भूमिपूजन केल्यानंतर प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात हे दाखवले – नरेंद्र मोदी

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे- आधी भूमिपूजन व्हायचं मात्र, उद्घाटन कधी होणार हे माहिती पडायचं नाही, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रो लोकार्पणात लगावला. सध्याच्या काळात भूमिपूजन केल्यानंतर प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात हे दाखवले असल्याचे पंतप्रधान म्हणाले. समाजातील सर्वच घटकांनी आता मेट्रोचा वापर करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

एमआयटी महाविद्यालय मैदानावर आयोजित विविध विकास प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार,  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,  विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार प्रकाश जावडेकर, गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, उषा ढोरे आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम पुणे महापालिकेतील महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ भव्य पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानंतर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बहुचर्चित अशा पुणे मेट्रोचे उद्घाटन झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ किलोमीटरच्या पट्ट्यात गरवारे महाविद्यालय ते आनंदनगर असा प्रवास केला. प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी पंतप्रधानांनी डिजीटल ॲपच्या माध्यमातून तिकीट खरेदी करून मेट्रोने प्रवास केला. त्यानंतरच ते मेट्रोमध्ये जावून बसले. यावेळी त्यांच्यासोबत दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांची पंतप्रधानांनी आस्थेने विचारपूस केली. त्यांच्यासोबत त्यांनी गप्पा मारल्या. तत्पूर्वी मोदींनी गरवारे मेट्रो स्थानकातील प्रदर्शनाचं उद्घाटन केलं आणि मेट्रोला हिरवा झेंडाही दाखवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, पुण्याच्या विकासात महत्त्वाच्या योगदान असणाऱ्या प्रकल्पाचे उद्घाटन, भूमिपूजन करण्याची संधी आज मिळाली. पुणे मेट्रोचे भूमिपूजनासाठी आणि उद्घाटन करण्यासाठी मला आमंत्रित करण्यात करण्यासाठी  पुणेकरांचा आभारी आहे.याआधी भूमिपूजन होत असे पण प्रकल्प कधी पूर्ण व्हायचे हे कळायचे नाही. पण, आता भूमिपूजन केले जाऊ शकते आणि प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात, हे सिद्ध झाले आहे. येणाऱ्या काळामध्ये मेट्रो रेल्वेचे महत्त्व आणखी वाढणार आहे. देशभरात मेट्रोचे जाळं विस्तारत असून महाराष्ट्राचा मोठा वाटा असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पुणे शहर आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रप्रेमाच्या प्रेरणेसाठी प्रसिद्ध आहे. पुण्याने शैक्षणिक, संशोधन आणि विकास, माहिती तंत्रज्ञान आणि वाहन  उद्योग क्षेत्रात आपली ओळख प्रस्थापित केली आहे. त्यामुळे आधुनिक सुविधा गरजेच्या असून त्यासाठी सुरु करण्यात आलेल्या विकास प्रकल्पांसाठी केंद्र सरकार सहकार्य करेल, असे आश्वासन मोदी यांनी दिले.

पुणे मेट्रो पुण्यातील वाहतूक व्यवस्थेला मजबूत करेल. जनतेला गर्दी आणि वाहतूकीच्या खोळंब्यापासून मुक्त करेल. पुण्यातील जनतेचे जीवनमान अधिक सुखकर करेल. कोरोना संकटकाळातही मेट्रो प्रकल्पाचा एक टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. पुणे मेट्रोसाठी सौर ऊर्जेचाही मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. त्यामुळे दरवर्षी २५ हजार टन कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होईल. या प्रकल्पासाठी कामगारांनी दिलेले योगदान सामान्य माणसासाठी उपयुक्त ठरेल, असे ते म्हणाले.

नागरिकांनी मेट्रोने प्रवास करावा

देशात वेगाने शहरीकरण होत आहे. २०३० पर्यंत शहरी लोकसंख्या ६० कोटीपेक्षा अधिक होईल. शहराची वाढती लोकसंख्या संधी निर्माण करण्यासोबत आव्हानेही निर्माण करते. शहराच्या विस्तारासोबत रस्ते वाहतूकीला मर्यादा येतात. अशावेळी सार्वजनिक वाहतूक सुविधेचा विकास हाच सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे केंद्र सरकार अशा वाहतूक सुविधांवर आणि विशेषत: मेट्रो प्रकल्पावर विशेष लक्ष देत आहे.

 आज देशातील दोन डझनापेक्षा अधिक शहरात मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर आदी ठिकाणी मेट्रो रेल्वेचा विस्तार होत आहे. शहरातील सर्व स्तरातील नागरिकांनी मेट्रो रेल्वेत प्रवासाची सवय लावून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. मेट्रो प्रवासामुळे शहराला मदत होईल, असेही ते म्हणाले.

शहराला आधुनिक, स्वच्छ आणि सुंदर बनवावे लागेल

एकविसाव्या शतकात शहरांना अधिक आधुनिक बनवावे लागेल आणि नव्या सुविधांचे निर्माणही करावे  लागेल. भविष्यातील शहरांच्या गरजा लक्षात घेऊन केंद्र सरकार काम करीत आहे. प्रत्येक शहरात पर्यावरण अनुकूल वाहतूकीला आणि त्यासाठी इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. सर्व सुविधांना आधुनिक बनविणारे एकात्मिक नियंत्रण केंद्र असावे. शहरात आधुनिक कचरा व्यवस्थापन पद्धत आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प असणे गरजचे आहे. जलस्त्रोतांच्या आणि ऊर्जेच्या पूर्ण कार्यक्षम उपयोगावर भर देणेही आवश्यक आहे, असेही प्रधानमंत्री म्हणाले.

वर्षातून एकदा नदी उत्सव साजरा करा

पुण्याला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी महापालिकेने विविध प्रकल्प सुरू केले आहेत. पूर नियंत्रणासाठी हे प्रकल्प उपयुक्त ठरतील. मुळा-मुठा नदीची स्वच्छता आणि  सुशोभिकरणासाठी केंद्र सरकार मदत करीत आहे. नद्या पुनरुज्जिवीत झाल्यास शहरातील नागरिकांना त्याचा लाभ होईल. शहरातील नागरिकांनी वर्षातून एकदा नदी उत्सव साजरा करावा. नदीच्या प्रती श्रद्धा, पर्यावरण विषयक प्रशिक्षण आदी उपक्रमांनी नद्यांचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहनही प्रधानमंत्री मोदी यांनी केले.

फडणविसांचे केले कौतुक

मोदी यांनी आपल्या भाषणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. ते म्हणाले, फडणवीस जेव्हा इथे मुख्यमंत्री होते, तेव्हा या प्रकल्पासाठी ते नेहमीच दिल्लीला येत असतं. ते या प्रकल्पाच्या पाठिशी लागलेले असायचे. मी त्यांच्या प्रयत्नांचं अभिनंदन करतो.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *