कधी तरी काही लोकं असं बोलून जातात, मात्र त्याला महत्व देण्याचं काम नाही.. का आणि कोणाला म्हणाले असे अजित पवार?

राजकारण
Spread the love

पुणे-शरद पवार साहेबांनी कायमच पुरोगामी विचार मांडले आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. कधी तरी काही लोकं असं बोलून जातात, मात्र त्याला महत्व देण्याचं काम नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना त्यांचे नाव न घेता प्रत्युत्तर दिलं.

राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला होता. राज ठाकरे यांच्या आरोपाला उत्तर देताना, “त्यांच्यावर न बोललेलंच बरं, त्यांनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे”, असा सल्ला शरद पवारांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना दिला होता. त्यानंतर आज अजित पवार यांनी राज यांना रोखठोक उत्तर दिले. पुण्यामध्ये कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यपालांना मुख्यमंत्री आणि मी पुन्हा भेटणार

15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे खासदार गिरीश बापट आणि काँग्रेस नेते शरद रणपिसेही उपस्थित होते. कार्यक्रमानंतर रणपिसे यांनी राज्यपालांची भेट घेऊन 12 सदस्यांची नियुक्ती करण्याची विनंती केली. या सदस्यांना विधान परिषदेत येण्याचा मार्ग मोकळा करावा, असंही ते म्हणाले होते.

त्यावर राज्यपालांनी रणपिसे यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं होतं.  अजित पवार माझ्याबरोबर आहेत. ते माझे मित्रं आहेत. ते इथेच आहेत. सरकार याबाबत आग्रह धरत नाहीत. तुम्ही का आग्रह धरता?, असा सवाल राज्यपालांनी केला. या विषयावर राज्य सरकारने पाठपुरावा केला पाहिजे, असं त्यांनी रणपिसेंना सांगितलं.

त्यानानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या मुद्द्यावरून राज्यपालांवर टीका केली होती. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर भाष्य केलं आहे. मी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांना भेटणार आहे, असं अजित पवार यांनी आज स्पष्ट केलं.

त्यांना राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या मुद्द्यावरून राज्यपालांनी केलेल्या विधानाबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिलं. राज्यपालांवर मला बोलण्याचा अधिकार नाही. पण पुढच्या आठवड्यात मी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना जाऊन भेटणार आहोत, असं अजित पवार म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *