सावित्रीबाई फुले यांच्या दुर्मिळ पहिल्या अल्पचरित्राची प्रत मिळाली: पुणे विद्यापीठाच्या वतीने उद्या होणार पुनर्प्रकाशन

शिक्षण
Spread the love

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा इतिहास विभाग आणि महात्मा फुले अध्यासन यांच्या वतीने रविवारी महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांचे दुर्मिळ अल्पचरित्र Rare first short biography of Savitribai Phule पुनर्प्रकाशित करण्यात येणार आहे. या बरोबरच अध्यासनातर्फे आणखी २ पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. आतापर्यंत विद्यापीठाच्या मुद्रणालयाकडून निवडक १६ पुस्तकांचे पुनर्प्रकाशन करण्यात आले असून ५०० पेक्षा अधिक पुस्तकांची विक्री करण्यात आली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इतिहास विभागाच्या प्रमुख श्रद्धा कुंभोजकर यांच्या संशोधन प्रकल्पातील संशोधक बापूराव घुंगरगांवकर यांना शांताबाई बनकर यांनी १९३९ मध्ये लिहिलेल्या ‘समाजभूषण कै. सौ.  सावित्रीबाई जोतीराव फुले यांचे अल्पचरित्र’ या पुस्तकाची प्रत मिळाली आहे. हे सावित्रीबाई फुले यांचं  पहिलं  उपलब्ध चरित्र आहे. या पुस्तकाबरोबरच ‘बेळगाव परिसरातील सत्यशोधक चळवळ ‘ आणि ‘शेतकऱ्याचा असूड’ या आणखी २ पुस्तकांचे प्रकाशन रविवारी ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. हे प्रकाशन  सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक डॉ. बाबा आढाव, प्रा. नागनाथ कोत्तापल्ले आणि मा. उत्तमराव तथा नाना पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुद्रणालयाकडून आतापर्यंत १६ पुस्तकांचे प्रकाशन व पुनर्प्रकाशन करण्यात आले आहे. याबाबत माहिती देताना मुद्रणालयाचे व्यवस्थापक डॉ. दत्तात्रय कुटे म्हणाले, “या १६ पुस्तकांमध्ये पुणे विद्यापीठाचा इतिहास, महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास, निजाम पेशवे संबंध १८ वे शतक, पोर्तुगेज मराठे संबंध अर्थात पोर्तुगेजांच्या दप्तरातील मराठ्यांचा इतिहास अशी पुणे  विद्यापीठाचे प्रकाशन असलेली पुस्तके पुनर्प्रकाशित करण्यात आली आहे. आता या यादीत ३ पुस्तकांची भर पडणार आहे.

या पुस्तकांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून यांची मागणी ऑनलाईन करता येणे शक्य आहे.”

सामाजिक ठेवा

विद्यापीठाने पुनर्प्रकाशित केलेली ही पुस्तके हा सामाजिक ठेवा आहे. या प्रकाशनाच्या माध्यमातून माफक दरात अनेक चांगली व दुर्मिळ पुस्तके  उपलब्ध करून देणे हे मी विद्यापीठाचा कुलगुरू या नात्याने माझे कर्तव्य समजतो.

– प्रा. डॉ. नितीन करमळकर

कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *