पुणे– सारथी संस्थेच्या तारादूत प्रकल्पाविषयी संस्थेचे संचालक मंडळ दिशाभूल करत असून मंत्रालयातील झारीचे शुक्राचार्यही त्यास जबाबदार आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही अनेक वेळा पाठपुरावा केला. परंतु, ते सारथीला स्वायत्तता दिली असल्याने जो निर्णय घ्यायचा आहे तो संचालक मंडळाने घ्यायचा आहे असे सांगतात. अशा प्रकारे एकमेकांकडे चेंडू टोलवाटोलवी करून तारादूतांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप मराठी क्रांती मोर्चाने केला आहे. जर, संचालक मंडळ अजित पवार यांचे ऐकत नसेल तर सारथीचे संचालक मंडळ बरखास्त करून अजित पवार यांनी अध्यक्ष व्हावे अशी मागणीही पत्रकार परिषदेत करण्यात आली.
या परिषदेला मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समनव्ययक राजेंद्र कुंजीर, पुणे विभाग समन्वयक सचिन आडेकर, बाळासाहेब आमराळे, अनिल ताडगे, दशहरी चव्हाण, अमर पवार, गणेश मापारी, तारादूत प्रतिनिधी हर्षल सोनावणे उपस्थित होते.
मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी राज्य सरकारकडे केलेल्या प्रमुख मागण्यांपैकी सारथी संस्थेच्या निर्मितीसहित त्यासोबत या संस्थेशी निगडीत २२ विषयांमध्ये तारादूत हा अत्यंत महत्वाचा व मराठा समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक प्रगतीचा विषय आहे. सरकारने ४५० तारादूतांना ‘सारथी’ मार्फत जाहीरात देऊन त्यांना नाशिक येथे निवासी प्रशिक्षण देऊन त्यातील १५० जणांना नियुक्ती पत्र देण्यात आली. त्यासाठी ‘सारथी’ मार्फत १ कोटी रूपये खर्च या तारादूतांवर करण्यात आला. २ महिने काम केल्यानंतर कोरोना महामारीमध्ये काम बंद करण्यात आले असल्याचे कुंजीर यांनी यावेळी सांगितले.
सारथी संस्थेने तारादूतांच्या नियुक्त्या न केल्याने मराठा समाजाच्या प्रश्नांच्या निगडीत अनेक गोष्टींची माहीती सरकारकडे उपलब्ध होत नाही. पोलिस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी बार्टी संस्थेकडून १,५९,००० लाभार्थी आणि सारथी संस्थेकडून ६,८६० लाभार्थी एवढेच अर्ज आले. बार्टी संस्थेकडे सन २०१५ पासून ४५० समतादूत म्हणून कार्यरत आहेत. परंतू सारथी संस्थेकडे तारादूत नसल्यामुळे सारथी संस्थेमार्फत असलेल्या योजना मराठा व मराठा कुणबी समाजापर्यंत पोहोचत नाहीत आणि जनजागृतीही होत नसल्याचे आडेकर यांनी यावेळी सांगितले.
सारथी संस्थेला स्वायत्ता दिलेली असताना केवळ संचालक मंडळाच्या निष्क्रियतेमुळे मराठा व कुणबी मराठा हे राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे व्यवस्थापकीय संचालक व संचालक मंडळ त्वरित बरखास्त करावे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असून मराठा क्रांती मोर्चाची बैठक ही आयोजित करणार असल्याचे आमराळे यांनी यावेळी सांगितले.
… त्यांनी मराठा समाजासाठी काम करावे
राज्यसभेवर कोणी जावे या ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. संभाजीराजे यांची संघटना इतर मराठा संघटनाप्रमाणेच ही मराठा क्रांती मोर्चाच्या अंर्तगत असेल. राज्यसभेवर जे कोणी जातील त्यांनी मराठा समाजासाठी काम करावे. हीच अपेक्षा मराठा क्रांती मोर्चाची असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.