नांदेडचा शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी : सोलापूरचा महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी


पुणे(प्रतिनिधि)-मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये नांदेडच्या शिवराज राक्षे याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला आसमान दाखवत मानाच्या चांदीच्या गदेवर आपले नाव कोरले. अत्यंत उत्कंठा निर्माण करणाऱ्या लढतीत शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा मानकरी ठरला. रणहलगी आणि तुतारीचा निनाद, प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या प्रतिसादात झालेल्या लढतीत नांदेडकडून खेळणाऱ्या राक्षेने सोलापुरच्या महेंद्र गायकवाडला चितपट केले आणि मैदानावर एकच जल्लोष झाला.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या ६५ व्या अधिवेशनाची सांगता महाराष्ट्र केसरी ढतीने झाली. कोथरुड येथे संस्कृती प्रतिष्ठानच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र केसरी हा किताब पटकाविणाऱ्या राक्षे याला पाच लाख रुपये रोख, थार जीप आणि मानाची गदा बक्षिस देण्यात आले. उपमहाराष्ट्र केसरी ठरलेल्या गायकवाडला ट्रॅक्टर आणि अडीच लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. माती आणि गादी विभागातील प्रत्येक गटातील विजेत्याला बुलेट, जावा या दुचाकी बक्षिस देण्यात आले. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण शरणसिंग, राज्य कुस्तीगीर परिषदेचे रामदास तडस, क्रीडामंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी महापौर आणि आयोजक मुरलीधर मोहोळ, आंतरराष्ट्रीय मल्ल राहुल आवारे आदी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतीत शिवराज व महेंद्र हे दोघेही तुल्ल्यबळ मल्ल यांनी एकमेकाना आजमावायला सुरुवात केली. मात्र यावेळी शिवराज राक्षेला पंचाकडून कुस्ती करण्याची ताकीद मिळाली. त्यानंतर ४० व्या सेकंदाला महेंद्रला देखील कुस्तीची ताकीद मिळाली. त्यावेळी बलदंड ताकदीच्या शिवराज  राक्षेने दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न महेंद्रने हाणून पाडण्याच्या प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी शिवराजने महेंद्रवर ताबा घेण्याचा प्रयत्न करताना महेंद्रला दाबून टाकत चीतपट करताना महाराष्ट्र केसरीवर आपले नाव कोरले. शिवराजच्या विजयानंतर प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.

तत्पूर्वी, माती विभागातून अंतिम लढतीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने वाशीमच्या सिकंदर शेखला ६-४ असे पराभूत करताना महाराष्ट्र केसरी किताबी लढतीत प्रवेश केला. लढतीच्या पहिल्या फेरीत दोन्ही मल्लांनी एकमेकाना आजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी सिकंदरला निष्क्रिय कुस्तीची ताकीद देण्यात आली. मात्र सिकंदर यावेळी गुण मिळवू शकला नाही. त्यामुळे एक गुण महेंद्रला मिळाला. त्यानंतर १० सेकंदातच सिकंदरने ताबा घेताना २  गुणांची कमाई केली. पहिल्या फेरीत सिकंदरने २-१ अशी आघाडी मिळविली.

अधिक वाचा  माझा नवरा वाघ होता आणि मी वाघीण आहे - स्वाती मोहोळ : नीतेश राणे यांनी घेतली शरद मोहोळ कुटुंबियांची भेट

दुसऱ्या फेरीत सिकंदरने आक्रमक चाल रचताना महेंद्रला बाहेर ढकलताना एक गुण वसूल केला. यावेळी ३-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर महेंद्रला निष्क्रिय कुस्तीचा फटका बसला. यामुळे सिकंदराला एक गुण मिळाला. यावेळी सिकंदर ४-१ अशा आघाडीवर होता. आक्रमक कुस्ती होण्याच्या नादात महेंद्रने आपल्या ताकदीचा उपयोग बाहेरची टांग लावून सिकंदरला उचलून खाली फेकताना चार गुण कमावले. हाच या कुस्तीचा निर्णायक क्षण ठरला. शेवटी महेंद्रने सिकंदराला बाहेर ढकलताना अजून एका गुणाची कमाई करताना ही लढत ६-४  अशी जिंकताना महाराष्ट्र केसरीच्या किताबी लढतीसाठी पात्र ठरला.

गादी विभागाच्या लढतीत नांदेडच्या शिवराज राक्षेने नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरला ८-१ असे पराभूत करताना महाराष्ट्र केसरी या किताबी लढाईसाठी पात्र ठरला. आजच्या लढतीत शिवराजने चपळता व बलदंड शरीराचा वापर करताना  चार वेळा हर्षवर्धनला बाहेर ढकलताना ४ गुणांची कमाई केली. दोनवेळा दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न करताना प्रत्येकी एकेक  असे दोन गुण वसूल केले.

दुसऱ्या फेरीत पिछाडीवर असलेल्या हर्षवर्धनने आक्रमक खेळाला सुरुवात करताना शिवराजचा दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बलदंड शरीर व ताकदीच्या जोरावर शिवराजने हर्षवर्धनचा प्रयत्न उधळून लावत ताबा घेत २ गुणाची कमाई करताना गुणांची भक्कम आघाडी निर्माण केली. शेवटचे काही क्षण बाकी असताना आक्रमक झालेल्या हर्षवर्धनने आव्हान टिकविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. मात्र यात हर्षवार्धानला केवळ एक गुण यश मिळाले.  अशा प्रकारे ही लढत शिवराजने ८-१ अशा गुनाधीक्याने जिंकताना प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी मुख्य लढतीसाठी पात्र ठरला.

किताबी लढत खेळणाऱ्या मल्लाचा स्पर्धेतील प्रवास

माती विभाग : महेंद्र गायकवाड :  सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाडने पहिल्या फेरीत नांदेडच्या अनिल जाधवला ९-० असे पराभूत करताना आगेकूच केली. त्यानंतरच्या फेरीत हिंगोलीच्या दिगंबर भूतनरला चीतपट केले. तिसऱ्या फेरीत लातूरच्या शैलेश शेळकेला ५-२ असे पराभूत करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर उपांत्य फेरीत कोल्हापूरच्या शुभम शिदनाळेला चीतपट करताना महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत दावेदारी दाखल केली आहे.

अधिक वाचा  पुणेकरांची पहिली पसंती मुरलीधर मोहोळच, माध्यमांच्या सर्व्हेमध्ये अव्वल; कसा झाला सर्व्हे?

गादी विभाग : शिवराज राक्षे : नांदेडच्या शिवराज राक्षेने गादी विभागात दमदार महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने पहिल्या फेरीत उस्मानाबादच्या धीरज बारस्करला १०-० असे एकतर्फी, दुसऱ्या फेरीत साताऱ्याच्या तुषार ठोंबरेला १०-० असे एकतर्फी तर तिसऱ्या फेरीत संभाजीनगरच्या (औरंगाबाद) पांडुरंग मोहारेला पराभूत करताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या फेरीत शिवराजने पुण्याच्या हर्षद कोकाटेला पराभूत करताना गादी विभागातून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत हिंगोलीच्या  गणेश जगतापवर १०-० अशी मात करताना अंतिम फेरीत प्रवेश केला.   

तिघेही  काका पवार तालमीचे

विशेष बाब म्हणजे यंदाच्या या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत हर्षवर्धन सदगिर, शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड हे काका पवार यांच्या तालमीचे असून, फायनलमध्ये दाखल झालेले दोन्ही पैलवान हे महेंद्र गायकवाड व शिवराज राक्षे हे देखील काका पवार यांच्या तालीमीचे पैलवान आहेत.

गादी विभागात शिवराज राक्षेने हर्षवर्धन सदगीरला अस्मान दाखवले. हे दोघेही काकासाहेब पवार आंतराष्ट्रीय कुस्ती संकुल या एकाच तालमीतील पैलवान आहेत. हर्षवर्धन सदगीरवर शिवराज राक्षेनं ८-१ असा एकतर्फी विजय मिळवला. शिवराज राक्षे हा राजगुरूनगरच्या राक्षेवाडी (जि. पुणे) येथील आहे. तो वस्तात काका पवार आणि गोविंद पवार यांच्याकडे कात्रजच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात करतो. महेंद्र गायकवाड हा मूळचा मंगळवेढा तालुक्यातल्या शिरसीचा (जि. सोलापूर) आहे. हा पठ्याही वस्ताद काका पवार आणि गोविंद पवारांचा शिष्य आहे. तो सुद्धा कात्रजच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सराव करतो.

माझ्या वडिलांचे मला ऑलम्पिक मध्ये लढतानाचे स्वप्न मला पूर करायचे आहे – शिवराज राक्षे

शिवराज राक्षे हा त्याचे वडील छोटे शेतकरी असून, त्यांचा दुधाचा छोटासा व्यवसाय आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने आहार सुद्धा पूर्ण होत नव्हता. शिवराज राक्षेचे वडील देखील एक पैलवान होते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना कुस्ती सोडावी लागली होती. आता ते शेती करतात आणि डेअरी चालवतात. आता ते आपल्या पैलवान मुलाच्या माध्यमातून आपलं स्वप्न साकार करण्यासाठी उत्सुक आहेत. पैलवान शिवराज राक्षे म्हणतो की, मी एका सामान्य घरातील मुलगा आहे. मला माझ्या वडिलांनी नेहमीच साथ दिली आहे. माझ्या वडिलांना मला ऑलम्पिक मध्ये लढताना त्यांना बघायचंय आणि त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने लढणार आहे.

अधिक वाचा  'राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक'अभियान सर्वसामान्यांसाठी समर्पित

मिशन ऑलिम्पिक सुरू करण्यात येईल- देवेंद्र फडणवीस,

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी यावेळी केली.

.फडणवीस म्हणाले, सामान्य घरातील युवक कुस्ती खेळतात. ते चांगली मेहनत करतात आणि त्यांना तेवढाच चांगला खुराकही लागतो. अशा खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी ऑलिम्पिक स्तरावर यशस्वी राज्यातील मल्लांना ६ हजार ऐवजी २० हजार रुपये मानधन देण्यात येईल. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तम-ए-हिंद विजेत्या मल्लांचे मानधन ४ हजारावरून १५ हजार रुपये, अर्जुन पुरस्कार विजेत्यांना ६ हजार ऐवजी २० हजार रुपये, वयोवृद्ध खेळाडूंना अडीच हजार ऐवजी साडेसात हजार रुपये मानधन देण्यात येईल.  मागील काळात तीन खेळाडूंना थेट पोलीस उपअधीक्षक पदावर नोकरीची संधी दिली, तशी संधी देण्याचे काम यापुढेही निश्चितपणे करण्यात येईल.

कै.खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविल्यानंतर महाराष्ट्र पदक मिळविणाऱ्या मल्लांना तयार करण्यात  मागे राहिला.  ही उणिव भरून काढण्यासाठी महाराष्ट्र मिशन ऑलिम्पिक सुरू करेल आणि भारतीय कुस्ती महासंघाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय स्तराव पदक जिंकणारा किमान एकतरी मल्ल महाराष्ट्राचा असेल अशी मोहिम सुरू करण्यात येईल.  महिलांच्या कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने पुढाकार घेतल्यास शासन त्यालाही सहकार्य करेल, असे फडणवीस यांनी सांगितले.,

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love