एक प्रयत्न शुद्ध मराठीसाठी!!! 

एखादी भाषा 'अभिजात' कशी ठरते?
एखादी भाषा 'अभिजात' कशी ठरते?

मराठी असे आमुची मायबोली ही ओळ अनेक वर्षांपूर्वी लिहिली गेली. त्यापूर्वीही मराठी भाषा अस्तित्वात होतीच! मग हे लिहिण्याचे कारण काय असावे? ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचे विवेचन मराठीतच केले. तीसुद्धा मराठीच! पण आज या ज्ञानेश्वरांच्या भावार्थ दीपिकेतील ओव्या पुन्हा मराठीतच समजून द्याव्या लागतात, याचे एक कारण “भाषा प्रवाही आहे असं म्हटलं जातं” हे असू शकेल. भावार्थ दीपिकेमधील ओव्यांमधे भगवद्गीतेतील भाव आणि त्यामागचा अर्थ स्पष्टपणे विशद केला आहे.

ही तत्कालीन मराठी कालांतराने समजून घेण्याच्या पलीकडे राहिली म्हणून पुन्हा त्या ओव्यांचं स्पष्टीकरण देण्याची वेळ आली. मराठी राजभाषा व्हावी, तिला ‘अभिजात’ दर्जा मिळावा यासाठी काहीजण प्रयत्नशील आहेत ही गोष्ट मराठी बिघडलेली आहे हे तर स्पष्ट करत नाही ना? कारण आज आपण जी मराठी वाचतो, ऐकतो किंवा बोलतो ही मराठी शुद्ध रूपातली आहे का? दृक्-श्राव्य आणि लिखित माध्यमातून जी मराठी आपल्यापुढे येते ती भाषाशास्त्राच्या दृष्टीने शुद्ध आहे का?

अधिक वाचा  कृषीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’चा शिक्का -नव्या वादाला फुटले तोंड

याला कारण मराठीची शुद्ध वाक्यरचना “कर्ता कर्म- क्रियायद, विशेषण-विशेष या क्रमाने केली जाणे” अशा प्रकारची असावी. वर्तमानपत्रातल्या बातम्यांच्या शीर्षकातलं उदाहरण घेऊ – “…ने खुपसला पाठीत खंजीर, “रोजच्या वापरात खा मीठ आयोडीनयुक्त” अशी वाक्यरचना मराठी भाषेला गढूळ करते. अशा नव्या पद्धतीच्या नाक्यरचनेचं मूळ कदाचित वृतपत्रे किंवा वृत्तवाहिन्यांमधील अ-मराठी, किंवा मराठीची सखोल जाण नसणाऱ्या कॉपीरायटर्स कडून, इंग्रजी वाक्यांचे मराठीकरण यामध्ये असू शकेल. यावर प्रतिवाद करणारे “त्यात काय एवढं, अर्थ समजला ना, झालं” असं म्हणतीलही. इंग्रजीचाच विचार केला तर त्यांच्या व्याकरणाच्या नियमाप्रमाणे तो कर्ता- क्रियापद. कर्म या क्रमाने वाक्यरचना करतात. म्हणजेच ते ते शब्द आपली जागा सोडत नाहीत. He went to school ऐवजी, कधीही He to school went अशी वाक्यरचना कुठल्याही इंग्रजीमधे मिळत नाही. आपल्याकडचा हा स्थानबदल म्हणजेच भाषेबाबतचा निष्काळजीपणा असं म्हणावंसं वाटतं.

हे झालं गद्याच्या बाबतीत. पद्याच्या बाबतीत तर हे प्रकर्षानं जाणवतं. जुन्या काळच्या मराठीमधील काव्यरचना छंदबद्ध होत्या. अक्षरगणवृत्ते, मात्रावृत्ते हा जुन्या काव्याचा आधार होता. काव्यप्रकारातल्या त्या काळातल्या रचना “गेय” स्वरूपातल्या होत्या. एका विशिष्ट तालात त्या म्हणता येत होत्या, हे त्यातले एक कारण होतंच, पण दुसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे त्या आशयगर्भ रचना होत्या. सध्याच्या काव्यामध्ये निरर्थक शब्दांचा भरणा आपणास सगळीकडेच आढळतो. मधल्या काळात छंदबद्ध कवितेचे नवकाव्यामधे रूपांतर झाले. त्यातला सर्वात भीषण प्रकार म्हणजे एखादी गद्य ओळ तुकड्यातुकड्याने एकाखाली एका रेषेवर लिहिली की झालं नवकाव्य! (याचं समर्थन पुन्हा त्याच शब्दात – आशय कळला किंवा भावना पोहोचल्या)

अधिक वाचा  नेमाडे ज्या पद्धतीने औरंगजेबाचे उदात्तीकरण करत आहेत ते चुकीचे आहे

मग प्रश्न असा उपस्थित होतो की ही दैन्यावस्था दूर करण्यासाठी काय करायला हवं!

तर सर्वप्रथम सर्वच प्रसारमाध्यमांमधून भाषाशुद्धी ही “चळवळ” स्वरूपात केली जावी. कितीही आकर्षक, दिलखेचक, नेत्रदीपक बातम्या असतील किंवा ग्राहकवर्गावर बिंबवण्यासाठी काही गोष्टी विशेष स्वरूपात (हायलाईट) मांडायच्या असतील, त्यामधे भाषेच्या व्याकरणाची मोडतोड होणार नाही याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. वरच्याच गोष्टींचं उदाहरण घेतले, तर “….ने पाठीत खंजीर खुपसला” किंवा “रोजच्या वापरात आयोडीनयुक्त मीठ खा’ अशा स्वरूपात सादर होणं आवश्यक आहे. बोलीभाषेमधे स्थानानुसार फरक पडतो. परंतु लिखाणात प्रमाणभाषेचा तिच्या व्याकरणाचा योग्य रीतीने उपयोग करणं आवश्यक आहे.

दुसरा महत्वाचा भाग म्हणजे शालेय जीवनापासूनच भाषा जनन-संवर्धन याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अर्थात यासाठी मुळात शिक्षकांच्या अंगी या गोष्टी असणं आणि नंतर त्या विद्यार्थांमधे बिंबवणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पालकांनीसुद्धा आपल्या मुलांच्या मराठीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. सर्वांनी मनापासून प्रयत्न केले तर यास अशक्य काहीच नाही. कारण सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जे करील तयाचे। परंतु तेथे निष्ठेचे। अधिष्ठान पाहिजे॥

अधिक वाचा  नाही म्हणजे नाहीच; उगाच संभ्रम नको - शरद पवार

चला तर मग, आपल्यापैकी प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा उचलू या!

लेखक – सुधीर मधुकर इनामदार, पुणे

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love