जेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन


पुणे- जेष्ठ साहित्यिक, चिपळूण येथे झालेल्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले यांचे बुधवारी (दि.३० नोव्हेंबर) दु:खद निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी डॉ.विजया कोतापल्ले, मुलगा सायन पब्लिकेशन्सचे संचालक नितीन कोतापल्ले, सून, आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज रात्री साडेआठ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

डॉ. कोतापल्ले यांना फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रासले होते. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. उपचारासाठी त्यांना अधून मधून रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती आणखी खालवल्याने त्यांना पुन्हा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते बेशुध्द अवस्थेत होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांनी बुधवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला.

सामाजिक भान असलेले लेखक म्हणून डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची ओळख होती. ते राज्य सरकारच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष होते. कथालेखक, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले नागनाथ लालुजीराव कोत्तापल्ले यांचा जन्म २९ मार्च १९४८ रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड या गावी झाला. १९६९ साली देगलूर येथील महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. ची पदवी मिळविली. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठातून एम. ए. आणि १९८१ साली पीएच. डी. ची पदवी ही त्यांनी मिळविली.

मराठीच्या पदव्युत्तर परीक्षेत ते तत्कालीन मराठवाडा विद्यापीठात सुवर्णपदकाचे मानकरी ठरले होते. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बीड येथील बंकटस्वामी महाविद्यालयात नोकरीला सुरुवात केली तिथे त्यांनी १९७१ ते १९७७ या काळात अध्यापन केले. त्यानंतर ते औरंगाबादला विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक झाले. १९९३ च्या सुमारास ते पुणे विद्यापीठात प्राध्यापक बनले. तेथे ते विभागप्रमुख असताना त्यांची औरगांबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नेमणूक झाली.ती जबाबदारी  त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

अधिक वाचा  'ती'च्या मानसिक सबलीकरणाचे महत्व आणि स्वयंपूर्ण उपचार

मराठी ग्रामीण साहित्यात त्यांचे मोठे योगदान आहे. ग्रामीण कथालेखक, कादंबरीकार, कवी, समीक्षक अशी त्यांची ओळख आहे. १९७० पासून त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली होती. ‘मूडस्’ हा त्यांचा कविता संग्रह १९७६ साली प्रसिद्ध झाला. ‘कर्फ्यू आणि इतर कथा’, ‘संदर्भ’ हे दोन कथासंग्रह , त्यानंतर प्रकाशित झाले. ‘कवीची गोष्ट’ आणि ‘सावित्रीचा निर्णय’ हे दीर्घकथा संग्रह सुद्धा गाजले. ‘गांधारीचे डोळे’, ‘मध्यरात्र’ या कादंबऱ्या आणि इतरही बरेच ललित साहित्य प्रसिद्ध आहे. ‘साहित्याचा अन्वयार्थ’, ‘आधुनिक मराठी कविता, ’‘नवकथाकार शंकर पाटील’, ‘ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि बोध’ इत्यादी विषयांवर केलेले समीक्षा लेखनही ग्रंथरूपाने प्रसिद्ध आहे.

‘निवडक बी. रघुनाथ’ आणि ‘स्त्रीपुरुषतुलना’ या ग्रंथांचे संपादनही नागनाथ कोत्तापल्ले यांनीकेले आहे. या व्यतिरिक्त अनेक विषयांवरील त्यांचे लेख प्रकाशित झालेले आहेत. महात्मा फुले यांज्या जीवनावरील डॉ. कोत्तापल्ले यांचा ‘ज्योतीपर्व’ हा ग्रंथ त्यांच्या सामाजिक व परिवर्तनवादी विचारांची साक्ष देतो. नागनाथ कोत्तापल्ले हे एक चांगले वक्ते म्हणूनही महाराष्ट्राला परिचयाचे आहेत.

शिक्षणाच्या निमित्ताने त्यांचे औरंगाबादशी घनिष्ठ संबंध होतेच. कुलगुरूपदाने ते दृढ झाले. विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात शिक्षण घेताना त्यांनी मराठवाडा साहित्य परिषदेत नोकरी केली. साहित्य परिषदेच्या खोलीत राहून शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडीअडचणींची त्यांना जाणीव होती. या जाणिवेतूनच त्यांनी ‘कमवा व शिका’ ही योजना बळकट करताना विद्यार्थ्यांचे मानधन वाढवले. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ झाला.

अधिक वाचा  भारतीय मजदूर संघाने सुचवलेल्या आय आर कोड व हेल्थ अँड सेफ्टी कोडमध्ये केंद्र सरकारने सुधारणा कराव्यात

कॉपीमुक्ती अभियान यशस्वी करणारे ते एकमेव कुलगुरू ठरले. कॉपीमुक्तीसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले पत्र फार प्रभावी ठरले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्त कॉपीमुक्ती स्वीकारली. विद्याथीर् संघटना व विद्यापीठ प्रशासन यांच्यात समन्वय निर्माण करण्यात डॉ. कोत्तापल्ले यांना यश आले.

नॅक, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, बालपुरस्कार समिती आणि एसएससी बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असे कामही त्यांनी केले आहे. याउपर, नागनाथ कोतापल्ले हे १९८८ ते ९५ या काळात मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह, १९९५ ते ९६ मध्ये साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या मराठी वाङ्मयकोशाचे समन्वय संपादक होते. तसेच ‘प्रतिष्ठान’ या नियतकालिकाचे संपादक म्हणुनही त्यांनी काम केले आहे.

मुंबईतले युवक साहित्य संमेलन, श्रीगोंद्यात आठवे ग्रामीण साहित्य संमेलन आणि कराडजवळ उंडाळे येथील साहित्य संमेलन, पुण्यातील पहिले औंध उपनगरीय मराठी साहित्य संमेलन (२००३) राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन इत्यादी संमेलनांची अध्यक्षपदे नागनाथ कोतापल्ले यांनी भूषविली आहेत. याशिवाय, ते २०१२ मध्ये चिपळूण येथील ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष होते.

अधिक वाचा  #पंतप्रधान मोदी पुणे दौरा: एनडीए व इंडिया फ्रंट आमनेसामने येणार

प्रकाशित साहित्य

कविता संग्रह

कृष्णमेघ

मूड्स

दारोबस्त लिंपुन घ्यावा मेंदू (सायन प्रकाशन,पुणे -२०१९)

कादंबरी व कथासंग्रह

कर्फ्यू आणि इतर कथा

कवीची गोष्ट

गांधारीचे डोळे

देवाचे डोळे

पराभव

मध्यरात्र

रक्त आणि पाऊस

राजधानी

संदर्भ

सावित्रीचा निर्णय

उद्याच्या सुंदर दिवसांसाठी

समीक्षण, वैचारिक

अपार्थिवाचे गाणे

अस्तित्वाची शुभ्र शिडे

आधुनिक मराठी कविता: एक दृष्टिक्षेप

ग्रामीण साहित्य स्वरूप व शोध

ज्योतिपर्व

दहा समीक्षक

नवकथाकार शंकर पाटील

निवडक बी. रघुनाथ

पाचोळा

पापुद्रे

साहित्याचा अन्वयार्थ

साहित्याचा अवकाश (समीक्षा)

स्त्री-पुरुष तुलना

नागनाथ कोत्तापल्ले यांना मिळालेले पुरस्कार:

पुणे मराठी ग्रंथालयाचा साहित्य सम्राट न. चिं. केळकर साहित्य पुरस्कार [६]

महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेले ग्रंथ

मूड्स (१९७६)

संदर्भ (१९८४)

गांधारीचे डोळे (१९८५)

ग्रामीण साहित्य (१९८५)

उद्याच्या सुंदर दिवसासाठी (२००२)

ग्रामीण साहित्य स्वरूप आणि शोधसाठी परिमल पुरस्कार (१९८५)

ज्योतिपर्व साठी केशवराव विचारे पारितोषिक (२००२)

दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन सूर्योदय साहित्यरत्न पुरस्कार (२०१८)

यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार (२००१)

राख आणि पाऊससाठी बी. रघुनाथ पुरस्कार (१९९५)

राख आणि पाऊससाठी महात्मा फुले पुरस्कार (१९९५)

साहित्य अवकाशसाठी शिरीष गांधी साहित्य पुरस्कार

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love