पुण्यात साकारले ‘झपूर्झा’ कला व संस्कृती संग्रहालय

कला-संस्कृती पुणे-मुंबई
Spread the love

पुणे -कला, कलाकार व संस्कृतीचे देशाच्या सांस्कृती व कलाविश्वाच्या वैभवात भर घालणारे झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालय पुण्यात होत असून, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १९ मेपासून ते सर्वांसाठी खुले होत आहे, अशी माहिती झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालयाचे संस्थापक व पीएनजी सन्सचे अध्यक्ष अजित गाडगीळ यांनी दिली.

या वेळी डॉ. रेणू गाडगीळ, आर्टिस्ट राजू सुतार, पीएनजी सन्सचे संचालक-सीईओ अमित मोडक, सीएफओ आदित्य मोडक आदी उपस्थित होते.

पुण्यात एनडीए रस्त्यावर पीकॉक बेच्या पुढे कुडजे येथे आठ एकर परिसरात झपूर्झा साकारले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अजित गाडगीळ यांनी देशाच्या विविध भागांतून जमविलेल्या व वारसा ते मॉडर्न आर्ट प्रकारातील चित्र-हस्त-शिल्प-छायाचित्र आदींची प्रदर्शने आणि ललित कलांचे सादरीकरण, कार्यशाळा व चर्चासत्रे येथे होणार आहेत. कला विश्वातील दिग्गज कलाकारांचे अनुभव ऐकता येणार असून, त्यांच्याशी संवादाची संधी मिळणार आहे. जागतिक स्तराच्या संग्रहालयांच्या धर्तीवर याची रचना आहे.

या संदर्भात श्री. गाडगीळ म्हणाले, “दागिने बनवणे ही कला आहे, त्यामुळेच गेल्या दहा वर्षांपासून पीएनजी सन्स आर्ट इनिशिएटिव्हअंतर्गत कलाकारांना मोफत कलादालने उपलब्ध असून, ‘झपूर्झा’ हे त्याचे व्यापक स्वरूप आहे. लहान वयापासूनच कलेची आवड निर्माण व्हावी व आपली संस्कृती समजण्यासाठी झपूर्झाची निर्मिती केली आहे. येथे कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी पाहण्यासाठी व शिकण्यासाठी काही ना काही आहे. तसेच, सातत्याने नवीन वस्तू पाहायला मिळणे व कलांचे प्रशिक्षण, हे झपूर्झाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच देश-विदेशातील कलाकार व संग्रहालयाच्या माध्यमातून आणखीन नव्या गोष्टी येथे सादर होतील.”

अनेक दुर्मीळ ते मॉडर्न वस्तू

येथे २०० वर्षांपूर्वीचे महाराष्ट्रीयन दागिने, चांदीच्या जुन्या कलात्मक वस्तू, नाणी, १५० वर्षांपूर्वीच्या ३०० पैठण्या-शेले-फेटे-टोप्या, लहान मुलांचे पोषाख, विविध राज्यांतील पुरातन वस्त्रे, दुर्मीळ-वारसा असणाऱ्या वस्तू, विविध प्रकारचे दिवे, पुतळे, पोथ्या, ताम्रपट, टिन टॉइज, मुगल चित्रकला, राजा रविवर्मा लिथोग्राफ्स पासून ते मॉडर्न आर्टमधील एम.एफ हुसेन आदींनी काढलेली मूळ चित्रे येथे पहायला मिळतील. प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर बरवे यांचे स्वतंत्र दालन असून, येथील प्रत्येक कलादालनाचे क्यूरेशन त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे. महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांसाठी येथे स्वतंत्र दालन असून, त्याअंतर्गत जयंत जोशी यांनी काढेल्या अबस्ट्रॅक पेंटिंग व फोटोग्राफचे पहिले प्रदर्शन येथे भरविले आहे.

देशातील पहिला टेक्सटाइल आर्ट बिनाले

वर्ल्ड टेक्स्टाइल आर्ट सुरू होऊन २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भारतात पहिल्यांदा टेक्स्टाइल आर्ट बिनाले पुण्यात झपूर्झा येथे ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये करण्याचा मानस आहे. येथे टेक्स्टाइल आर्टमधील जागतिक पातळीवरील कलाकार सहभागी होत असून, यात पारंपरिक ते मॉडर्न टेक्स्टाइल आर्ट पाहता येईल. तसेच, या दरम्यान चर्चासत्र, प्रशिक्षण होणार आहे, असे अजित गाडगीळ यांनी सांगितले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *