पुणे- सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यातील यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी 3 मेचा अल्टीमेटम दिला असून भोंगे काढले नाहीतर त्याच्यासमोर भोंगे लावून हनुमान चालीसा म्हटला जाईल असा इशारा त्यांनी दिला असतानाच खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ समोर हनुमान चालीसा पठन करण्यासाठी थेट मुंबई गाठली. राणा दाम्पत्य आणि शिवसैनिक समोरासमोर भिडले. या प्रकरणावरून राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री ईडी आणि सीबीआयच्या कारवाईनंतर तुरुंगात आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर अनेक आरोप केल्याने वातावरण चिघळले आहे. त्यातच सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे आणि राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपति राजवट लागू केली जाण्याची शक्यता राजकीय क्षेत्रात सुरू आहेत.
दरम्यान, भाजपाकडून राष्ट्रपती राजवट लागण्याची मागणी होत असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी,सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. सगळेच माझ्यासारखे नसतात. निवडणुकांपूर्वीच काही लोकांनी ‘मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार’, अशा घोषणा दिल्या होत्या. त्यामुळेच ते सध्या अस्वस्थ होत असतील, तर मी त्यांना दोष देणार नाही, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला.
सत्ता येते आणि जाते…पण त्यामुळे अस्वस्थ होण्याचं कारण नाही. पण सध्या काही लोक फार अस्वस्थ आहेत. पण त्यांना दोष देता येऊ शकत नाही. कारण निवडणुका होण्यापूर्वीच मी येणार, मी येणार अशा घोषणा त्यांनी केल्या. पण ते घडू शकलं नाही याची अस्वस्थता असते. पण या सर्वांना या परिस्थितीतून काय परिणाम हे लक्षात येईल आणि योग्य वातावरण निर्माण करण्यास सहकार्य लागेल अशी अपेक्षा करुयात, असं शरद पवार म्हणाले.
“सत्ता गेल्यानतंर लोक अस्वस्थ होतात. सगळे माझ्यासारखे नसतात. १९८० मध्ये माझं सरकार बरखास्त केलं. रात्री १२.३० वाजता मुख्य सचिवांनी मला ही माहिती दिली. त्यानंतर तीन चार मित्रांना बोलावलं आणि घरातल सामान आवरलं. सकाळी ७ वाजता दुसऱ्या जागेत राहायला गेलो, सरकारी गाडी सोडली. त्यादिवशी इंग्लंड आणि भारताचा सामना होता. १० वाजता वानखेडे स्टेडियमला सामना पाहण्यासाठी गेलो आणि दिवसभर सामन्याचा आनंद लुटला”.