माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची तब्बल सहा तास चौकशी

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पुणे–कोरेगाव भीमा येथील हिंसाचार प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगासमोर पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची तब्बल सहा तासांहून अधिक वेळ चौकशी सुरू होती. दरम्यान, या प्रकरणात आयोग आता कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे, अशी माहिती सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दिली.

१ जानेवारी २०१८  ला कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाजवळ विजय दिवस साजरा करण्यासाठी दलित समाजाचे लोक जमले असताना या कार्यक्रमाला गालबोट लागलं आणि काही हिंसक घटना घडल्या. या घटनांची सुरुवात पुण्याजवळच्या कोरेगाव भीमा, पाबळ आणि शिक्रापूर इथून झाली. या गावांमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनांमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रबंदची हाक दिली होती.

कोरेगाव भीमा येथील हिंसाचारानंतर राज्य सरकारने या प्रकरणी कोलकाता हायकोर्टाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या नेतृत्वाखाली चौकशी आयोग नेमला आहे. या आयोगाकडून सध्या रश्मी शुक्ला यांची साक्ष नोंदवली जात आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनाही समन्स बजावण्यात आला होता. परंतू, ते हजर झाले नाहीत. हिंसाचारावेळी सिंग हे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) या पदावर होते. शुक्ला यांनी मात्र आयोगासमोर हजेरी लावली. तसेच शपथपत्र दाखल करण्यासाठी वेळ मागितला. यासाठी पुणे पोलिसांकडून काही कागदपत्रे मिळणे बाकी असल्याचे यावेळी त्यांनी आयोगापुढे सांगितले होते.

रश्मी शुक्ला यांनी आयोगासमोर पुराव्यांचं प्रतिज्ञापत्र सादर केलं. या चौकशीनंतर रश्मी शुक्ला यांनी प्रसारमाध्यमांशी काहीही बोलण्यास किंवा कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. सरकारी वकील शिशिर हिरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की रश्मी शुक्ला यांनी चौकशीला पूर्ण सहकार्य केलं आहे.

आजच्या चौकशीमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे वकील अॅड. आशिष सातपुते यांनी नांगरे पाटलांना चौकशी कामी साक्ष नोंदवण्यासाठी आयोगासमोर बोलवण्यासाठी आयोगासमोर अर्ज दाखल केला. ही मागणी ग्राह्य धरून मुंबईचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना चौकशीसाठी बोलविले जाणार आहे. मात्र नेमके केव्हा हे स्पष्ट करण्यात आले नाही. कोरेगाव भीमा दंगल घटनेच्या वेळी विश्वास नांगरे पाटील तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक म्‍हणून कार्यरत होते. विश्वास नांगरे पाटील यांच्या पुराव्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे या संदर्भातील आदेश आयोगाकडून देण्यात आले आहेत, असे देखील यावेळी वकील हिरे यांनी सांगितले आहे. दरम्यान, आयोगाचे पुढील कामकाज मुंबई येथे २१ ते २५ फेब्रुवारी दरम्यान सुरू होणार आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *