पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीची परीक्षा येत्या ४ मार्च पासून सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी आवश्यक असलेले प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने आजपासून (दि. 9 फेब्रुवारी) उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावरून ही प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहेत. या प्रेवश पत्राची प्रिंट काढून त्यावर प्राचार्यांची सही व शिक्का घ्यायचा आहे.
विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर www.mahahsscboard.in जात collage login सेक्शनला जात आपले hall ticket डाऊनलोड करायचे आहे. प्रवेश पत्र डाऊनलोड करत असताना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी आल्यास संबधित महाविद्यालय तसेच विभागीय मंडळाकडे संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी या हॉल तिकिटाची प्रिंट आऊट काढावी त्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये अशी माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे.राज्यातील यंदा तब्बल १४ लाख ७५ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
दरम्यान, परीक्षांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. परीक्षेच्या बाबतीत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास विद्यार्थ्यांनी थेट संपर्क साधावा अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची दिली आहे. याबरोबरच दहावीच्या विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट साधारण येत्या २० फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.