पुणे- राष्ट्रवादीमध्ये (ncp) दोन गट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी छगन भुजबळ(Chhgan Bhujbal) यांच्या मतदार संघात पहिली सभा घेतली. तेव्हापासून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आक्रमक झाले असून संधी मिळेल तेव्हा ते शरद पवार यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाही. गेल्या शुक्रवारी (दि. ६ ऑक्टोबर) राष्ट्रवादी नक्की कोणाची? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Central Election Commision) सुनावणी झाली. त्याला शरद पवार स्वत: उपस्थित होते. त्यावरून छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार कोर्ट कचेरी, करणार नाही म्हणाले होते. तेच आयोगात हजर होते, अशी टीका भुजबळांनी पवारांवर केली होती. यावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर दिले आहे.
“आईने माझ्यावर केलेले संस्कार थोडेसे वेगळे आहेत. ज्यांच्या ताटात आपण जेवलो ते कधी विसरायचे नसते. छगन भुजबळ सतत शरद पवारांवर टीका करतात. ते वयाने मोठे असल्याने मी त्यांना उत्तर देणार नाही. माझ्या वयाचे असते, तर करारा जबाब दिला असता,” असा हल्लाबोल सुप्रिया सुळेंनी केला आहे. त्या सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
“शरद पवार म्हणाले होते कोर्ट, कचेरी करणार नाही. तेच निवडणूक आयोगात हजर होते. शरद पवार म्हणतात, मी राष्ट्रवादीचा संस्थापक अध्यक्ष आहे. मग मी सुद्धा संस्थापक प्रदेशाध्यक्ष आहे. माझ्याच घरी राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह ठरवलं गेलं. मग, आमचाही खारीचा वाटा आहे की नाही?” असा सवाल भुजबळांनी शरद पवारांना विचारला होता.