देशातील प्रत्येक शाळा-महाविद्यालयात ज्ञान मंदिरे उभारावित-आचार्य गोविंद देवगिरी महाराज

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)– “देशातील वैद्यकीय महाविद्यालयच नाही तर प्रत्येक शाळा, कॉलेज महाविद्यालयात ज्ञान मंदिरे उभी करावीत. येथून दिल्या जाणार्‍या भक्ती व संस्काराच्या शिक्षणातून करुणा व प्रेमाची उत्पत्ती नव्या पिढीमध्ये अधिक वाढेल.” असे विचार अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंद देवगिरी महाराज (Acharya Govind Devagiri Maharaj) यांनी व्यक्त केले.

माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व तळेगाव दाभाडे येथील डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय यांच्यावतीने माता पार्वती, बुध्दिस्वरूप गणेश, भक्ती-शक्तीस्वरूप श्री हनुमान यांच्यासह दिव्य ज्ञान व नादब्रह्मस्वरूप ओंकाराची प्रतिकृती असलेल्या भगवान श्री शिवशंकराच्या पिंडीची  प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी प्रमुखपाहुणे म्हणून ते बोलत होते.

याप्रसंगी आळंदी येथील परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती, थोर तत्वज्ञ डॉ. राम विलास वेदांती, हभप किसन महाराज साखरे, बनारस येथील विचारवंत डॉ. योगेंद्र मिश्रा, बद्रिनाथधामचे डॉ.उन्नीयाल धर्माधिकारी, उज्जैनचे रमण शास्त्री त्रिवेदी यांच्या हस्ते भगवान श्री शिवशंकराच्या पिंडीची  प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. अध्यक्षस्थानी एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष  विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते

हभप तुळशीम दा. कराड, हभप नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरीकर, माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे विश्वस्त व अध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड, सहकार्यकारी विश्वस्त डॉ. सुचित्रा कराड नागरे, डॉ. उमेश नागरे, डॉ. विरेंद्र घैसास, हभप बापूसाहेब मोरे, माजी आमदार कृष्णराव भेगडे, बाळासाहेब भेगडे, गणेश खांडगे, बाळासाहेब जांभोळकर, बाळासाहेब काशीद, नेदरलँड येथील  पुष्पा अवस्थी, बाळासाहेब बडवे, पं. वसंतराव गाडगीळ, डॉ. एस.एन. पठाण व बापू साहेब भेगडे हे उपस्थित होते.या प्रसंगी रुद्राक्षाच्या झाडाचे वृक्षारोपण व मंदिराच्या कोनशिलेचे अनावरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

आचार्य गोविंद देव गिरी महाराज म्हणाले,“ईश्वराचे खरे स्वरूप करुणेत आहे. त्यामुळे भक्तीचे शिक्षण दिल्या शिवाय मानव पूर्ण होऊ शकत नाही. आज शिक्षित युवकांमध्ये करूणेचा अभाव दिसत आहे. जगाला प्रेम देऊ पण तत्पूर्वी आपल्या आई वडिलांना घरात ठेऊन त्यांना प्रेमाचा ठेवा दयावा. यातूनच वृध्दाश्रमांची संख्या कमी होईल.”

“भगवान रामाच्या मंदिराबरोबरच राष्ट्र समर्थ बनविण्याची वेळ आली आहे. यापूर्वी राष्ट्र संगठित नसल्याने बर्‍याच वाईट घटना घडल्या आहेत. देशात  परिवर्तनाची लहर आली आहे.”

डॉ.रामविलास वेदांती म्हणाले,“ देशातील सर्व धर्म, पंथांना एकत्रित आणण्याचे कार्य डॉ. विश्वनाथ कराड करीत आहेत. त्यांनी केलेले अलौकिक कार्य पाहता केंद्र सरकार आणि राष्ट्रपती यांनी भारतरत्न देऊन त्यांचा योग्य सन्मान करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात राम मंदिर आणि काशी येथील मंदिराचा कायापालट झाला आहे. आता मथुराचा कायापालट होणार आहे.”

डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“धर्म आणि अध्यात्माच्या समन्वयातून विश्वात शांती नांदेल. अशा वेळेस ज्ञान मंदिरात भगवान शंकराची प्राण प्रतिष्ठाना होणे चांगले संकेत आहे. येथे येणार्‍या प्रत्येक रुग्णाला आणि डॉक्टरांच्या मनाला समाधान देणारे हे ठिकाण असेल.”

डॉ. स्वामी स्वरूपानंद सरस्वती म्हणाले,“ वैद्यकीय संकुलात मंदिराची निर्मिती ही शांती आणि आनंदाचे साम्राज्य आहे. येथे अंतकरणातील विकार, अहंकार नतमस्तक होतात. आपण अनंत श्रध्देने समर्पित झाल्यास शांतीचा अनुभव होतो.”

डॉ. उन्नीयाल धर्माधिकारी,“ सृष्टीचे कल्याण करणारे व्यक्ती कधी कधी जन्म घेतात. त्यात डॉ. कराड यांचा उल्लेख येतो. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.”

डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले “विज्ञान आणि अध्यात्माच्या माध्यमातून शांतता निर्माण होईल याचा धागा पकडून डॉ. विश्वनाथ कराड यांनी विश्वनाथ महाकाल मंदिराची निर्मिती केली आहे. त्यांनी ९ मंदिर, १ मस्जिद आणि आळंदी येथे घटांची निर्मिती केली आहे.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *