आसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत


पुणे : नुकत्याच पार पडलेल्या आसियान-इंडिया स्टार्ट-अप फेस्टिव्हलमध्ये आयआयटी कानपूरच्या स्टार्ट-अप इनक्यूबेशन आणि इनोव्हेशनच्या सेंटरच्या वतीने पुण्यातील प्रसिद्ध मानवतावादी नेते आणि सामाजिक उद्योजक श्री. इफ्तेखार पठाण यांचे स्वागत करण्यात आले. आसियान-भारत भागीदारीला 30वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

श्री. पठाण हे प्रसिद्ध उद्योजक असून त्यांना 30 वर्षांपेक्षा जास्त व्यावसायिक अनुभव आहे. मेट्टा सोशल सोल्यूशन्स प्रा. लिमिटेडचे ते सह-संस्थापक आहेत. इफ्तेखार हे पुण्यातील सार्वजनिक व खाजगी भागीदारी (पीपीपी) अशा तऱ्हेचा एकमेव मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल प्रकल्प असलेल्या औंध इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (एआयएमएस) संस्थापक सदस्यांपैकीसुद्धा एक आहेत. तसेच ते जागतिक उद्योजकता मंच फ्रान्स (ल्योन) या थिंक टँकचे माजी सदस्य आहेत.

अधिक वाचा  जितेंद्र आव्हाड यांचा शरद पवारांनी राजीनामा घ्यावा - चंद्रशेखर बावनकुळे

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आसियान-भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान भागीदारी साजरी करण्यात आली. याला आसियान सदस्य राष्ट्रे आणि भारत यांच्यातील सामायिक शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी कृती आराखड्यात (२०२१-२०२५) ठळक स्थान देण्यात आले आहे. इंडोनेशियाच्या सिबिनॉन्ग बोगोर येथील इनोव्हेशन कन्व्हेन्शनमध्ये झालेल्या या कार्यक्रमात सुरुवातीच्या आणि नंतरच्या टप्प्यातील व्हेंचर कॅपिटलिस्टस्, भारतातील यशस्वी स्टार्टअप्सचे संस्थापक आणि आसियानची सदस्य राष्ट्रे, आसियानमधील भारताच्या मिशनचे राजदूत, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव, आसियान सचिवालय आणि शास्त्रज्ञ सहभागी झाले.

या शिखर परिषदेत बोलताना श्री. इफ्तेखार पठाण म्हणाले, “या दोन देशांचे द्रष्टे नेते, क्रमशः मा. सुकार्णो आणि श्री. जवाहरलाल नेहरू, यांनी भारत व इंडोनेशिया यांच्यात दशकानुदशके सौहार्दपूर्ण संबंध निर्माण करण्याचे स्वप्न पाहून त्यासाठी आपल्या जनतेला आवाहन केले होते. पहिला आसियान-भारत स्टार्टअप महोत्सव हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. भारत आणि इंडोनेशिया भौगोलिक आणि भावनिकदृष्ट्या जवळ आहेत आणि त्यांच्यात अनेक समानता आहेत. आपल्याला आपले संबंध मजबूत करण्यासाठी आणि संबंधित उद्योजकीय वातावरणाचा लाभ घेण्यासाठी धोरणात्मकपणे काम करण्याची गरज आहे.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love