सूर्यनमस्कार : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर ७५ कोटी सूर्यनमस्कार महायज्ञ


सूर्यदेवा, सूर्यदेवा तुला नमस्कार

तूच स्वामी आकाशाचा, तूच दिवाकर”

या उक्तीप्रमाणे या चराचराला जगवणारा आणि जागवणारा हा सूर्य खगोलशास्त्रीय दृष्ट्या ग्रह असला तरी पृथ्वीवरील सृष्टीसाठी ती एक देवताच आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सर्व सण, व्रतवैकल्ये यातून आपण निसर्गाची पूजा करतोच परंतु त्याचे संवर्धनही करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या ऋषीमुनींच्या तपश्चर्येतून आपल्याला वेद, उपनिषदे यांचा अमूल्य ठेवा मिळाला आहे. त्याचप्रमाणे  योगसाधना हे शारीरिक व अध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यंत प्रभावी असे साधन आपल्या संस्कृतीने आपल्याला दिले आहे. सूर्यनमस्कार हा त्यातीलच एक भाग. सूर्याच्या उपासनेतून स्वतःचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य वाढविण्यासाठी सूर्यनमस्कार ही आपल्याला मिळालेली दैवी देणगीच म्हणावी लागेल. सर्व सृष्टीचा स्वामी असणाऱ्या या सूर्याच्या साक्षीने त्याचे स्मरण करून मंत्र म्हणून व्यायाम करणे ही संकल्पनाच किती संस्कारक्षम व प्रभावी आहे. सूर्य नमस्कार म्हणजे सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी. उगवत्या किंवा मावळत्या सूर्याची किरणे अंगावर घेत सूर्यनमस्कार करावेत. सूर्यनमस्कार करताना ॐ ऱ्हाम मित्राय नमः  मंत्र म्हणून सूर्य नमस्कार घालावा.

अधिक वाचा  एमपीएससीच्या विद्यार्थ्याची विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या

ॐ रवये नमः, ॐ सूर्याय नमः, ॐ भानवे नमः,

ॐ खगाय नमः, ॐ पूष्णै नमः, ॐ हिरण्यगर्भाय नमः,

ॐ मरिचये नमः, ॐ आदित्याय नमः, ॐ सवित्रे नमः,

ॐ अर्काय नमः, ॐ भास्कराय नमः, आणि

ॐ सवितृसूर्यनारायणाय नमः अशाप्रकारे  मंत्र म्हणून तेरा सूर्यनमस्कार घालावेत.

मंत्र उच्चारांमुळे आपली एकाग्रता वाढतेच शिवाय या मंत्रांचा संबंध आपल्या शरीरातील चक्रांशी देखील आहे. सूर्यनमस्कारातील प्रत्येक स्थिती एक आसन आहे. प्रणामासन किंवा नमस्कारासन, हस्त उत्तासन, पादहस्तासन, अश्‍वसंचालनासन, पर्वतासन, अष्टांगनमस्कार, भुजंगासन, पर्वतासन, हस्त उत्तासन, प्रणामासन अशी त्यांची अनुक्रमे नावे आहेत.

प्रत्येक आसनस्थिती नुसार श्वास धरून ठेवणे, रोखणे किंवा श्वास सोडणे असे श्वासाचे व्यायामप्रकार देखील करावे लागतात, त्यामुळे खऱ्या अर्थाने सूर्यनमस्कार हा सर्वांगसुंदर असा व्यायाम प्रकार आहे.

अधिक वाचा  ‘सत्यमेव जयते’च्या ब्रीद शिवाय राष्ट्रीय बोध-चिन्ह ‘अशोक स्तंभ’ हे अपूर्ण’ प्रदर्शीत…! - गोपाळदादा तिवारी

सर्वांग सुंदर व्यायाम

सूर्यनमस्कारामुळे शरीरातील सर्व अवयव व सर्व सांध्यांना व्यायाम होतो. तसेच आपल्या शरीराला लवचिकपणा प्राप्त होतो. सूर्यनमस्कारामुळे निरोगी व दीर्घायुष्य प्राप्त होतो. आयुष्य, बल व बुद्धीचा विकास होतो. शरीरातील जडत्व कमी होते. अतिशय कमी जागेत करता येण्याजोगा व  कोणत्याही साहित्याशिवाय करता येणारा असा हा व्यायामप्रकार आहे. लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत कोणीही स्वतःच्या शारीरिक कुवतीनुसार कितीही सूर्यनमस्कार रोज घालू शकतो. भारतीय कालगणनेनुसार माघ महिन्यातील शुक्ल सप्तमी म्हणजेच रथ सप्तमी ही सूर्य देवतेची जयंती मानली जाते, तसेच हा दिवस जागतिक सूर्यनमस्कार दिवस म्हणून साजरा केला जातो.

यावर्षी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर ७५ कोटी सूर्यनमस्कार महायज्ञ सुरू आहे. चला, तर मग या रथसप्तमीच्या निमित्ताने नित्य नियमित सूर्यनमस्कार घालण्यास प्रारंभ करू!

अधिक वाचा  पटेलांनी लोक पक्ष सोडून का जातात यावर पुस्तक लिहावे- शरद पवार

सौ. स्वाती यादव

उपशिक्षिका

नवीन मराठी शाळा, पुणे

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love