वारकरी संप्रदायातील आदरणीय कीर्तनकार विष्णुबुवा जोग महाराज

महाराष्ट्र लेख
Spread the love

भागवत  धर्माचा प्रसार करणारे विष्णूबुवा जोग महाराज यांना विनम्र अभिवादन

महाराष्ट्र भूमी संत भूमी म्हणून ओळखली  जाते,  सबंध विश्वभर पसरलेला भगवद प्राप्तीच्या अन्य पथांवर चालणारे अनेक पथिक  समाजास प्रबोधन करत राहिले आहेत.  अगदीच साध्या भाषेत सांगायचे म्हणजे सर्व अध्यात्म जगात जेवढे संत झाले नाहीत तेवढे  एवढ्याश्या महाराष्ट्रात  झाले हे विशेष.

‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले’  आणि या आर्ततेपोटी विश्वात्मक देवाकडे सर्व विश्वासाठी, सर्व प्राणीमात्रांचे कल्याण व्हावे यासाठी प्रार्थना करणारे १३ व्या  शतकातील क्रांतदर्शी विश्व संत म्हणजे अलंकापुर निवासी श्री संत ज्ञानेश्वर महाराज हे होत. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या अवतार कार्याचा विचार करत असताना महत्त्वाचा भाग म्हणजे श्री ज्ञानेश्वरांनी १३ व्या शतकातील महाराष्ट्रातील सर्व संतांना एकत्रित करून नव्याने भक्तीचा विचार महाराष्ट्र भूमीतून सर्व जगतास  सांगितला. मेळवावी मांदी वैष्णवांची ! या पंक्तीतून हे सिद्ध होते. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या या नवपर्वाने महाराष्ट्रातील जनता भक्ती ज्ञानात न्हावून निघाली. भक्तीच्या  वाटा -आबाल वृद्धांसाठी खुल्या झाल्या आणि श्री  संत नामदेव महाराजांनी हरीकीर्तनाच्या  द्वारे ज्ञानाचा नंदादिप प्रत्येकाच्या घरातच, नव्हे तर हृदयाच्या गाभाऱ्यात पेटवला. ‘नाचू कीर्तनाचे रंगी l ज्ञानदीप लावू जगी l याच श्री संत नामदेव महाराजांच्या विचारांचा मागोवा घेत, नंतरच्या काळातही कीर्तनाच्या माध्यमातून अनेक सत्पुरुषांनी   समस्त  संत मांदियाळीचा  विचार  कायम तेवत ठेवला,  हे विसरता येणार नाही.

महाराष्ट्रातील भक्ती परंपरेचा श्रेष्ठमानदंड  म्हणजे वारकरी संप्रदाय होय. कीर्तन हे वारकरी संप्रदायाचे मुख्य उपासना माध्यम होय. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी या भागवत संप्रदायाची पायाभरणी केली. ‘ज्ञानदेवे रचिला पाया !’ या अभंगाद्वारे माऊलींच्या  तसेच सर्व संतांच्या कार्याची प्रचिती  येते.

याच परंपरेतील थोर सत्पुरूष म्हणजे स्वानंदसुख  निवासी सद्गुरु  विष्णुबुवा जोग महाराज होत. जोग महाराजांच्या कार्याचा आलेखही असाच वर वर जाणारा दिसतो. १९ व्या शतकातील महाराष्ट्रातील क्रांतिकारी सत्पुरुषांपैकी महत्त्वाचे नाव म्हणजे ‘विष्णु नरसिंह जोग’ होय. जोग महाराजांचे समकालीन असणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याशी जोग महाराजांचा परिचय झाला. आळंदीस  श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत देऊन कीर्तन – प्रवचन करण्याची आज्ञा जोग महाराजांना दिल्यामुळे जोग महाराज त्या काळातील वारकरी संप्रदायातील सर्वमान्य आदरणीय कीर्तनकार होते. याचा फायदा लोकमान्य टिळकांच्या स्वदेशीचा विचार खेडोपाड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाला. जोग महाराजांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. टिळकांच्या कार्यातील महत्वावचे प्रचाराचे कार्य जोग महाराजांच्यामुळे अगदी सुलभ झाले. एकीकडे कीर्तनाच्या माध्यमाद्वारे स्वदेशीचा जागर खेडोपाड्यापर्यंत होत होता आणि दुसरीकडे टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती उत्सवास तालमीतील तरुण मल्ल, समाजातील  दृढ  विचारसरणीला  निष्णात  करण्यासाठी संरक्षण म्हणून कार्यरत होता. ‘भक्ती आणि शक्ती’ चा अजोड संयोग म्हणजे सद्गुरू जोग महाराजांचे हे कार्य अतुलनीय आहे.

सही करण्यासाठी लागणारे २ मिनिट हे केवळ लौकिक दर्शन आहे आणि संतांच्या साहित्यावर भाष्य करणे हा सद्गुरू जोग महाराजांच्या अलैकिक दर्शनाचा  परिचय आहे.

जोग महाराजांच्या चरित्राचा विचार करता आणि एक महत्त्वाचं बाब म्हणजे ‘वारकरी शिक्षण संस्थेची’ स्थापना होय. संत वांड्मयाचा परिचय समाजातील शेवटच्या घटकास व्हावा यासाठी प्रचारकांची मोठी फळी निर्माण व्हावी यासाठी केलेला सद्विचार म्हणजे वारकरी शिक्षण संस्था होय.

सकळांसी येथे आहे अधिकार l

याचा अवलंब करून सर्वांसाठी या शिक्षण संस्थेचीद्वारं खुले करण्यात आली आणि समाजातील सर्व स्तरांतील घटक या अध्यात्मज्ञान मंदिरात शिकू लागली. या संस्थेची स्थापना करून समाजातील त्या काळातील शहाण्या म्हणणाऱ्या एका वर्गाने मोठ्या प्रमाणात जोग महाराजांच्या कार्याची हेटाळणी केली. हेटाळणी म्हणण्याऐवजी निंदाच केली, ती चक्क ‘तेल्या तांबोळ्यांचे महंत म्हणूनच !’ यास न जुमानता जोग महाराजांनी आपले हे कार्य सहकाऱ्यांसोबत  अधिक जोमाने सुरूच ठेवले आणि प्रबोधनाचे कार्य करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण स्वीकारून.

धर्माचे पाळन |  करणे  पाखंड खंडन l

हेचि आम्हा करणे काम l बीज वाढवावे नाम ll

हे ब्रीद स्वीकारून  १०२ वर्षांपूर्वी  जोग महाराजांनी स्थापन केलेली वारकरी शिक्षण संस्था अखंड ज्ञानप्रसाराचा नंदादीप तेववीत आहे. वारकरी शिक्षण संस्थेच्या  शताब्दी पूर्तीचे यश म्हणजे जर काही असेल तर ते म्हणजे सद्गुरू जोग महाराज स्वतः हे चैतन्य स्वरूपाने हे कार्य करवून घेत आहेत.

फेब्रुवारी २०२० मध्ये सद्गुरु जोग महाराजांची स्मृती शताब्दी मोठ्या उत्साहाने जगभर साजरी झाली.याच स्मृती शताब्दी सांगता समारोहाच्या उत्सवात संबोधित करताना रा.स्व. संघाचे  सरसंघचालक  मोहनजी भागवत यांच्या वक्तव्याचं स्मरण होतं.  त्यांनी आपल्या भाषणात बोलताना ‘स्वानंद सुखनिवासी असणारे सद्गुरु जोग महाराज हे आपल्यातून गेले नाहीत, तर ते वारकरी शिक्षण संस्थेच्या रूपाने अखंड आपल्या सोबतच आहे आणि राहतील.’  संपूर्ण शतकभर जोग महाराजांनी स्वानंदाचा शोध कसा घ्यावयाचा आणि स्वानंदाच्या सुखात कसा निवास करायचा याची शाळाच सुरु केली आणि अनेक साधक या स्वानंदाचा अनुभव सुखनिवासी झाले. आणि याचा पुरावा म्हणजे वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व  पूर्वसुरी मंडळी होय.

सद्गुरू जोग महाराज यांचे स्वानंद विचार जगतास कायम सुख देत राहतील हे नि:संशय

उल्हास महाराज सूर्यवंशी

 अध्यापक. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी.  किर्तन प्रवचन व्दारा समाज प्रबोधन

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *