पुणे—तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर कारागृह ते पुणे अशी मिरवणूक काढून दहशत माजवत टोलनाक्यावरील दुकानातून पाण्याच्या बाटल्या व वडापाव पैसे न देता जबरदस्तीने घेतल्याप्रकरणी मारणे व त्याच्या साथीदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . पिंपरी चिंचवड पोलिसांनी शिरगाव चौकी आणि तळेगाव पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल केले आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर टोल न भरणे तसेच, त्यापूर्वीच्या फूड मॉलवर जबरदस्तीने वस्तू घेतल्याचा ठपका गजा मारणेवर ठेवण्यात आला आहे. तसेच गजा मारणे याच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारावाई केली जाईल असेही पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.
पप्पू गावडे आणि अमोल बधे खून खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेच्या साथीदारांनी त्याची तळोजा कारागृहाबाहेरुन मिरवणूक काढली होती. गजा मारणे हा त्याच्या साथीदारांसह द्रुतगती महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने येत होता. या मिरवणुकीत जवळपास 300 गाड्या होत्या. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते.
तसेच उर्से टोलनाक्यावर आला त्यावेळी मारणे याच्या समर्थकांनी आरडाओरडा करून फटाके वाजवले. तसेच ड्रोनच्या साह्याने चित्रीकरण करून दहशत माजवली. याप्रकरणी १६ फेब्रुवारी रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. त्यावेळी इतर वाहनांना बाजूला करून टोल न देता वाहने घेऊन गेले. तत्पूर्वी टोलनाक्यावरील फुड मॉलमध्ये पाण्याच्या बाटल्या व वडापाव पैसे न देता जबरदस्तीने घेतल्याचे समोर आले आहे. त्यावरून गजा मारणेसह साथीदारांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला.