हा विचार पाळणार कोण? त्याची सुरुवात कोण करणार आणि हा विचार कोण पुढे नेणार?–का म्हणाले असे उद्धव ठाकरे?


पुणे—धर्माधर्मामध्ये भांडणे लावू नका, समाजात तेढ निर्माण करू नका असा संदेश महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दिला. हे त्यांचे विचार आपण राजकारणी एका व्यासपीठावर आल्यावर बोलतो. हा विचार पाळणार कोण? त्याची सुरुवात कोण करणार आणि हा विचार कोण पुढे नेणार? असा सवाल करत प्रत्येकाला मर्यादेचे भान आले आणि भेद बाजूला सारता आले तर खऱ्या अर्थाने त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचले असे म्हणता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठीत  सावित्रीबाई फुले यांच्या १२  फुटी उंचीच्या पुतळ्याचं आज लोकार्पण पार पडले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच दृष्यप्रणालीद्वारे आमनेसामने आले. कार्यक्रमास गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, खा. गिरीश बापट, महापौर मुरलीधर  मोहोळजी,  विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, प्र कुलगुरु डॉ. एन.एस उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, पुतळा समितीचे अध्यक्ष डॉ. संजय चाकणे, समता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा  वारकरी संप्रदायातील आदरणीय कीर्तनकार विष्णुबुवा जोग महाराज

ठाकरे म्हणाले, मी कोणत्याही एका पक्षाबद्दल बोलत नाही परंतु फुले दाम्पत्यांनी त्याकाळात दुष्काळात अन्नछत्रं काढली. आपण काय करतो? आजचे युग हे जाहिरातबाजीचे आहे. आपण काही केलं तर बॅनरबाजी करतो. जाहिरातबाजी करतो. हे करावं लागतं. नाही तर मग हो कोणी केलयं कळलं नाही तर मतं कसे मिळणार? पण तो काळ आठवला तर महात्मा फुलेंना ना आमदार व्हायचं होती की नगरसेवक व्हायचं होतं.  सावित्रीबाईंना ना मंत्री व्हायचं होतं की पंतप्रधान व्हायचं होतं.  केवळ माझा देश आणि समाज निरोगी असावा हाच त्यांचा हेतू होता असे त्यांनी नमूद केले.

सावित्रीबाई फुले यांचे नाव त्यांच्याविषयीचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपण पुणे विद्यापीठाला दिले, मात्र त्या स्वत: एक विद्यापीठ होत्या. फुले दाम्पत्याने समाजबांधवांच्या आयुष्यात फुले फुलविण्याचा, त्यांच्या संसारात आनंद ‍निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठाने केवळ पुतळा उभारण्यापर्यंत मर्यादीत न रहाता सावित्रीबाईंच्या कार्याबाबात आदर वाटेल आणि त्यांच्या नावाला साजेसे असे अभ्यासक्रम राबवावेत, जेणेकरून विद्यापीठाचे नाव जगभरात आदराने घेतले जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा  धिरेंद्र शास्त्रीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा : सोनाली मारणे

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, जेव्हा जेव्हा मला विद्यापीठांमध्ये पदवीप्रदान कार्यक्रमांसाठी बोलविण्यात येतं तेव्हा तेव्हा ‘मेडल’ घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या सर्वाधिक असते, त्यावेळी मला खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंचं स्वप्न पूर्ण होत असल्याचा प्रत्यय येतो. या पुतळ्याच्या माध्यमातून त्यांची प्रेरणा आपले मार्ग अधिक प्रशस्त करेल अशी आशा आहे.

उदय सामंत म्हणाले, सावित्रीबाईंच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी साधारण सहा महिने कालावधी विविध परवानग्या घेण्यासाठी लागणार होता, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सर्वांच्या सहकार्याने हे काम आम्ही ४८ तासांत पूर्ण केले. प्रत्येकाच्या आयुष्यात काही भाग्याचे क्षण येतात त्यातील या पुतळ्याच्या अनवरणाच्या निमित्ताने तो क्षण माझ्याही आयुष्यात आला आहे.

पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनासाठी ३ कोटी रुपये देण्यात येतील. विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र दर्शवणारी शिल्पे, लाईव्ह शो आदी बाबींच्या निर्मितीसाठी २ कोटी रुपये देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

छगन भुजबळ महाणले, सामाजिक कार्य करणाऱ्या द्रष्ट्या महापुरुषांचे महत्व कळायला समाजाला उशीर लागतो. महात्मा फुले यांचा पहिला पुतळा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथे बसविला. अशा महापुरुषांमुळे सामान्य माणसाला समाजात प्रतिष्ठा मिळण्याचे कार्य झाले. सावित्रीबाई फुले यांच्यासमवेत फातिमाबी शेख या महिलेने  शिक्षणाचा आग्रह धरला. प्रत्येक भेद दूर सारण्याच्या महापुरुषांनी प्रयत्न केला. शिक्षण क्षेत्रात भेदाला थारा न देता विद्यार्थ्यांना शिक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, त्यातून त्यांच्या मनोवृत्तीत सकारात्मक बदल घडून येईल, असे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  महाडीबीटी पोर्टल - कृषि योजनांसाठी लॉटरी मध्ये निवड झालेल्या शेतक-यांनी पुढील कार्यवाही कशी करावी:वाचा संपूर्ण माहिती

विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले, आज शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम असलेली महिला समाजात ‍दिसते, याचे श्रेय सावित्रीबाई फुले यांचे आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्याला सावित्रीबाईंची साथ होती. त्या द्रष्ट्या समाजसुधारक होत्या. त्यांनी आणि महात्मा फुले यांनी समाजाला संघर्ष शिकविला. न्याय आणी ज्ञान यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा त्यांनी दिली. अनेक हालअपेष्टा सहन करताना त्यांनी संघर्ष केला. विधवांच्या मुलांचे संगोपन, अंधश्रद्धेचा विरोध, बालहत्येचा विरोध अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांचे कार्य मोलाचे आहे. त्यांचा ‘काव्यफुले’ हा संग्रह ज्ञानार्जन आणि ज्ञानदानाला समर्पित आहे.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना प्रगतीची संधी मिळाली. त्या कृतिशील समाजसुधारक आणी तत्वचिंतक होत्या. विधवा ‍ महिलांची बाळंतपणं त्यांनी केली होती. सावित्रीबाई फुले लिंग समानतेच्या चळवळीचा आधार होत्या. समाजातील तेढ बाजूला सारून एकरूप करण्यासाठी त्यांचे विचार मार्गदर्शक ठरतील.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love