पुणे- कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत 50.06 टक्के, तर चिंचवड विधानसभेमध्ये 50.47 टक्के इतक्या मतदानाची रविवारी नोंद झाली. मतदारांच्या निरुत्साहामुळे मतदान 50 टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहिले.
दिवंगत भाजपा आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा विधानसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडी व महायुतीने आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याने या पोटनिवडणुकीत मोठी चुरस पहायला मिळाली. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, भाजपाचे हेमंत रासने यांच्यात प्रमुख लढत होत असून, सकाळी 7 ते 9 यादरम्यान 6.5 टक्के, तर 11 पर्यंत 8.25 टक्के मतदानाची नोंद झाली. 11 ते 1 या कालावधीत अनेक नागरिक घराबाहेर पडल्याने टक्केवारी 18. 5 टक्क्यांपर्यंत गेली. त्यानंतर 3 पर्यंत 30.5 टक्के, तर 5 पर्यंत 45.25 टक्के इतके मतदान झाले. तर अंतिमतः 50.06 मतदान झाले.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पाचपर्यंत 41.06 टक्के मतदान झाले. सकाळी सात ते नऊ या कालावधीत केवळ साडेतीन टक्के मतदानाची नोंद झाली, तर नऊ ते अकरापर्यंत 10.45, अकरा ते एक वाजेपर्यंत 20.68 व दुपारी एक ते तीन या वेळेत तीस टक्के मतदान झाले.पाचपर्यंत 41.06 टक्के मतदान नोंदविले गेले. तर सरतेशेवटी 50.47 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली.
चिंचवडमध्ये भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक होत आहे. भाजपाच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे, अपक्ष राहुल कलाटे यांच्यात येथे तिरंगी लढत होत आहे.