ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन

पुणे-मुंबई राजकारण
Spread the love

पुणे– ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे आज (शनिवार) पुण्यात निधन झाले. त्यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी अखेरचा श्वास सोडला. त्यांच्या निधनामुळे बजाज उद्योग समूहचा मोठा आधारस्तंभ हरपला आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये ते आजारपणामुळे मागील काही दिवसांपासून दाखल होते. वयोमान आणि हृदयाच्या आजारामुळे त्यांच्यावर उपचार करण्यास डॉक्टरांना मर्यादा येत होत्या. आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अखेर त्यांचे मल्टी ॲार्गन फेल्यूअरमुळे निधन झाले.

१० जून १९३८ साली राहुल बजाज यांचा जन्म झाला होता. बजाज उद्योग समूहाला मोठे करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. त्यांना २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अर्थशास्त्र आणि विधीमध्ये राहुल बजाज यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून, त्यानंतर हॉवर्ड विद्यापीठातून एमबीएचे देखील शिक्षण घेतले होते. १९६८ मध्ये बजाज ऑटोमध्ये ते कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाले होते.

त्यांनी मागील वर्षीच बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. जवळपास पाच दशकांपासून त्यांनी बजाज ऑटोची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. बजाज ऑटोला यशोशिखरावर नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी नीरज बजाज यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवली होती.

राहुल बजाज यांच्या जाण्याने उद्योग जगताची मोठी हानी झाली आहे. सर्वचस्तरातून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे आदींनी राहुल बजाज यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *