मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केल्यानंतर व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल झालेले आढळून आले आहेत. आणि म्हणूनच डोळ्यांना काहीही त्रास नसला तरी वर्षातून किमान 1 वेळेला डोळ्यांची तपासणी करणे गरजेचे आहे.
नेत्र तपासणी कोणी करावी?
ज्यांना अगोदरच चष्मा लागलेला आहे, कॉम्प्युटर व तत्सम डिजिटल उपकरणांचा वापर करणाऱ्या व्यक्ती, कॉन्टॅक्ट लेन्स करणाऱ्या व्यक्ती, चाळीशीच्या वर वय असणाऱ्या व्यक्ती, ज्यांना मधूमेह,रक्तदाब, थायरॉईड इत्यादी आजार आहेत, डोळ्याचे आजार- काचबिंदू इत्यादी असलेल्या व्यक्तींनी दर सहा महिन्यांनी डोळ्याची तपासणी करुन घ्यावी.
मधुमेह आजारात घ्यावयाची डोळ्यांची काळजी
मधुमेहाच्या तीव्रतेनुसार डोळ्यांची वारंवार तपासणी करावी. रक्तातील साखरेची पातळी नॉर्मल असली तरी मधुमेहाच्या कालावधीनुसार डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये बदल घडून येतात. रक्तातील साखरेची पातळी सामान्य असूनही डोळ्यांच्या पडद्यातील आजार उद्भवू शकतात. रक्तदाब व थायरॉईड असणाऱ्या व्यक्तींनीही वेळच्या वेळी डोळे तपासून घ्यावेत.
काचबिंदू या आजाराचे निदान बऱ्याच वेळेला नेत्र तज्ञांच्या तपासणीनंतरच शक्य होते. आजारात डोळ्यांचा दाब वाढून मज्जारज्जूंना इजा होते व ती परत भरुन निघत नाही. रुग्णांची नजर चांगली असली तरी दृष्टीचा आवाका कमी होऊन फक्त मध्यवर्ती गोल भागातीलच दृष्टी राहते.
नेत्रतपासणी कुठे करावी ?
नेत्र रुग्णालयात, नेत्रतज्ञांकडूनच डोळ्यांची तपासणी करावी. फक्त ऑप्टिशियन कडे जाऊन चष्म्याचा नंबर तपासून घेणे म्हणजे नेत्र तपासणी झाली हा समज चुकीचा आहे. चष्म्याच्या नंबर व्यतिरिक्त नेत्रतज्ञ इतरही तपासणी करतात जसे की, डोळ्यांचा दाब, पडद्याची, पापण्यांची व डोळ्यांच्या इतर भागांची सूक्ष्म दर्शकाद्वारे तपासणी तज्ञांकडून केली जाते.
ब-याच वेळा कळत-नकळत पडलेल्या मानसिक ताणामुळे दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. वरवर डोळ्यांमध्ये काहीही आजार असला तरीही अशावेळी नेत्रतज्ञांनाही मानसिक समुपदेशन करावे लागते. अनेकजण डोळा लाल झाल्यावर किंवा जंतुसंसर्ग झाल्यावर रुग्ण औषध विक्रेत्यांकडून ड्रॉप विकत घेतात. असे ड्रॉप वारंवार वापरल्याने त्याचा दूष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रुग्णांनी नेत्रतज्ञांच्या सल्ल्याशिवाय स्वत:चे स्वत: उपचार करु नयेत.
यानिमित्ताने हेच सांगावेसे वाटते की, डोळा हा सर्वात नाजूक व महत्त्वाचा अवयव आहे. सर्वांनी काळजी घेऊन नेत्रतज्ञांकडूनच वेळेत नेत्र तपासणी करावी. परस्पर औषध विक्रेत्यांकडून औषधे न घेता तज्ञांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत.
डॉ. ऋजुता माचवे,
नेत्ररोग तज्ञ