जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेखमाला- ‘मुलखावेगळी ती’ : जिद्दी सविता

महाराष्ट्र लेख
Spread the love

जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेखमाला-  ‘मुलखावेगळी ी’

गार्गी – मैत्रेयी, राणी चेन्नम्मा – लक्ष्मीबाई, संत बहिणाबाई – कान्होपात्रा यांच्यापासून सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी, कॅप्टन लक्ष्मी, कल्पना चावला, पी. टी. उषा अशा अनेकानेक महिलांनी शिक्षण, ज्ञान, विज्ञान, क्रीडा, पराक्रम, अध्यात्म आदी विविध क्षेत्रांमध्ये यापूर्वीच्या काळात भारताचा गौरव वृद्धिंगत केला आहे. भारतमातेच्या या वीरांगना अगणित आहेत. जागतिक महिला दिनानिमित्ताने त्यांचे स्मरण करीत वर्तमानात  प्रेरणादायी कार्य करणाऱ्या असामान्य महिलांचा आपण परिचय करून घेऊ या.

जिद्दी सविता

कोविडची पहिली लाट सगळ्याच बाजूंनी हादरवून टाकणारी होतीच, पण त्याहीपेक्षा ती जगण्याचाच ताण आणणारी होती. अशा वेळी एक २८ वर्षांची तरुणी अकोल्याहून जिवाची पर्वा न करता पुन्हा पुण्यात येते. ग्रामीण भागातून बाहेर पडणं तिला खूप कठीण होतं पण ही मुलगी ‘मी सेवाकार्यात आहे आणि आत्ता माझी समाजाला गरज आहे’ असं जिल्हाधिकार्यांाना सांगून, हातावर क्वारंटाईनचा शिक्का असूनही हजार प्रयत्नांनी परवानगी मिळवते. येरवड्यात ‘सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प’ या संस्थेत कार्यरत असणाऱ्या सविता भांगरे नावाच्या जिद्दी मुलीची ही प्रेरणादायी कथा.

तांभोळ नावाच्या गावात शेतकरी संयुक्त कुटुंबात जन्मलेल्या सविताने शिक्षणासाठी काही किलोमीटर चालत जाऊन   ग्रामीण भागात बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर आधी स्वतःच्या पायावर उभं राहण्याची गरज ओळखून सविताने डी.एड्.ला प्रवेश घेतला. जिद्दीने ती डी.एड्. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. त्यानंतर केवळ स्वतःसाठी पैसे मिळवणं, एवढाच संकुचित विचार तिच्यासमोर नव्हता. ज्या समाजात, ज्या देशात मी जन्माला आले, त्या भूमीचं मी देणं लागते, ही सविताची उत्स्फूर्त भावना तिचं वेगळेपण अधोरेखित करते. तिने एम्.एस्.डब्ल्यू. करण्यासाठी प्रवेश घेतला. त्या माध्यमातून शिक्षण सुरू असताना एका मैत्रिणीबरोबर कशीबशी एक खोली भाड्याने मिळाली आणि शिक्षणाबरोबरच कामही सुरू झालं. पण इतकं सरळ आयुष्य नसतंच, एका मध्यरात्री घरमालकाने या दोन मुलींना दादागिरी करून, कोणतंही कारण नसताना खोलीबाहेर काढलं. रात्र कशी काढायची, हा फार मोठा प्रश्न होता. कशाबशा दोघी एका ओळखीच्या ठिकाणी गेल्या, मात्र सकाळ होताच ती दुसरी मुलगी न सांगताच घरी निघून गेली. पण हार न मानता एम.एस.डब्लू ला  दुसर्यास क्रमांकाने उत्तीर्ण होत तिने   हाती घेतलेलं काम पूर्ण केलं आणि स्पार्क संस्थेच्या माध्यमातून पुण्याला आली. विजय शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली तिने काम सुरू केलं. तिने  एकल पद्धतीने सेवावस्त्यांमध्ये जाऊन काम करणं निवडले.

दारिद्रय, व्यसनाधीनता, निरक्षरता यांच्यापेक्षा मोठी समस्या इथे असते, ती जाणिवांच्या अभावाची! अशी एकेक वस्ती सविताने पिंजून काढली, घराघरांमध्ये तासन् तास बसून घरातल्या स्त्रियांच्या स्वावलंबनाबाबत समुपदेशन केलं, वस्तीतल्या स्त्रियांना व्यवसाय कौशल्य आत्मसात करण्यासाठी, स्वावलंबी होण्यासाठी घराबाहेर पडायला लावलं. जिद्द,चिकाटी, संभाषण कौशल्य आणि स्त्री सबलीकरणाचा ध्यास हे सविताचे बलस्थान आहे. त्या आधारे तिने आजवर जवळजवळ तीस ते चाळीस सेवावस्त्यांमध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचा प्रयत्न केला आहे.

समाजमन बदलणं सोपं नक्कीच नाही. पण जेव्हा तळागाळातल्या लोकांना आपल्या निर्मळ हेतूबद्दल विश्वास वाटतो, तेव्हा मात्र हीच माणसं जिवाला जीव द्यायला मागेपुढे पाहत नाहीत. गेल्या पाच वर्षांत सविताच्या कामाची पुरेशी पोचपावती म्हणजे, तिने स्वतःच्या पायावर उभ्या केलेल्या असंख्य महिला! आपण जिथे जायला सहसा तयार होणार नाही, त्या वस्त्यांमध्ये सविता हक्काने त्यांची ‘ताई’ म्हणून जाते. त्यांना विविध कौशल्ये ,त्यांना येत असलेल्या कामाबाबत विश्वास देत अनेक महिला स्वतःच्या पायावर उभे राहून कुटुंबाचा चरितार्थ चालवत आहेत.

माणसांमध्ये काम करताना जे समाधान मिळतं, जी ऊर्जा मिळते  तीच सविताला   अनमोल वाटते. लॉकडाऊनमध्ये तिने खूप  काम केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून त्यावेळी उभ्या असलेल्या आयसोलेशन सेंटरमध्ये रुग्णांची सेवा करण्यासाठी गेलेल्या सविताने त्या पंधरा दिवसांचं ‘सुराज्य’ मधलं मानधन नाकारलं, सेवाकार्याचं मोल याहून अधिक काय असायला हवं!

सविताची कहाणी अत्यंत जिद्दीची, कष्टांची तर आहेच, पण त्याचबरोबर आपल्या सामाजिक जाणिवा समृद्ध करणारी आहे.

लेखिका  – आसावरी देशपांडे जोशी

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *