मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भागतसिंह कोश्यारी यांना खरमरीत भाषेत लिहिलेल्या पत्रावरून राजकीय गदारोळ आणि आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाण पत्राची गरज नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रामध्ये राज्यपालांना सुनावल्यानंतर भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. तुम्ही राज्यात सर्व काही सुरू केलं, दारूची दुकानही सुरू केलीत. पण मंदिरे खुली केली नाहीत. त्यामुळे तुम्हालाच हिंदुत्व शिकण्याची गरज आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे तर भाजपचे दुसरे नेते किरीट सोमय्या यांनी वैफल्यग्रस्त झालेल्या मुख्यमंत्री ठाकरेंना राज्यपालांसारख्या वयस्कर व्यक्तीशी असे बोलणे शोभते का? असा सवाल करत निशाण साधला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रावरून चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचा हा हेकेखोरपणा असल्याचे म्हटले आहे. माणसाला जशी भूक लागते तशीच त्याला मन:शांतीचीही गरज लागते. भारतातील लोक पूजा-अर्चा करतात म्हणून देशातील आत्महत्यांचं प्रमाण कमी झालं असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी खूप मोठी तडजोड केली.कोरोनामुळे राज्यातील सर्व परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. ही सर्व परिस्थिती हाताळताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा गोंधळ उडत आहे. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळेच राज्यपालांच्या पत्राला उत्तर देताना त्यांचा तोल गेला. मला मुख्यमंत्र्यांविषयी सहानुभूती आहे. मात्र, राज्यपालांसारख्या वयस्कर व्यक्तीशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अहंकारी भाषेचा वापर करणे, कितपत योग्य आहे, असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे यांनी पत्रात मांडलेले महत्त्वाचे 5 मुद्दे
1) करोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सद्ध्या राज्यात ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी ‘ हि मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सुचना देणे , जनजागृती करणे , आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी व उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स , आंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल.
2) माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणार्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही.
3) असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि नउघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का?
4) मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही . इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे.
5) गेल्या ३ महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील ३ पत्रे आपण सोबत जोडली आहेत. हि तिनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभिर्याने विचार करत असून सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल हि खात्री मी आपल्याला देतो.