शिवजयंती सोहळा किल्ले शिवनेरीवर उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा


पुणे-शिवजयंती सोहळा किल्ले शिवनेरीवर आज (शनिवारी) मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. प्रारंभी शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. जुन्नर येथील महिला पथकाने ढोल व लेझीमचे पारंपरिक सादरीकरण केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी उपमुख्यमंत्र्यांनी वाहीली.

किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव  उत्साहात साजरा झाला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री अदिती तटकरे, खासदार  छत्रपती संभाजीराजे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार  अतुल बेनके,  मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, माजी आमदार शरद सोनवणे आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  पुण्यातील शाळेचे नूतनीकरण करण्यासाठी वॅबटेक कॉर्पोरेशन आणि एनोबल फाऊंडेशन चा संयुक्त उपक्रम

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन आणि महान कार्याचा परिचय नव्या पिढीला करून देण्यासाठी शासनामार्फत महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा विकास करण्यात येत आहे, त्यांच्या मूळ रचनेला धक्का न लावता हा वारसा जतन करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राज्य स्थापन करणारे युगपुरुष होते. त्यांनी अठरापगड जातींना बरोबर घेऊन रयतेचे राज्य स्थापन केले. महाराजांसारख्या युगापुरुषाने महाराष्ट्रात जन्म घेतला हे आपले भाग्य आहे. 400 वर्षानंतरही शिवाजी महाराजांविषयी नव्या पिढीच्या मनात आदर आणि अभिमान कायम आहे. महाराजांच्या नावाने प्रत्येक पिढीला शौर्याची आणि जनकल्याणाची प्रेरणा दिली असल्याचे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

उपोषण न करण्याचे अजित पवार यांचे संभाजीराजेंना आवाहन

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजी राजे येत्या २६ नोव्हेंबरपासून उपोषणाला बसणार आहे.याबाबत कार्यक्रमानंतर अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असल्यापासून हे चाललं आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला १६ टक्के आणि मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्यात आलं. पण परत आरक्षण टिकलं नाही. त्यांनंतर आयोग स्थापन करण्यात आला. छत्रपती संभाजीराजे यांना दुसरा कार्यक्रम होता. म्हणून ते गेले. त्यांना मी आवाहन करतो की उपोषण करू नका. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच महाविकास आघाडी सरकारची भूमिका असून आरक्षणाचा प्रश्न सुटायचा असेल तर केंद्र सरकारने हस्तक्षेप करायला हवा, असे यावेळी पवार म्हणाले

अधिक वाचा  गिरीश बापट यांची पुणे विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड

राज्यात सध्या भाजपा नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात दिवसेंदिवस आरोप प्रत्यारोप होत आहे. यावर पवार यांना विचारले असता ते म्हणाले की या राज्याची संस्कृती अशी नव्हती. आम्ही सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख, मनोहर जोशी, पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्री पदाचा काळ पाहिला आहे. आत्ता प्रत्येकाने गांभीर्याने घाययला हवे. मात्र दुर्दैवाने असे घडत नाही. हे थांबायला हवं, असेही यावेळी पवार म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love