#पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : गुन्हा दाखल करण्यासाठी खासगी खटला दाखल

क्राईम
Spread the love

पुणे- राज्यभर गाजत असलेल्या पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद झाल्यानंतर याप्रकरणात 18 दिवस उलटूनही आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल न झाल्याने आता थेट न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. यामध्ये अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून न्यायालयाने युक्तिवाद ऐकून आदेशासाठी 5 मार्च तारीख दिली आहे.

लीगल जस्टीस सोसायटी तर्फे भक्ती राजेंद्र पांढरे (24, रा. भाग्यश्री अपार्टमेंट, शुक्रवारपेठ) यांनी 156 (3) नुसार अ‍ॅड. विजय ठोंबरे यांच्यामार्फत खासगी खटला पुण्यातील लष्कर न्यायालयात दाखल केला आहे.

दाखल खटल्यानुसार, पुजा चव्हाण हिचा 7 फेब्रुवारी रोजी अज्ञात कारणामुळे मृत्यू झाला होता. हा मृत्यू संशयास्पद व अनैसर्गीकरित्या झाला होता. तिचा मृतदेह हा ती राहत असलेल्या हेवनपार्क येथील पार्किंगमध्ये आढळून आला होता. याबाबत सामाजिक माध्यमे, प्रसार माध्यमे याच्यावरून मोठ्या प्रमाणात ऊहापोह झाला असताना पोलिस कोणतीही कार्यवाही करताना दिसत नाहीत. तरुणीच्या संदर्भाने अनेक ऑडीओ क्लीप सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित झाल्या आहेत. या ऑडीओ क्लीपमध्ये अनेक मोठ्या व्यक्तींची नावे समोर येते आहे. पुजाचा मृत्यू संशयास्पद असून त्याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास मृत्यू बाबतचे पुरावे आरोपींकडून नष्ट करण्याची दाट शक्यता आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना आदेश होणे गरजेचे असल्याचे दाखल खटल्यात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात तरुणीची हत्या अथवा आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले आहे. याबाबत पोलिस प्रशासनाबाबत त्वरित तपास होणे आवश्यक होते. परंतु, या प्रकरणात अनेक बड्या लोकांची नावे समोर आल्यानंतर पोलिस प्रशासनाने तपासकामात जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अ‍ॅड. ठोंबरे यांच्या वकील संघटनेने याबाबाबत यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यासाठी वानवडी पोलिसांना तक्रारी अर्ज दिला होता. तरी पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची तसदी न घेता उदासीनता दाखविल्याचे दिसून येत आहे. पुजाला आत्महत्या प्रवृत्त करण्यात आले अगर तिची हत्या करून आत्महत्या दाखविण्यात आले याबाबत साक्षीदारांचे जबाब नोंदविणे आवश्यक आहे. साक्षीदार कोणाच्या भीती दडपण अथवा आमिषास बळी पडून समोर येत नसल्यास त्यांना गुन्हा दाखल करून अभय देणे आवश्यक आहे. याप्रकरणात योग्य तो पुरावा हस्तगत करून आरोपींचा कसून तपास व चौकशी होणे आवश्यक आहे. या प्रकरणात गंभीर स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा घडूनही तीन आठवड्यानंतरही कोणताही तपास न झाल्याने पुजाला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देऊन निष्पक्ष तपास करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत अशी मागणी खासगी खटल्याद्वारे करण्यात आली आहे.

काय झाला युक्तिवाद?

गुन्ह्याचे गांभीर्य पाहता हे प्रकरण सीआरपीसी 156 (3) नुसार भारती विद्यापीठ पोलिसांकडे तपासासाठी पाठविण्यात यावे. खटला गुणदोषावर चालवून आरोपींना कडक शासन करण्यात यावे. आवश्यकता भासल्यास पुरावा देण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती न्यायालयाकडे खासगी खटल्याद्वारे करण्यात आली  आहे. याप्रकरणात युक्तिवाद झाला असून पुढील आदेशासाठी 5 मार्च ही तारीख लष्कर न्यायालयाने दिली आहे. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *