निमित्त सुशांतसिंह राजपुतचे

महाराष्ट्र लेख
Spread the love

सुशांतसिंहला जावून आज एक वर्ष (१४ जून) पूर्ण होत आहे. त्याच्या मृत्यूनंतर अत्यंत वेगाने घडलेल्या राजकीय घडामोडी, मृत्यूकेंद्रीत निवडणुक प्रचार व सिनेसृष्टीतील black secrets ने अनेकांचे लक्ष वेधले परंतु याच निमित्ताने अनेक पालकांच्या मनात अनेक धोक्याच्या घंटाही वाजू लागल्या. सामाजिक, कौटुंबिक व भावनिक- मानसिकस्तरावरील अनेक प्रश्न परत एकदा या निमित्ताने ऐरणीवर आले.

‘आत्महत्या’ या विषयावर आधारित ‘छिछोरे’ हा सिनेमा करणाऱ्या सुशांत सिंह राजपुतने ‘आत्महत्या हा पर्याय नाही’ सांगत स्वताचे आयुष्य मात्र आत्महत्येचा पर्याय निवडुन संपविले. या बातमीने फक्त

सिनेमाजगतच नव्हे तर सर्व सामान्य लोकंही हादरुन गेले. या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा मानसिक आरोग्य व आधार व्यवस्थेच्या (support system)अनुषंगाने खुप उहापोह झाला. यानिमित्ताने या दोन गोष्टींचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. मात्र ही ‘आधार व्यवस्था’ उभी करणे व सक्षमरित्या कार्यान्वित ठेवणे यावरही गांभीर्याने काम होणे महत्वाचे आहे.

सुशांत हा मानसिक आजाराने त्रस्त होता व प्रत्यक्ष आत्महत्येपूर्वी काही महिने त्याने या आजारावरील औषधे घेणे ही बंद केले होते, असे त्याच्या अनेक निकटवर्तीयांनी  सांगितले.  या काळात त्याची काय मानसिकता असेल?, काय मनस्थिती असेल? याची दखल घेणारी व त्याला आधार देणारी व्यवस्था अस्तित्वात असती तर बहुदा ही दुदैवी घटना नक्कीच टाळता आली असती.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक भक्कम ‘आधार व्यवस्था’ असणे फार गरजेचे असते. खरंतर ही व्यवस्था मित्र- परिवार व कुटुंबीय यांच्या सहभागातून व सहकार्यातून उभी रहात असते. आपण सर्वचजण या व्यवस्थेत अधिक मोकळेपणाने व  पारदर्शकता राखत आपली काही दुखणी, प्रश्न, अपेक्षाभंग मांडत असतो. ही आधार व्यवस्था आपल्याला आपली टेंशन्स् शब्दांदीत करण्यासही पुरक व्यवस्था तयार करून देत असते. आपल्या भावनांना योग्य तऱ्हेने निचरा होण्याच्या दृष्टीनेही ही व्यवस्था खुप उपयुक्त ठरत असते.

भावनांचा निचरा न होणे, आपल्या मनातील गोंधळ न सुटणे, आपले विचार नियंत्रित नसणे, आपल्या मनातील भावना मोकळ्या न होणे या सर्व गोष्टी अनेकदा कमकुवत आधार व्यवस्थेचे द्योतक असतात. ‘सकस मैत्री व सुदृृड कौटुंबिक जीवन’ असणाऱ्या लोकांंच्या बाबतीत, ही आधार व्यवस्था अधिक क्रियाशील(active) व सकारात्मक(positive)असते. त्यामुळे ही मंडळी मानसिक -भावनिक स्वरावरील आव्हाने अधिक समर्थपणे पेलतात. आपले दुःख, अस्वस्थता, हुरहूर मित्रपरिवार व कुटुंबासह वेळोवेळी शेअर केले तर कोणतेही टेंशन अनेक पटीने कमी होते व अशा दुदैवी घटना नियंत्रित करता येवू शकतात.

मात्र ही ‘आधार व्यवस्था’ नोकरी व्यवसायातील सहकारी अथवा तत्सम नात्यात निर्माण केलेली असेल तर तिथे काही वेळा थोडीशी गल्लत होवू शकते. कुटुंब ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील पहिली ‘शाळा’ असते. याच शाळेत आपण आपल्याला भावनिक, मानसिक, वैचारिक पातळीवर स्थिर राहण्याच्या दृष्टीने अनेक गोष्टी शिकत असतो. मुख्य म्हणजे स्वतःचा व स्वताच्या भावभावनांचा तोल संभाळणेही आपण इथेच शिकतो. भाषा, संवाद कौशल्ये व योग्यतऱ्हेने प्रकटीकरण, ही कौशल्येही याच ‘कुटुंब’ नावाच्या शाळेत आपण शिकतो.

जे विद्यार्थी या शाळेत कच्चे राहतात ते भावी आयुष्यात, त्यामनाने अधिक प्रमाणात स्वतःचा विविध स्तरावरील तोल संभाळण्यास असक्षम ठरतात. अनेकदा याचा थेट संबंध कौटुंबिक नात्यातील बेबनाव, अनादर,अविश्वास अथवा कोरडेपणा याच्याशी असतो. नात्यांमधील वीण जितकी सैल व विस्कळित तितके भावनिक,मानसिक, कौटुंबिक प्रश्न/समस्या अधिक. मात्र कुटुंबव्यवस्था जर कार्यक्षम व सशक्त ‘आधार व्यवस्था’ ठरली तर कुटुंबातील सदस्यांच्या आयुष्यातील अनेक भावनिक, मानसिक स्तरावरील स्फोट, प्रत्यक्ष होण्यापुर्वीच रोखता येतात, हे अनेक अभ्यासातून पुढे आलेले आहे.

आपल्या प्रत्येकाच्या मनात अनेक कप्पे असतात. उदा.  आर्थिक कप्पा, रिलेशनशिप, नोकरी / व्यवसाय, मित्रपरिवार, नातेवाईक इ. अनेकदा यातील एखादा कप्पा ‘दुखरा’ असतो व तो खुपदा संबंधित व्यक्तीच्या अगदी निकटवर्तियांना देखील माहीत नसतो. असे काही घडले की लोकं माहीत असलेले अथवा दिसू शकणारे सर्व कप्पे तपासू लागतात व त्यावरून एखादा निकर्ष काढतात. मात्र हा माहीत नसलेला कप्पा मात्र दुदैवाने स्पर्शिलाही जात नाही व मदतीपासून संबंधित व्यक्ती वंचित राहते.

अनेकदा संबंधित व्यक्ती या कप्प्याबद्दल जाणिवपूर्वक मौनही बाळगत असते किंवा काही वेळा अस्पष्ट इशारे देत असते. “आता काही चांगले घडणारच नाही”. असा समज ही मंडळी करून घेतात. मात्र दुदैवाने यांची आधार व्यवस्था कमजोर असल्यास याकडे दुर्लक्ष होते व एक ‘दुर्देवी’ घटना घडते. कुटुंबातील परस्परांतील संवाद, नातेसंबंधांमधील मोकळेपणा, नात्याला दिला जाणारा वेळ व नात्यास गृहित न धरणे या गोष्टी कुटुंबातील सर्वच सदस्यांना एक चांगली ‘आधार व्यवस्था’ निर्माण करून देतात. अर्थातच ही व्यवस्था प्रत्येक सदस्याने त्यात सहभाग देत ‘सशक्त व क्रियाशील’ ठेवायची असते. या प्रक्रियेत स्वकेंद्रीत, भोगवादी वृत्तीस मात्र तिलांजली देणे महत्वाचेच नव्हे तर आवश्यक असते.

या व्यवस्थेत मोकळा संवाद व सर्व प्रकारच्या अनुभवांचे शेअरिंग सर्व सदस्यांनी करणे, यास मुभा असणे गरजेचे असते. सर्वच वयातील मुले ही अनुकरणप्रिय असतात त्यामुळे पालकांनी आपले प्रश्न, टेंशन, निराशेचे क्षण, झालेला अपमान, मिळविलेले कौतूक इ. गोष्टी कुटुंबात योग्यतऱ्हेने मांडणे व त्यातून वाट काढणे गरजेचे असते. हया गोष्टी मुलांकरिता on feild training सारख्या असतात. किंवा या सर्व भावना नैसर्गिक आहेत व त्यातून वाट काढायची असते हे देखील मुलांना कृतीतून सांगणे गरजे असते. सामान्य माणसापासून ते अगदी सेलिब्रेटींपर्यत सर्वांना आज जीवघेण्या स्पर्धैला सामोरे जावे लागत आहे. गटबाजी, राजकारण, हेवेदावे, चढाओढ, इर्षा, स्वार्थ, हव्यास या सगळ्या गोष्टी कमी अधिक प्रमाणात आपले मानसिक संतुलन बिघडवितात. मुलांना या सगळ्या सह जगायला शिकविणे, नकार पचवायला, अपयशही समर्थपणे पेलायला व योग्य वेळी थांबायला शिकविणे आज गरजेचे आहे.

मुलांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकणे व त्यास सकारात्मक व प्रगल्भपणे / शांतपणे प्रतिसाद देण्याची कौशल्ये ज्या पालकांकडे असतात त्या कुटुंबातील मुलांना सर्व प्रकारचे अनुभव व भावना मांडण्याची सवय होते व भावी जीवनातही त्यांची ही सवय, त्यांना आधार व्यवस्थेसमोर मन मोकळे करण्यास पुरक ठरते. अशा आधार व्यवस्थेतील मुले शिक्षण, नोकरी, व्यवसाय याकरिता एकटी राहिली तरीही कधी ‘एकाकी’ होत नाहीत. (मन मोकळे करणे म्हणजे मनाला अस्वस्थ करणाऱ्या सगळ्या गोष्टी शेअर करणे.)

हल्लीच्या पीढीतील ‘मैत्री’ हा प्रकारही खुप वेगळ्या पद्धतीने किंवा डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. या पिढीचा प्रत्येक वयातील मित्रपरिवार हा वेगळा असतो. अनेकदा मैत्री ही हेतू अथवा उदिष्टये साध्य करण्याच्या दृष्टीने केलेली असते. त्यामुळे त्यात ‘भावनिक गुंतवणुक’ किती असेल हा देखील अभ्यासाचा एक स्वतंत्र विषय नक्की होवू शकेल. आज मैत्री ही वय व गरजांनुसार बदलताना दिसते. ‘जबाबदार मित्रत्व’ या संकल्पनेचा अंतर्भाव यात असेलच याची काही शाश्वती नसते. त्यामुळे ‘आधार व्यवस्था’ म्हणुन मैत्रीकडे पाहताना अथवा त्यादृष्टीने त्याची निवड करीत असताना, या मैत्रीचेही ‘मुल्यमापन’ करणे गरजेचे असते. बहुदा सुशांतच्या बाबतीत असेच काही तरी झाले असावे. सध्या सगळ्यांच गोष्टी झपाट्याने बदलत असल्यामुळे काही विशिष्ठ वयापर्यत मुलांचे विश्व, पालक म्हणुन आपल्याला माहीत असते. उदा. ठराविक वयातील प्रश्न, धोके किंवा मर्यादा. मात्र मुले मोठी/वयात आल्यानंतर, त्यांची नोकरी / व्यवसाय, मैत्री अथवा रिलेशनशीप यातील प्रश्न, अडचणी, अपेक्षाभंग यापासून आपण अनभिज्ञ असतो. त्यामुळे या वयात मुलांशी संवाद साधताना आपण अधिक सर्तक व अपडेट राहणे गरजेचे असते. याला smart parenting असे म्हणूयात. या वयात मुलांशी होणारा संवाद अधिक प्रगल्भ व सारासार विचार व विवेक ठेवत केल्यास मुलांच्या भावविश्वास अधिक जवळुन पाहता येते व त्यांची ‘आधार व्यवस्था’ म्हणुन त्यांना योग्य मार्गदर्शनही करता येते. पालकांचा शैक्षणिकस्तर व मुलांशी संवादातून connectivity याचा किंचितही संबंध नाही हे नक्की समजून घ्यावे. ज्या पालक व मुलांमधे मैत्री, जबाबदार संवाद व धोके देखिल मर्यादा म्हणून सांगण्याचे कसब असते तेथे उत्तम पालक – पाल्य connectivity असते.

एकुण काय तर, जीवनशैली, देहबोली व अस्पष्ट इशारे वाचू शकणारी, मनोबल वाढविणारी ‘आधार व्यवस्था’ प्रत्येकाची असावी व ती कुटुंबातच असावी.

सुशांत मानसिक आजारावर औषधे घेत होता. खंर तर प्रत्यक्ष उपचार घेणारा व्यक्ती व त्याचे कुटुंबिय, या दोघांनाही हया आजाराचा  प्रथम ‘ स्वीकार’ करणे आवश्यक असते. फक्त ‘स्वीकारच’ नव्हे तर या प्रक्रियेत दोन्ही घटकांनी जबाबदारीने ऐकमेकांना आधार देत ही प्रक्रिया पार पाडायची असते. यात एकाचेही दुर्लक्ष या आजारास बळाविण्यास प्रोत्साहन देणारे ठरू शकते. म्हणुनच याबाबतची परिपुर्ण माहिती व रुग्ण हाताळण्याचे शिक्षणही कुटुंबियांना/ मित्र परिवारास असणे गरजेचे असते.

सुशांतला मानसिक आजार होता हे सांगणारे अनेकजण पुढे आले मात्र प्रत्यक्ष मदत करू शकणारे, कोणीही पुढे आले नाहीत. दुदैवाने त्यांच्यापैकी कोणीही त्याच्या ‘आधार व्यवस्थेचा’ भाग नव्हते व दुदैवाने रुग्ण हाताळण्याचे कसब ही त्यांच्याकडे नव्हते. मानसिक रुग्ण हाताळण्याची कौशल्ये आत्मसात केल्यास याचा संबंधित रुग्णाची सकारत्मकता व मनोबल वाढविण्याच्या अनुषंगाने मदतच होते.

मानसिक आजारांनीग्रस्त व्यक्तीस खंबीर आधार व्यवस्था, नियमित औषधोपचार महत्वाचा, मात्र याकडे दुर्लक्ष झाल्यास मेंदुतील असंतुलित रासायनिक प्रक्रिया प्रसंगी मोठा दगाफटका करू शकतात. सुशांतचेही त्या तीन तासाच्या peak hours मधे असेच काही तरी झाले असावे.

मानसिक आरोग्य अबाधित ठेवण्याकरिता ‘सक्षम आधार व्यवस्था’ असणे हे अपरिहार्य आहे. आपल्या घरातील मुलं सुशांतच्या वाटेने जावू नये, याकरिता सुरवात मात्र कुटुंबव्यवस्थेच्या बळकटीकरणापासून ते ‘सजग अथवा जबाबदार मैत्री’ ही संकल्पना रूजविण्यापर्यत करावी लागणार आहे हे नक्की. नाहीतर हाती उरेल पुन्हा एकदा फक्त शोक.

स्मिता कुलकर्णी

ज्येष्ठ समुपदेशक

९८२२७५२०५६

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *