पुणे– कॉंग्रेसला जनतेच्या मनातून उतरवण्याचा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव असून उर्जाखाते काँग्रेसकडे असल्याने त्यांची कोंडी केली जात असल्याचे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी दरेकर पुण्यात आले होते, त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी 100 युनिट पर्यत सवलत देण्याचे जाहीर केले होत. मात्र, वाढीव वीज बिल माफीसाठी एसटी प्रमाणे पॅकेज मागितले जाते आहे ते दिले गेले नाही हे पाहता, नितीन राऊत यांना तोंडावर आपटवण्याचे काम केले जाते आहे असे दरेकर म्हणाले. दरम्यान, कॉग्रेसने आपली फरफट होऊ देऊ नये त्यांनी त्याची भूमिका मांडावी असे मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले आहे.
कोरोना काळात जी अवाजवी वीजबिल आले ते सरकारला संकट काळात शोभणारे नाही, आता आलेली बिले कशी योग्य आहेत हे सांगण्यासाठी मेळावे घेतले जाणार आहेत मात्र भाजप हे ग्राहक मेळावे होऊ देणार नाही, ते उधळून लावू असा इशारा दरेकर यांनी दिला. वीज बिलाबाबत निर्णय झाल्याशिवाय असे मेळावे होऊ देणार नाही असे दरेकर म्हणाले.तसेच राज्यात शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, शिक्षण मंत्री, राज्यमंत्री आणि सरकार म्हणून वेग वेगळे बोलले जाते आहे या सरकारने शिक्षण खात्याचा बट्ट्याबोळ लावला आहे तिन्ही पक्षाचे त्रांगडे आहे अशी टीका त्यांनी केली.
भगवा शिवसेनेचा पेटंट नाही
दरेकर यांनी मुंबई निवडणुकीवरून भाजपला लक्ष करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली, संजय राऊत हे पूर्णपणे आत्मविश्वास हरवलेले दिसले फडणवीस यांनी विचारलेल्या आठ दहा प्रश्नावर राऊत बोलू शकले नाही, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार म्हणता , आम्ही काय मेलेल्या आईचे दूध पिलेलो नाही, भाजप मध्ये काय मराठी माणसे नाहीत का?असा प्रश्न दरेकर यांनी विचारला आहे तर भगवा हा काही शिवसेनेचे पेटंट नाही, जनता ठरवणार भगवा कोणाच्या हातात द्यायचा मुंबई निवडणुकीनंतर कळेल, भगवा सगळ्यांचा आहे शिवसेनेला काही पेटंट दिलेलं नाही असे दरेकर म्हणाले. तसेच सामना म्हणजे काय महाराष्ट्राला दिशा देणारे मुखपत्र आहे का, त्यात आलेल्या बातमीवर प्रतिक्रिया द्यायला असे दरेकर म्हणाले.
पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीबाबत बोलताना, ते म्हणाले,राज्यात गेल्या वर्षभरात ठाकरे सरकारची परिस्थिती पाहिली तर कोणाचा कोणाला मेळ नाही सुसंवाद नाही अशी परिस्थिती आहे तर देशभरात भाजपच्या पाठीशी मतदार असल्याचे चित्र पाहता पुणे पदवीधर निवडणुकीत मतदार संग्राम देशमुख यांना निवडून देतील असा दावा दरेकर यांनी केला.