पुणे— “शिक्षण क्षेत्रात मग ते शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठ असो दोन्हीकडील लोकांनी आपल्या मुलांच्या मनात एकमेकांविषयी द्वेषाचं विष पसरवू न देता विद्यार्थ्यांना यापासून दूर ठेवलं पाहिजे,”असे आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलं.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानंतर छगन भुजबळ पत्रकारांशी बोलत होते.
कर्नाटक येथील हिजाब प्रकरणानंतर राज्यात देखील ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली आहेत. हिजाब प्रकरणाबाबत भुजबळ यांना विचारले असता त्यांनी वरील आवाहन केले.
“महात्मा फुले यांनी माणसात धर्म राज्य भेद असता कामा नये असं म्हटलं होतं. सर्वांनी शांततेत एकत्र राहिलं पाहिजे आणि समाजाची, देशाची प्रगती केली पाहिजे. जाती धर्मात लढाया नको. महात्मा जोतिबा फुले यांनी आम्हाला तसं शिकवलं आहे,” असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं.
“करोनाचा संसर्ग आता कोठे नियंत्रणात येऊन शाळा महाविद्यालयं सुरू होत आहेत. अशावेळी आपण मुलांना काय शिकवतो. या वयात मुलांच्या मनात अशाप्रकारचे भेदाभेद, राग, द्वेष निर्माण केला तर मग शिक्षणाचा काय फायदा? शिक्षणाचा हेतू समाजाला, देशाला एकत्रित येऊन पुढे घेऊन जाण्याचा आहे. अशात अशाप्रकारचे वाद वाढणार असतील तर चिंतेची बाब आहे. त्यामुळे ही भांडणं, वाद शैक्षणिक ठिकाणी करू नये.भेदाभद करणारे राजकारणीच जास्त असतात. सर्व राजकारण्यांना आवाहन आहे की विद्यार्थ्यांमध्ये द्वेषाची भावना निर्माण होता कामा नये,” असंही भुजबळ यांनी नमूद केलं.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित यांसह आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. गरज पडली त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेही सहकार्य मिळाले आहे. लवकरच सर्वांना हक्क मिळेल. यासाठी समाजातही भांडण होता कामा नये. कायद्याच्या माध्यमातून सर्व प्रश्न आम्ही सोडवू, असेही भुजबळ म्हणाले.