कसबा -चिंचवड पोटनिवडणुकीत मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद : सायंकाळी ५ वाजेपर्यंत कसब्यात ४५.२५ टक्के तर चिंचवडमध्ये ४१.०६ टक्के मतदान

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे– कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४५.२५ टक्के मतदान झाले. मतदारांच्या निरुत्साहामुळे टक्का ४५ ते ५० पर्यंतच सीमित राहिला असून, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, भाजपाचे हेमंत रासने यांच्यासह सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले. दरम्यान, काही अपवाद वगळता निवडणूक शांततेत पार पडली.

भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्यात पोटनिवडणूक होत आहे. सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. अनेक नागरिकांचा सकाळीच मतदानाचा हक्क बजावण्याकडे कल दिसला. या काळात बऱ्याच ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसल्या. मात्र दुपारनंतर मतदान संथ गतीने सुरू असल्याचे दृश्य पहायला मिळाले. सकाळी ७ ते ९ यादरम्यान ६.५ टक्के मतदान झाले. त्यानंतर वेग मंदावला.  ११ पर्यंत ८.२५ टक्के मतदानाची नोंद झाली. ११ ते १ या कालावधीत अनेक नागरिक घराबाहेर पडल्याने टक्केवारी १८.५ टक्क्यांपर्यंत गेली. त्यानंतर ३ पर्यंत ३०.५ टक्के, तर ५ पर्यंत ४५.२५ टक्के इतके मतदान झाले.  कसब्यातील जवळपास ७६ मतदान केंद्रांवरील २७० बूथवरती मतदान प्रक्रिया पार पडली. खासदार गिरीश बापट यांनी नाकात नळी व व्हीलचेअर मागे सिलेंडर अशा स्थितीत अहिल्यादेवी शाळा येथे मतदानाचा हक्क बजावला.

भाजपचे उमेदवार  हेमंत रासने यांनी नूमवी शाळा, बाजीराव रस्ता येथे सकाळी मतदान केले, तर मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक व टिळक कुटुंबीय यांनी कन्याशाळा, मंदार लॉज समोर येथे मतदान केले. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर व प्रतिभा धंगेकर यांनी मनपा शाळा क्र.९, कमला नेहरु विदयालय,रविवार पेठ येथे मतदान केले.

मतदारांची पाठ

कसब्याची निवडणूक ही महायुती व महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढविण्याकडे या सर्व पक्षांचा कल होता. मात्र, मतदारांनी निवडणुकीकडे पाठच फिरविल्याचे दिसून आले. सायंकाळी मतदान काहीसे वाढले. तरी अपेक्षित मतदान होऊ शकले नाही.

बिडकर यांच्यावर काँग्रेसचा मारहाणीचा आरोप

दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपा नेते गणेश बिडकर यांच्यावर पैसे वाटपासह मारहाण केल्याचा आरोप केला आहे.  याबाबत गणेश बिडकर आणि कॉंग्रेसकडून एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल  करण्यात आल्या आहेत.

मतदानासाठी ‘ती’ लंडनहून आली पुण्यात                           

 ‘माझे लहानपण पुण्यात गेले, आता मी लंडन येथील मँचेस्टर येथे राहते. आज मतदानासाठी पुण्यात आले आहे. मतदान करणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे ते सर्वांनी बजावले पाहिजे. मतदानाचा हक्क कोणीही गमावू नका, असा संदेश लंडनहून पुण्यात मतदानासाठी आलेल्या अमृता देवकर-महाजन यांनी रविवारी दिला.  देवकर या खास कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी पुण्यात आल्या आहेत. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांनी  आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत होते. त्यांनी यावेळी पुण्यातील विविध आठवणींना उजाळा दिला.

मुक्ता  टिळक यांची उणीव भासली                            

 कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान करताना आम्हाला, आमच्या कुटुंबीयांना मुक्ताची मोठी उणीव भासत आहे. त्या असत्या तर पोटनिवडणूक लागलीच नसती. मात्र, त्यांच्या नसण्याने आम्हाला खूप दुःख होत आहे, अशी खंत दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी रविवारी व्यक्त केली.  सकाळी साडेअकराच्या सुमारास शैलेश टिळक आपल्या कुटुंबीयांसह कन्या शाळा येथे आले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा कुणाल टिळक व अन्य होते.  यावेळी टिळक म्हणाले, मोठ्या मताधिक्याने भाजप यावेळी निवडून येणार आहे. सर्व नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले.  या वेळी त्यांनी मुक्ता टिळक यांच्या आठवणींना उजाळा दिला.

चिंचवड मध्ये मतदानाला अल्प प्रतिसाद :  ४१.०६  टक्के मतदान

चिंचवड मतदार संघातील दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीमध्ये ४१.०६  टक्के मतदान झाले. रविवारी झालेल्या या मतदान प्रक्रियेत निवडणूक रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. येत्या दोन मार्च रोजी या मतमोजणीचा निकाल असून, चिंचवडचा गड कोण जिंकणार हे दोन मार्च रोजी समजणार आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली या पोटनिवडणुकीसाठी २८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मात्र प्रामुख्याने या निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळाली ज्यामध्ये भाजप महा युतीचे उमेदवार अश्विनी जगताप राष्ट्रवादी काँग्रेस कडून महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने लढत आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये ५१० मतदान केंद्रे मतदानासाठी रविवारी सज्ज ठेवण्यात आली होती सकाळच्या सत्रा मध्ये मतदानाला अतिशय अल्प प्रतिसाद मिळाला. सात ते नऊ या कालावधीत केवळ साडेतीन टक्के मतदानाची नोंद झाली तर नऊ ते अकरा पर्यंत १०.४५ टक्के मतदान झाले त्यानंतर अकरा ते एक वाजेपर्यंत 20.68% मतदानासाठी नागरिक आले असल्याची नोंद झाली. दुपारी एक ते तीन या वेळेत तीस टक्के मतदान झाले.

 निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या अश्विनी जगताप नाना काटे आणि राहुल कलाटे या तिन्ही उमेदवारांनी आपल्या परिवारासहित सकाळीच मतदान केले. अश्विनी जगताप यांनी पिंपळे गुरव येथील  मतदान केंद्रावर मतदान केले.नाना काटे यांनी पिंपळे सौदागर या मतदान केंद्रावर आपले मत नोंदवले.तर राहुल कलाटे यांनी वाकड येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *