मुंबई- औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण करावे या मुद्द्यावरून गेले अनेक दिवस राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राज्यात शिवसेना कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार असताना शिवसेनेने औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा उचलून धरला आहे तर कॉँग्रेसने त्याला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आघाडीत बिघडी निर्माण झाली आहे. या मुद्द्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र, शिवसेना आणि भाजपवर निशाण साधला आहे.
देशात आणि राज्यात तुमचेच सरकार होते त्यावेळी औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर का नाही केले याचे उत्तर भाजपने आणि शिवसेनेने द्यावे असे आव्हान ठाकरे यांनी दिले. इतर अनेक शहरांची आणि रस्त्यांची नावे बदलली तेव्हा नाही सुचले आणि आता कसले राजकारण करता? असा सवाल त्यांनी केला. बरोबर निवडणुकांच्या तोंडावर नामंतराचा विषय आणायचा, लोकांना काय वेडे समजलात का? अशा शब्दांत शिवसेना आणि भाजपला त्यांनी फटकारले. औरंगाबादची जनता हुशार आहे ते योग्य निर्णय घेतील आणि त्यांचा समाचारही घेतील असेही राज ठाकरे म्हणाले.















