उमद्या,हरहुन्नरी आणि अनभिषिक्त बॅरिस्टरला आदरांजली…….

पुणे-मुंबई मनोरंजन
Spread the love

रंगभूमी असो छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा प्रत्येक ठिकाणी आपल्या अभिनयाच्या मुक्त वावर समर्थपणे दर्शवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या कुटुंबीयांकडूनच मिळाला होता. दादासाहेब फाळके यांच्या ‘मोहिनी भस्मासुर’ या 1913 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्यांच्या पणजी आणि आजीने एकत्रितरित्या काम केले होते. भारतीय चित्रपट सृष्टीची पहिली अभिनेत्री म्हणजेच दुर्गाबाई कामत या त्यांच्या पणजी, ज्यांनी ‘मोहिनी भस्मासुर’ मध्ये पार्वतीची भूमिका साकारली होती तर त्यांच्या आजी कमलाबाई गोखले या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बाल अभिनेत्री होत्या. त्यांनी या चित्रपटात मोहिनीची भूमिका साकारली होती.

पणजी आणि आजी समवेत त्यांचे वडील चंद्रकांत गोखले हेही 1930 सालापासून अभिनय क्षेत्रात कार्यरत होते. त्यानंतर चौथी पिढी ही विक्रम गोखलेंची. चारही पिढ्यांमध्ये कलावंत पण मुरलेले होते. परंतु विक्रम गोखले यांचे नशीब त्यांना अभिनय क्षेत्राकडे ओढून आणणार ठरलं. त्यांची निवड सैन्यामध्ये झाली असती पण, त्यांनी तिथे न जाता कुटुंबाला असणारी पैशाची गरज भागविण्यासाठी एका क्लार्कची नोकरी पत्करली. ते या नोकरीवर सोमवारी रुजू झाले 135 रुपये महिना पगारावर. परंतु आठवडाभर काम करताना त्यांना ही गोष्ट जाणवली की आपण या नोकरीला न्याय देऊ शकत नाही. तेव्हा त्यांनी त्याच आठवड्यातल्या शनिवारी त्या नोकरीचा राजीनामा देऊन त्या नोकरीला निरोप दिला.

संध्याकाळी घरी आले असताना वडील चंद्रकांत गोखले यांना भेटण्यासाठी तत्कालीन सुप्रसिद्ध नाटककार बाळ कोल्हटकर घरी आले होते. त्यांनी या तरुणाला पाहिले आणि त्याच्या वडिलांना विचारलं की तुमचा मुलगा माझ्या नाटकात काम करू शकेल का? बाळ कोल्हटकर यांनी तीस रुपये प्रति प्रयोग त्यांना देण्याचं निश्चित केलं आणि एका महिन्यात 25 प्रयोग करण्याची हमीही दिली. अशारीतीने बाळ कोल्हटकर यांच्या समवेत विक्रम गोखले यांचा रंगभूमीवरचा प्रवास सुरू झाला तो पाच मे 1968 रोजी. पाच वर्षे बाळ कोल्हटकरांच्या नाटक कंपनीत काम करत असताना काही काळानंतर त्यांना मरगळ आली. त्यानंतर ते कामाच्या शोधात भटकत राहिले. रंगभूमीवरच्या कामाची सुरुवात झाली होती. अनेक लेखक दिग्दर्शकाशी त्यांच्या भेटी होत राहिल्या पण त्यांना या कामामध्ये तेव्हा समाधान लाभले जेव्हा त्यांची डॉक्टर विजया मेहता या रंगकर्मीशी भेट घडली.

डॉक्टर विजया मेहता तालमीत अनेक जण घडले त्यातलेच एक विक्रम गोखले. विजया मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बॅरिस्टर’ या नाटकात अतिशय अवघड आणि अभ्यासू व्यक्तिरेखा विक्रम गोखले यांनी साकारले. ती अजरामर झाली. त्यानंतर त्यांनी अनेक नाटकांमधून कामे केली. परंतु त्यांचं गाजलेलं व्यावसायिक नाटक ठरले ते ‘स्वामी’. माधवराव पेशवे यांची एक ऐतिहासिक भूमिका साकारताना त्यांनी प्रदर्शित केलेला अभिनय वाखाण्याजोग होता.

अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शनामध्ये पहिलं पाऊल उचललं ते ‘संकेत मिलनाचा’ या नाटकाच्या माध्यमातून. अनेक नाटकांमधून मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याने कधी गंभीर भूमिका केल्या तर कधी ‘आप्पा आणि बाप्पा’ यासारख्या नाटकांमधून विरोधी व्यक्तिरेखाही साकारल्या. या नाटकात त्यांची ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकरांसमवेत विनोदाची जुगलबंदी रंगायची ती रंगभूमीवर. या दरम्यान त्यांना अनेक चित्रपटात अभिनय करताना सर्वांनी पाहिले आहे मग हिंदी असो की मराठी, या सर्व भूमिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली.

‘परवाना’ या हिंदी चित्रपटात तर ‘वऱ्हाडी आणि वाजंत्री’ या मराठी चित्रपटात त्यांनी अभिनय केला त्यानंतर त्यांच्याकडे अनेक भूमिका चालून आल्या. अनेक मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारणारा हा कलावंत ‘लपंडाव’ चित्रपटांमध्ये विनोदी नट म्हणून दिसला तर ‘वजीर’ मध्ये एक राजकारणाचं वातावरण निर्माण करतो तर ‘कळत नकळत’ या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाच्या जोडीने त्यांच्या भूमीकेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. त्यांची अभिनयातली समज, खर्जातला आवाज, उत्कृष्ट संवाद फेक, अभ्यासू आणि दमदार व्यक्तिमत्व आपल्या अभिनयातून उभी करण्याची ताकद त्यांच्या प्रत्येक भूमिकेत पाहायला मिळाली.

मोठमोठाले संवाद उत्तम रीतीने फेकण्याची कसब त्यांच्या ठायी होती. त्यासोबत वाक्यात कोणत्या जागी आणि कुठे थांबावं आणि तो पॉज सुद्धा बराच बोलका हे असावा हे नवोदितांना त्यांच्या अभिनयातून शिकायला मिळाले. त्यांच्या अभिनयाची तुलना कोणाशी होऊ शकत नाही.

अनेक प्रयोग करत असताना त्यांनी एक मोठा निर्णय घेतला तो 2016 साली. नाटक होतं ‘के दील अभी भरा नही’. या नाटकाचे 74 प्रयोगही त्यांनी केले. पण त्यांना घशाचा त्रास सुरू झाला घशाच्या त्रासामुळे मी या नाटकाचे काही प्रयोग करील पण त्यानंतर नवीन नाटक स्वीकारणार नाही असं सांगत त्यांनी रंगभूमीला अलविदा म्हटले. पण त्यांनी छोट्या आणि मोठ्या पडद्यावर काम करणं सुरूच ठेवलं अनेक मालिकांमधून वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारणारा हा अभिनेता मराठी चित्रपटांमधूनही महत्वपूर्ण भूमिका साकारत राहिला.

समोर अमिताभ सारखा मोठा नट जरी आला तरी त्यांचा अभिनय कधी झाकोळला गेला नाही. त्यामुळे त्यांची इन्स्पेक्टर गायतोंडेची भूमिका केवळ अविस्मरणीय ठरली. ‘हम दिल दे चुके है सनम’, ‘भूल भुलैया’ यांसारख्या हिंदी चित्रपटां व्यतिरिक्त मराठीतही अलीकडच्या काळातील अनेक चित्रपटांमधून विविध व्यक्तिरेखा साकारल्या.

‘अनुमती’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर ‘नटसम्राट’ सारखा आजारावर चित्रपटात नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहणं हे प्रेक्षकांसाठी औत्सुकयाचं ठरलं.  असा हा अभिनेता अभिनयाचे उत्तम तंत्र जाणत होता. ते  अभिनयाचा प्रशिक्षणही देत होते. त्या व्यतिरिक्त त्यांची  सुजाता फार्म नावाची पुण्यात रिअल इस्टेट फर्मही आहे. त्यांचा विविध समाजसेवी उपक्रमांमध्ये सहभाग असायचा. अशा या उमद्या, हरहुन्नरी  आणि अनभिषिक्त बॅरिस्टरला  news24pune च्या वतीने आदरांजली…..

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *