गीता आणि दासबोध

लेख
Spread the love

प्रवृत्ती आणि निवृत्तीचा सुंदर समन्वय

भगवद्गीता हा “जीवन ग्रंथ” असून तो नुसता पाठांतरासाठी अथवा शाब्दिक अभ्यासासाठी नाही तर आचरणात आणण्यासाठी आहे . त्यातील जीवन तत्वज्ञान “कालातीत” असून , मनुष्यजन्माच ऐहिक आणि पारलौकिक अशा दोन्ही दृष्टीने सर्वार्थाने कल्याण करणारे आहे . भगवंतांनी श्रीकृष्ण अवतारात सांगितलेल्या या तत्वज्ञानाच्या आधारावरच संतांचे ग्रंथ आणि त्यातील तत्वज्ञान असल्यामुळे ते सुद्धा कालातीत आणि आचरण योग्य आहेत . प्रस्तुत लेखात नियोजित शब्द मर्यादेत भगवद्गीता आणि दासबोध यामधून भगवंतांनी आणि त्यायोगे समर्थांनी सांगितलेली अध्यात्म शास्त्रातील सूक्ष्म आणि गूढ प्रमेये उकलून  दाखवणे किंवा दोन्ही ग्रंथांची तुलना करणे हा उद्देश नसून ,या दोन्ही ग्रंथांची ऐतिहासिक पार्श्वभूमी , त्यातील काही साम्य स्थळे आणि सध्याच्या सर्वार्थाने प्रदूषित मानवी जीवनात त्याच प्रत्यक्ष आचरण याच महत्व अधोरेखित करण , हा प्रामाणिक हेतू आहे .

महाराष्ट्र ही संतांची भूमी असून , गेली अनेक शतके श्री ज्ञानेश्वरी आणि ग्रंथराज दासबोध या दोन महान संतांच्या “अमृत ग्रंथांनी” आजपर्यंत शुद्ध अध्यात्म ज्ञान जीवंत ठेवल आहे . श्री  ज्ञानेश्वर महाराज आणि समर्थ रामदासस्वामी दोघेही भक्तोत्तम होते आणि दोघांनी गीतेच्या  आधारावरच आपल्या आत्मविद्येने श्रीमंत ग्रंथांची रचना केली . श्री ज्ञानेश्वरी हा भगवान गोपलकृष्णाचा “ कृपा प्रसाद “असून , दासबोध हा श्रीरामचंद्रांचा कृपा प्रसाद आहे अशी समर्थांची धारणा आहे .

भक्ताचेनी साभिमाने | कृपा केली दाशरथीने |

समर्थ कृपेची वचने | तो हा दासबोध ||

समर्थांनी दासबोधात गीतेच्या आधारे ज्ञान , भक्ती ,  कर्म ,योग यांच  सूक्ष्म चिंतन मांडल असल ,तरी या ग्रंथाचा पाया भक्ती हाच आहे .

भक्तीचेनि योगे देव | निश्चये पावती मानव |

ऐसा आहे अभिप्राव| इये ग्रंथी ||

या ग्रंथाची पार्श्वभूमी सांगताना समर्थ पहिल्या समासात म्हणतात ,की मी माझ्या पदरच काहीही सांगत नसून यापूर्वी भगवंतांनी जे ज्ञान सांगितल आहे , तेच मी प्राकृत भाषेत मांडत आहे

भगवद्वचनी अविश्वासे | ऐसा कोण पतित असे |

भगवद्वाक्याविरहित नसे | बोलणे येथिचे ||

गीता आणि दासबोध ही दोन्ही ग्रंथ “ गुरु शिष्यांचा संवाद” आहेत .आपले बहुसंख्य आध्यात्मिक ग्रंथ असेच गुरु शिष्यांच्या प्रश्नोत्तररूपाने निर्माण झाले आहेत .   

ग्रंथानाम दासबोध | गुरु शिष्यांचा संवाद|

येथ बोलिला विशद | भक्तिमार्ग ||

विशेष म्हणजे दासबोध हा गुरु आणि त्यांचा एक शिष्य यांच्यातील संवाद नसून , अनेक शिष्यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरातून साकारलेला ग्रंथ आहे . अर्जुनाची एक विशिष्ट  आध्यात्मिक पातळी असून , त्या भूमिकेतून त्याने भगवंतांना  प्रश्न विचारले आहेत . दासबोधात मात्र प्रश्नकर्त्या शिष्यांची समान बौद्धिक आणि आध्यात्मिक पातळी नाही . त्यांनी केवळ अध्यात्मिकच नाही तर व्यावहारिक आणि भौतिक जीवनातील प्रश्न ही उपस्थित केले आहेत . समर्थांनीही प्रत्येकाच्या पातळीवर येऊन उत्तरे दिली आहेत . हे  समर्थांच्या “संतपणाच “ वैशिष्ट्य असून ,भगवंत आणि संत यांच्यातील हा फरकही मोठा हृद्य आहे .

ऐसे हे संत श्रीमंत | मोक्षश्रिया अलंकृत |

जीव दरिद्री असंख्यात | नृपति केले || 

गीता आणि दासबोध या दोन्ही ग्रंथांची ऐतिहासिक पार्श्वभूमीही समान असून ,ते “युद्धजन्य” परिस्थितीत निर्माण झाले आहेत .

हतोवा प्राप्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महीम् |

तस्मात् उतिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः ||

असा उपदेश करून ,युद्धभूमीवर भगवंतांनी अर्जुनातील शौर्य , धैर्य , पराक्रम ,वीरता जागृत केली आणि त्याला अधर्म , अनीति ,अन्याय , अत्याचारा विरुद्ध लढायला प्रवृत्त करून , “स्वधर्माचा “ उपदेश केला . महाराष्ट्राच्या इतिहासातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या काळात, समर्थांनी समाजात मिसळून हेच भगवद्कार्य केल . त्याकाळात यवनी अत्याचाराने सर्व समाज विस्कळीत आणि दिशाहीन झाला होता! स्वधर्म , स्वदेश, स्वराज्य , स्वकर्तव्य याबाबतीत पराकोटीचा उदासीन झाला होता.  खराधर्म आणि परमार्थ लोप पावला होता .सतत भय , चिंता , अस्थिरता ,दारिद्र्य यामुळे समाज हीन दिन झाला होता. सकळ पृथ्वी आंदोळली |धर्म गेला || अशी समाजाची दयनीय अवस्था पाहून , अखंड एकांताची सवय असणारा समर्थांसारखा  महात्मा द्रवला आणि राक्षसी राजवटी विरुद्ध पेटून उठला !

मारिता मारिता मारावे | तेणे गतीस पावावे असा उपदेश करून “राजनीती” ही समर्थांनी धर्म स्थापनेच प्रमुख साधन मानल आणि स्वराज्यासाठी काट्याने काटा काढावा | परंतु कळोचि नेदावा | ही कृष्णनीती समर्थांनी आचरणात आणली .

अशाप्रकारे प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा संगम असणारे भगवंतांनी गीतेत सांगितलेल्या जीवन तत्वज्ञानाच प्रतिबिंब समर्थांच्या दासबोधातही पाहायला मिळत . शक्ति , युक्ती  आणि भक्ती यांचा उत्तम समन्वय असणाऱ्या  गीता आणि दासबोध या दोन महान ग्रंथांची शिकवण आजही सर्वांना मार्गदर्शक आणि आचरण योग्य आहे हे  निश्चित!   

दीपा भंडारे

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *