मुंबई- पक्षाचे शेकडो कार्यकर्ते , पक्षाचे पदाधिकारी आणि पक्षाच्या जेष्ठ नेत्यांच्या कोअर कमिटीच्या सर्व सदस्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलेला पक्षाध्यक्ष पदाचा दिलेला राजीनामा दिल्यानंतर शरद पवार (sharad pawar) यांनी सर्वांच्या भावनांचा विचार करून राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा नेहरू सेंटर येथे कार्यकर्त्यांसमोर बोलताना केली. त्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (anjali damaniya) यांचे अजित पवार यांच्यावरील केलेले ट्वीट चर्चेचा विषय बनले आहे.
“देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षाचे नेते आणि सहकारी, मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी विनंती केली. लोक माझे सांगाती, हेच माझ्या परीने प्रदीर्घ सार्वजनिक जीवनाचे गमक आहे, माझ्याकडून आपल्या भावनाचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारवून गेलो आहे,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.
“माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत त्यांनी घेतलेला निर्णय याचा विचार करून मी पुन्हा अध्यक्षपदी रहावे या निर्णयाचा मान राखून राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे,” असंही शरद पवारांनी नमूद केलं.
दरम्यान, शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्वीट करत “अजित पवार हे माध्यमांशी काहीच न बोलता निघून गेले. याचाच अर्थ हा की त्यांच्या मनासारखं झालं नाही. जितेंद्र आव्हाड यांना कार्यकर्त्यांनी पेढे भरवले? अजित पवारांना नाही?,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांच्या या ट्वीटची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.