पुणे- पाकिस्तानमध्ये ज्यांना पाकिस्तानी सैन्याची मदत घेऊन सत्ता काबिज करायची आहे आणि त्यासाठी जे राजकारण करतात तेच दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, पाकिस्तानमधील सामान्य नागरिक भारताचे शत्रू नाहीत असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सर्वधर्मीय ईद मिलनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण तसेच सर्वधर्मीय धर्मगुरू देखील उपस्थित होते.
पवार महाणले, आज या कार्यक्रमात हिंदू, पारसी, शीख, बौद्ध अशा सर्व धर्मगुरूंना एका व्यासपीठावर एकत्र आणून आपण एकतेचा संदेश देत आहोत. आपला देश अनेक जाती आणि धर्मांचा देश आहे. हे सर्व आपलं सौंदर्य आहे. हे सौंदर्य उठून ठेवण्यासाठी याला लागलेल्या विविध फुलांचा सन्मान केला पाहिजे. पण आपल्यामध्ये कुणी जातीय द्वेष निर्माण करत असेल, तर त्यांना धडा शिकवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असं आवाहन पवार यांनी केलं.
शरद पवार म्हणाले, “सध्या जगात एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियासारखा शक्तीशाली देश युक्रेनसारख्या लहान देशावर आक्रमण करत आहे, श्रीलंकेतील तरुण रस्त्यावर उतरून लढत आहे आणि तेथील नेते भूमिगत झालेत. शेजारी पाकिस्तानमध्ये आपले बांधव राहतात तेथे एक तरुण पंतप्रधान झाला, त्याने देशाला दिशा देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला सत्तेतून बाहेर काढण्यात आलं. आता पाकिस्तानमध्ये वेगळं चित्र दिसत आहे.”
“लाहोर असो की कराची आम्ही पाकिस्तानमध्ये जेथे गेलो तेथे आमचं यथोचित स्वागत झालं. आम्ही आपल्या क्रिकेट संघासोबत कराचीला गेलो होतो. सामन्यानंतर खेळाडूंनी आजूबाजूची ठिकाणं पाहण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा आम्ही नाश्त्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेलो. मात्र, रेस्टॉरंट मालकाने आम्ही त्यांचे पाहुणे असल्याचं सांगत आमच्याकडून पैसे घेण्यास नकार दिला,” असं शरद पवार यांनी सांगितलं.