पुणे – पुणे जिल्हयात घरफोड्या करणारे आणि खुनासह दरोडा व घरफोडी चोरीचे तब्बल १९ गुन्हे दाखल असलेले दोघे सराईत अट्टल चोरट्यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने जेरबंद केले आहे. पोलिस तपसामध्ये घरफोडीचे ११ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून १३ तोळे ८ ग्रॅम सोन्याचे दागिने,९ तोळे ४ ग्रॅम चांदीचे दागिने व एक गॅस सिलेंडर असा किं. ५,३७,६००/- रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
अजय राजू अवचिते (वय २७ वर्षे रा.आलेगाव पागा, ता.शिरुर जि.पुणे) व त्याचा सोबतचा साथीदार गणेश उर्फ ठोम्या गौतम भोसले (वय २७ वर्षे आलेगाव पागा, ता.शिरुर जि.पुणे) अशी या दरोडेखोरांची नवे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक २६/३/२०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ०१.०० वा. चे दरम्यान भिवरी ता.पुरंदर गावाच्या हद्दीत फिर्यादी सोपान मारुती भिसे (वय ५० रा.भिवरी ता.पुरंदर जि.पुणे) हे घराला कुलूप लावून बाहेर गेलेले असताना बंद घराचे कुलुप कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडुन घरामध्ये प्रवेश करुन कपाटामधील ठेवलेले सुमार १४ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम १०,०००/- असा एकूण ५,९०,०००/- (पाच लाख नव्वद हजार) रुपयाचा ऐवज चोरुन नेलेला होता. त्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत करण्याबाबत पुणे जिल्हयाचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेलया पथकाने तपास सुरु केला. घटनास्थळी भेट देवून गुन्हयाची माहिती काढून तपास करीत असताना प्राप्त झालेल्या सीसी टीव्ही फुटेजवरुन हा गुन्हा हा यापूर्वीचा रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय अवचिते यानेच केला असल्याची खात्री पोलिसांची झाली. त्यावरुन आरोपी अजय अवचिते याचे राहण्याच्या ठिकाणची माहिती काढून ढवळगाव ता.अहमदनगर, आलेगाव पागा ता.शिरुर, तांदूळवाडी ता.बारामती, खेंगरेवाडी ता.पुरंधर, म्हाडा कॉलनी सासवड, लोहियानगर पुणे, चिंचवड, घोरपडी, कोरेगाव पार्क पुणे या ठिकाणी जावून त्याचा शोध घेतला परंतु तो मिळून येत नव्हता. गुन्हे शाखेच्या पथकास आरोपी अजय अवचिते व त्याचा एक साथीदार सासवड ता.पुरंदर येथे येणार असल्याची बातमी कळल्यानंतर पोलिसांनी वेषांतर करून त्या ठिकाणी जाऊन व सापळा रचून वरील दोघांना जेरबंद केले.
कसे करायचे चोरी?
आरोपींकडे अधिक चौकशी केली असता अजय अवचिते याने त्याचा साथीदार मेहुणा गणेश उर्फ ठोम्या गौतम भोसले व पत्नी सिमा अजय अवचिते दोघे रा.आलेगाव पागा, ता.शिरुर जि.पुणे असे तिघे मिळून घरफोडया चो-या करण्यासाठी जायचे व पत्नी सिमा अवचिते ही चोरी करतेवेळी टेहळणीसाठी थांबायची असे सांगितले आहे. तसेच तिघे आरोपींनी एकत्र मिळून दौंड, कोडीत, भिवरी, सासवड जयदिप कार्यालयजवळ व म्हाडा कॉलनी, फोंडवाडा, किरकटवाडी, भिगवण, बोरीपार्धी, नगर रोड एल अँड टी फाटा गॅस गोडावूनचे जवळ या ठिकाणी बंद घराचे कूलूप कडीकोयंडा तोडून चोरी केल्याचे तसेच बजरंगवाडी येथे चोरी करण्यासाठी कूलूप तोडले परंतु लोक जागे झालेने पळून गेलेबाबत सांगितले आहे. त्याबाबत पोलीस स्टेशनकडील रेकॉर्डची पडताळणी केली असता एकूण ११ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
या आरोपींकडून घरफोडी चोरीचे वरीलप्रमाणे एकूण ११ गुन्हे उघडकीस आणून १३ तोळे ८ ग्रॅम सोन्याचे दागिने व ९ तोळे ४ ग्रॅम चांदीचे दागिने व एक गॅस सिलेंडर असा किं. ५,३७,६००/- रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत अट्टल गुन्हेगार असून त्यांचेवर यापूर्वी हडपसर, लोणीकाळभोर, जेजूरी , बारामती शहर, बारामती तालुका, सासवड, भिगवण, खेड, यवत, शिरुर या पोलीस स्टेशनला खुनासह दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी इत्यादी प्रकारचे एकूण १९ गुन्हे दाखल आहेत.आरोपी गणेश उर्फ ठोम्या गौतम भोसले याचेवर यापूर्वी एकूण ८ गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी सासवड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
ही कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती अपर पोलिस अधिक्षक श्री.मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट,सहा.पो.नि. सचिन काळे, पोहवा. चंद्रकांत झेंडे,पोहवा. महेश गायकवाड, पोहवा. निलेश कदम, पोहवा. सचिन गायकवाड, पोहवा. सुभाष राऊत, पो.ना. गुरू गायकवाड, पो.ना. सागर चंद्रशेखर,चापोहवा. काशिनाथ राजापुरे यांनी केलेली आहे.