मुंबई-मुंबईती आरे परिसरातील मेट्रोची कारशेड हलविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यावरून भाजपने राज्य सरकारला लक्ष्य केले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच राष्ट्रीय कार्यक्रम पुढे नेत आहेत असे वक्तव्य केले आहे. विरोध आणि टीका करण्यापेक्षा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत करायला हवं असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्य सरकारने मेट्रो-३ प्रकल्पाची आरे परिसरातील नियोजित कारशेड कांजूरला हलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी पर्यावरण रक्षणाची भाषा करतात. त्यांच्या कार्यकाळात गंगा शुद्धीकरण, सेव्ह टायगर आणि जंगल वाचवण्यासाठीचे इतर उपक्रम हाती घेण्यात आले.
त्यामुळे आरेतील जंगल वाचवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकप्रकारे पंतप्रधान मोदी यांचाच राष्ट्रीय कार्यक्रम पुढे नेला आहे. उद्धव ठाकरे यांनी आरेतील जंगलाचे क्षेत्र 600 एकरावरुन 800 एकरापर्यंत वाढवले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे, असे संजय राऊत यांनी सांगितले.