भारताने जगाला करून दाखविले : पंतप्रधान नरेंद्र मोदी : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे- व्यवस्था निर्माणातून संस्था निर्माण, संस्था निर्माणातून व्यक्तीनिर्माण आणि व्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्माण, ही दृष्टी राष्ट्राच्या भविष्याकरिता एखाद्या रोडमॅपसारखी असते. लोकमान्य टिळकांच्या (Lokmanya Tilak) राष्ट्रनिर्माणाच्या या रोडमॅपनुसारच केंद्र सरकारची आज वाटचाल सुरू आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधनाबरोबरच अर्थव्यवस्थेच्या पातळीवरही भारताने कृतीतून जगाला करून दाखविले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी येथे केले.

‘लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट’च्या (Lokmanya Tilak Smarak Trust) वतीने (हिंद स्वराज्य संघ) (Hind Swarajya Sangh) देण्यात येणारा यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ पंतप्रधान मोदी यांना टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक (Dr. Dipak Tilak) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे(Sushilkumar Shinde), राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) , उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) , डॉ. रोहित टिळक(Rohit Tilak), गीताली टिळक-मोने, प्रणती टिळक आदी उपस्थित होते.

देशाला अनेक महानायक देणाऱया महाराष्ट्राच्या भूमीला वंदन, अशी अस्खलित मराठीमध्ये सुरुवात करीत मोदी म्हणाले, टिळक म्हणजे स्वातंत्र्याच्या इतिहासाच्या माथ्यावरचा टिळा होय. स्वातंत्र्यलढय़ात त्यांनी जे योगदान दिले, ते शब्दात वर्णिता येणार नाही. टिळकांनी लढय़ाची दिशा बदलली. सर्वांवरच आपली छाप उमटविली. म्हणून ‘भारतीय असंतोषकाचे जनक’ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. महात्मा गांधींनीही आधुनिक भारताचे निर्माते म्हणून त्यांचा गौरव केला होता. कोणताही महान नेता मोठे लक्ष्य गाठण्याकरिता केवळ स्वत:ला समर्पितच करीत नाही, तर संस्था व व्यवस्थाही तयार करतो. अशा चिंतनशील, दूरदर्शी नेत्यांपैकी टिळक एक होते. समाजाला जोडण्यासाठी टिळकांनी गणेशोत्सव, शिवजयंतीसारखे उत्सव सुरू केले. पत्रकारितेतून जनतेचा आवाज बुलंद ठेवला. परंपरांचेही पोषण करण्याचे काम केले. आज टिळकांचे राष्ट्रनिर्माणाचे कामच आम्ही प्रभावी पद्धतीने पुढे घेऊन जात आहोत. कोरोना संकटात आपल्या संशोधकांनी लस विकसित करीत देश याबाबतीत आत्मनिर्भर असल्याची प्रचीती दिली. अर्थव्यवस्थेतही पाचव्या क्रमांकावर झेप घेत भारताने आपण काय करू शकतो, हे दाखवून दिले आहे. म्हणूनच जगाला आज भारत हे उद्याचे भविष्य वाटते. 

 लोकमान्य टिळकांच्या अहमदाबादमधील भाषणाचा सरदार पटेलांवर प्रभाव पडला होता. त्यानंतर काही वर्षांनंतर अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष असताना पटेलांनी तेथील ‘व्हिक्टोरिया गार्डन’ येथे टिळकांचा पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यावर दबाव आणल्यानंतरही ते ठाम राहिले. 1929 ला गांधींनीच या पुतळय़ाचे लोकार्पण केले. आज मात्र एखाद्या रस्त्याचे नाव बदलायचे झाले, तर अनेक जण आरडाओरड करतात. काही जणांची झोप खराब होते, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. लोकमान्यांनी सावरकरांची क्षमता ओळखली होती. इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी चांगले शिकावे व येथे येऊन देशसेवा करावी, असे त्यांना वाटत असे. त्यामुळे सावरकरांच्या नावाची शिफारस त्यांनी एका स्कालॅरशीपसाठी केली व त्याआधारे सावरकरांना बॅरिस्टर ही पदवी मिळविता आली, असेही त्यांनी सांगितले. 

 पुरस्काराची रक्कम ‘नमामि गंगे’ला 

 लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार ही माझ्यासाठी सौभाग्याची बाब आहे. हा अविस्मरणीय अनुभव असून, या पुरस्कारामुळे माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे. भारतातील 140 कोटी जनतेला मी हा पुरस्कार समर्पित करतो. जनतेच्या सेवेत मी कोणतीही कसर सोडणार नाही, अशी कृतज्ञता व्यक्त करीत पुरस्काराची रक्कम नमामि गंगेकरिता देत असल्याचे मोदी यांनी जाहीर केले. 

 पवारांकडून मोदींचे दोन ओळीत अभिनंदन 

 शरद पवार यांनी पुरस्काराबद्दल मोदी यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांच्याबरोबरच मोदी यांचीही आज या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. याचा आनंद झाला, अशा शब्दांत त्यांचे अभिनंदन केले.

 पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायांकडून : पवारांचा चिमटा 

पुण्याच्या भूमीतच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे निर्माण केले. इतकेच नव्हे, तर पहिला सर्जिकल स्ट्राईकही महाराजांनी शाहिस्तेखानावर केला, असा चिमटा पवार यांनी काढला. सामान्य माणसाला जागे करण्याकरिता टिळकांनी पत्रकारितेचे शस्त्र वापरले. इंग्रजांविरूद्ध लढा दिला. पत्रकारिता दबावमुक्त हवी. त्यावर कोणताही दबाव नको, असा टिळकांचा आग्रह होता, याकडे पवार यांनी लक्ष वेधले. 

 शिंदेंची मोदींवर स्तुतीसुमने 

एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमने उधळली. आपल्या 9 वर्षांतील कामातून पंतप्रधान मोदी यांनी लोकमान्यता मिळविली आहे. सबका साथ, सबका विकास, हे सूत्र ठेऊन देशात सुराज्य निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मोठमोठय़ा देशांची अर्थव्यवस्था कोलमडत असताना त्यांनी देशाला दहाव्या क्रमांकावरून पाच क्रमांकावर आणले. 370 कलम, राममंदिर, वाराणशी विकास यांसारखी कामे मार्गी लावली. हा त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान असल्याचे गौरवोद्गार शिंदे यांनी काढले. 

शरद पवारांची मोदींना थाप

 पंतप्रधान मोदी जेव्हा शरद पवार यांच्याजवळ पोहोचले, तेव्हा पवार यांनी हस्तांदोलन करीत मोदी यांचे स्वागत केले. त्या वेळी क्षणभर दोघांमध्ये काहीतरी चर्चा झाली. त्यानंतर पवारांनी मनमोकळेपणाने हसून त्यांच्या पाठीवर थाप टाकली. मात्र, दोघांमध्ये नेमके काय बोलणे झाले, हे कळू शकले नाही. 

 मोदींनी अजितदादांना थोपटले 

 मोदी यांनी मुख्यमंत्री शिंदे व फडणवीस यांनाही हात मिळविला. त्यानंतर त्यांनी अजितदादांना हात मिळविलाच. शिवाय त्यांच्या हाताला हलकेचे थोपटले. अजितदादांनीही त्या वेळी सूचक हास्य केले. 

 अजितदादांनी पवारांना टाळले

 दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार व अजितदादा हे प्रथमच एकाच व्यासपीठावर आले. भाषणात प्रोटोकॉलनुसार पवारांनी अजितदादांचे नाव घेतले. मात्र, अगदी सर्वांच्या आधी मंचावर आलेल्या पवारांना सामोरे जायचे दादांनी टाळले. येताना आणि जाताना ते शरद पवारांच्या मागच्या बाजूने काही न बोलता तसेच निघून गेले. 

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *