राजदत्तजी म्हणजे कलानिष्ठा व समाजनिष्ठा यांचा अपूर्व संगम : डॉ. विनय सहस्रबुद्धे


पुणे- “कलानिष्ठा आणि समाजनिष्ठा यांची एकरूपता ज्यांच्यात दिसते असे व्यक्तिमत्व म्हणजे राजदत्तजी. (Rajdattaji is a unique confluence of devotion to art and devotion to society) प्रतिभा आणि कला याचा संगम दत्ताजींच्या ठायी दिसतो. आशय आणि अभिव्यक्ती या दोन्हींतील पारंगतता कशी असू शकते याची उदहरणे दत्ताजींच्या प्रतिभेतून दिसते.” अशा शब्दांत भारतीय संस्कृतिक संबंध परिषद अर्थात आयसीसीआरचे ( ICCR)अध्यक्ष व राज्यसभा खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे (Dr. Vinay sahastrabuddhe )यांनी ज्येष्ठ मराठी दिग्दर्शक राजदत्त यांचा गौरव केला.

मिती फिल्म सोसायटीतर्फे आयोजित राजदत्त चित्रपट महोत्सव व सन्मान सोहळ्यात सहस्रबुद्धे यांच्या हस्ते राजदत्त यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.  शाल, श्रीफळ, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी ज्येष्ठ अभिनते विक्रम गोखले, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, मिती फिल्म सोसायटीचे अक्ष्यक्ष मिलिंद लेले, कार्यक्रमाचे प्रायोजक गंगोत्री होम्स एण्ड हॉलिडेजचे मकरंद केळकर यांच्यासह राजदत्त यांच्याबरोबर काम केलेले कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते तसेच समाजातील मान्यवरांसह राजदत्त यांच्यावर व त्यांच्या चित्रपटांवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोसायटीचे सचिव आमोद खळदकर यांनी मानपत्राचे वाचन केले. राजदत्त यांनी नुकतीच आपल्या वयाची नव्वद वर्षे पूर्ण केली त्यानिमित्त त्यांच्या चित्रपटांचा महोत्सव सध्या पुण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे सुरू आहे.

“खरंतर माझ्या हातून दत्ताजींचा सत्कार म्हणजे एखाद्या अर्धसाक्षर व्यक्तीकडून एखाद्या कुलाधिपतीचा सन्मान केल्यासारखं आहे. पण मी आयसीसीआरचा अध्यक्ष असल्याच्या नात्याने भारत सरकारच्या वतीने मी हा सत्कार करत आहे. दत्ताजी हे चित्रपट दिग्दर्शक म्हणून, एक अधिकारी व्यक्तिमत्व असले तरी मला ते भावतात एक कार्यकर्ता म्हणून. सामाजिक कार्यकर्ता म्हणून लख्ख भान त्यांनी जपले. चित्रपटांच्या कोणत्याही फॉर्मुल्यात ते अडकले नाहीत.” असे सांगून खा. विनय सहस्रबुद्धे पुढे म्हणाले की आता नव्या पिढीला आता भाषिक चित्रपट दाखवावे लागतील. कारण भाषेबरोबर संस्कृती पण येते. भाषिक चित्रपटांनी आता जागतिक आशा बाळगली पाहिजे. जगभरातून भारतीय चित्रपटांना मागणी आहे. चित्रपटांमध्ये प्रदर्शक आणि प्रेक्षक याच्यापलिकडे जाऊन आस्वादक कसे निर्माण होतील याची चिंता चित्रपट संस्कृती जपणाऱ्या मंडळींनी केली पाहिजे.

अधिक वाचा  जागतिक स्तरावर भारतीय सौम्य संपदेेचे महत्त्व वाढवण्यासाठी क्रियाशील होणे गरजेचे : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे 

“१९६६-६७ पासून जे मी काम केलं, जी मी कारकीर्द झाली ते मी करू शकलो यावर माझा स्वतःचाच विश्वास बसत नाही. खरोखर सांगतो. मी कलाकृती करत गेलो हे बरोबर आहे पण त्याचबरोबर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याबद्दल अधिक बोलणे किंवा त्याचेच ढोल पिटत राहणं या गोष्टी मला कराव्याशा वाटल्या नाहीत. चित्रपट झालन्यानंतर हीच शिकवण मनाशी बाळगली. मला आठवतं माझा पहिलाच चित्रपट होता मधुचंद्र. चित्रपट जेव्हा सुरू झाला तेव्हा मी लोकांच्या चेहऱ्याकडे. त्या अंधारातही लोकांचे चेहरे मला जाणवत होते. चित्रपटातून सहजपणे लोकांना त्यांच्या कष्टातून बाहेर काढता आले पाहिजे हे मला कळले. समाजाला सुदृढ, सशक्त करता येणार नाही कदाचित पण आनंदमयी करता येईल यासाठी चित्रपटाचं माध्यम आहे. प्रयोजन आहे. आम्ही कलावंतांनी केलेल्या कलाकृतीची घमेंड न बाळगता पुढच्या कृतीत यातल्या तृटी राहणार नाही या दृष्टिने कलावंताने काम करावे. खरा कलावंत कधीच गप्प राहात नाही. कायम सुधारणा करण्याची संधी शोधली पाहिजे. कलाकृती ही कायम अपूर्णच असते. त्यात कायम नवीन शोधायते असते. नवीन पिढीने हे भान बाळगावे. त्यातून स्वतःलाही आनंद मिळतो आणि इतरांनाही देता येतो.” असे म्हणत सत्कारमूर्ती राजदत्त यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

अधिक वाचा  ‘आम्ही अलार्ड आहोत, आम्ही वेगळे आहोत’:अ‍ॅलार्ड विद्यापीठ पुणे येथे २०२४ पासून प्रवेश सुरू 

राजदत्त यांच्या अनेक चित्रपटांमधून भूमिका केलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीही राजदत्त यांच्या कारकिर्दीचा व त्यांच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा गौरव केला. “गेली अनेक वर्षे माझा आणि दत्ताजींचा संबंध आहे. दत्ताजींकडे मी तीन चित्रपट केले. संहितेवर कमांड असणे म्हणजे काय हे दत्ताजींकडून शिकण्यासारखं आहे. दत्ताजींना विनोद चांगला कळतो. हसणे हाच दुःखावरचा एकमेव उपाय आहे आणि तो दत्ताजींनी आपल्या कलाकृतींमधून दाखवला.” असे गोखले यावेळी म्हणाले.

राजदत्त यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळावा – मेघराज राजे भोसले

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनीही राजदत्त यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. “मितीच्या या कार्यक्रमामुळे अनेक कलाकार आज भेटले, या दिग्गज माणसाचा सत्कार आज अनुभवायला मिळाला यासाठी मितीचे आभार. दत्ताजी म्हणजे एक विद्यापीठ आहेत. त्यामुळे त्यांचा सत्कार होताना आनंद होत आहे. दत्ताजी यांचा साधेपणा सर्वांनीच शिकण्यासारखा आहे. एक व्यक्ती म्हणून किती चागंले असावे हे आपण त्यांच्याकडे पाहून शिकावे.” असे भोसले यांनी यावेळी सांगितले. याच वेळी भोसले यांनी चित्रपटसृष्टीतील राजदत्त यांच्या विशेष योगदानासाठी त्यांना भारत सरकारचा प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी त्यांनी आयसीसीआरचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांच्याकडे केली. त्यांच्या या मागणीला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.

महोत्सवाची ‘क्लॅप’द्वारे आगळीवेगळी सुरुवात

तत्पूर्वी राजदत्त यांच्या ‘पुढचं पाऊल’ या चित्रपटामध्ये नायिकेची प्रमुख भूमिका साकारलेल्या अभिनेत्री मानसी मागीकर व अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांच्या हस्ते क्लॅप वाजवून या सोहळ्याची सुरूवात झाली. स्वतः राजदत्त, ‘सर्जा’ चित्रपटातील नायिका अभिनेत्री पूजा पवार, ‘अष्टविनायक’ चित्रपटातील नायिका वंदना पंडित, महोत्सवाचे प्रायोजक गंगोत्री होम्स एण्ड हॉलिडेजचे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मकरंद केळकर व गणेश जाधव, चित्रपट निर्माते विजय मागीकर यावेळी उपस्थित होते. यानंतर सकाळी साडेदहा वाजता पुढचं पाऊल हा चित्रपट प्रेक्षकांना दाखविण्यात आला. दुपारच्या सत्रात दोन वाजता ‘वऱ्हाडी आणि वाजंत्री’ हा चित्रपट दाखवण्यात आला.

अधिक वाचा  वी फाऊंडेशन आणि एरिक्सनच्या वतीने वंचित विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक लॅब सुरु

प्रमोद पवार यांनी घेतली राजदत्त यांची मुलाखत

सायंकाळी साडेपाच वाजता ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांनी राजदत्त यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. राजदत्त यांचा जीवनप्रवास यावेळी प्रेक्षकांसमोर उलगडला. नव्वद वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीतील अनुभव, सुरुवातीच्या काळातील संघर्षाचे दिवस, पहिला चित्रपट, ज्येष्ठ दिग्दर्शक कै. राजा परांजपे यांच्या आठवणी, त्यांच्यासोबतचे अनुभव, यशाच्या शिखरावर असताना आलेले अनुभव असा संपर्ण जीवनपट या मुलाखतीतून प्रेक्षकांच्या समोर उलगडला गेला. ‘वऱ्हाडी आणि वाजंत्री’ या चित्रपटात ग.दि.माडगूळकर, राजा परांजपे, सुलोचना ताई, शंकर पाटील, द.मा.मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर अशा दिग्गज कलावतांकडून आपण अभिनय करून घेतला त्याचा अनुभव कसा होता असा प्रश्न विचारल्यावर “कलावंत प्रत्येकामध्ये असतो, त्याला जागृत करण्याचे काम दिग्दर्शकाचे काम ते असते. मी फक्त तेवढे केले असे मला वाटते.” असे सांगत राजदत्तजींनी आपल्या दिग्दर्शकीय कौशल्याचे सूत्र व त्यामागचा विचार उपस्थितांना सांगितला. यावेळी पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर यांच्याबरोबर काम केल्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. “एखादा विषय मनात घेतला तर त्या विषयाबद्दलच विचार करायचा. विश्रांती असते ती त्यातून शांत करण्यासाठी असते. मात्र त्यानंतर मी पुन्हा मी ताजातवाना होतो.” असे सांगत आपल्या निरंतर कार्यरत राहण्यामागचे रहस्य राजदत्तजी यांनी सांगितले.

सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद लेले यांनी यावेळी प्रास्ताविक केले व या चित्रपट महोत्सव व सन्मान सोहळ्यामागची भूमिका विशद केली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love