नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—जगामध्ये थैमान घातलेल्या कोरोनाला अटकाव करण्यासाठी जगभरात लस निर्मितीसाठी कसोशीने प्रयत्न आणि संशोधन सुरु आहे. अनेक देशांमध्ये आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांनाही सुरुवात झाली आहे. भारतातही तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना सुरुवात झाली आहे. शेवटच्या टप्प्यातील चाचण्यांसाठी हजारो लोकांना लस देण्यात आली आहे. अनेक देशांमध्ये मंत्र्यांनीही लसीचा डोस घेतला आहे. यात संयुक्त अरब अमिराती (युएई) UAE देखील समाविष्ट आहे. शनिवारी युएईचे आरोग्यमंत्री अब्दुल रहमान बिन मोहम्मद अल ओवैस यांनाही कोरोनाच्या लसीचा डोस घेतला. त्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्यांनी घेतलेली लस ही सुरक्षित व प्रभावी आहेत आणि लसीच्या क्लिनिकल चाचणीचे सकारात्मक परिणाम उत्साहवर्धक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. खरं तर, अलीकडेच युएईच्या आरोग्य मंत्रालयाने पहिल्यांदा आरोग्य कर्मचार्यांसारख्या उच्च-जोखमीच्या लोकांना लस देण्याची परवानगी दिली होती.
युएईच्या आरोग्यमंत्र्यांना देण्यात आलेली लस ही चीनच्या सिनोफार्म कंपनीने विकसित केली आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी यूएईमध्ये सुरू आहे, ज्यामध्ये 120 देशांमधून 31,000 स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.
माध्यमांच्या अहवालानुसार ज्या लोकांना लस दिली गेली आहे त्यांच्या घशात खवखव झाल्याची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. या व्यतिरिक्त, लस घेणाऱ्यांमध्ये सामान्य हंगामी फ्लूसारखी लक्षणे आढळून आली आहेत. संयुक्त अरब अमिरातीमधील लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे मुख्य अन्वेषक डॉ. नवल अल काबी यांच्या म्हणण्यानुसार ही लस ज्यांनी घेतली आहे त्यांच्यामध्ये जास्त गंभीर दुष्परिणाम झाल्याचे आढळून आले नाही.
सिनोफर्म कंपनीच्या म्हणण्यानुसार, लसीच्या पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील चाचण्यांमध्येही कोणतेच दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत. ग्लोबल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत कंपनीचे अध्यक्ष लिउ जिंगझेन यांनी म्हटले आहे की त्यांनी स्वत: या लसीचे दोन डोस घेतले आहेत आणि आतापर्यंत त्याचे कोणतेही दुष्परिणाम झाल्याचे त्यांना जाणवले नाही.
ही लस कधी उपलब्ध होणार आणि किंमत काय असणार?
सिनोफार्मची ही लस डिसेंबरपर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे. अहवालानुसार या लसीच्या दोन डोसची किंमत 1000 युआन म्हणजेच सुमारे 10,700 रुपये असेल.
भारताचे आरोग्यमंत्री लसीचा पहिला डोस घेणार का?
भारताचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोशल मीडियावरील रविवारच्या संवाद मंचावर आपल्या अनुयायांशी संवाद साधताना म्हटले आहे की, लोकांना जर सरकार, वैज्ञानिक आणि लसीच्या संबंधित वैज्ञानिक प्रक्रियेबद्दल थोडीही शंका असेल तर ही शंका दूर करण्यासाठी आवश्यकता असल्यास, ते प्रथम लसीचा डोस घेतील