मनाची श्रीमंती…

महाराष्ट्र लेख
Spread the love

जगात खरा आनंदी व समाधानी कोण तर ज्याची श्रीमंती मनात असते. गाडी, बंगला दागिने, उच्चपदस्त नोकरी, भरभक्कम व्यवसाय, दांडगा बँक बॅलन्स हे सर्व पदरी असणारी व्यक्ती समाधानी, आनंदी व उत्साही असेलच असे अजिबात नाही. पण असे का? अनेकदा पैशाने श्रीमंत असणाऱ्या लोकांपेक्षा मनाने श्रीमंत असणारे लोकं आयुष्यात सरस ठरतात व आहे तसे आयुष्य समृद्धरित्या जगतात.

पूर्वीच्या पीढीतील लोकं आनंदी व समाधानी असत, स्वताच्या आनंदात दुसऱ्याला सहभागी करून घेण्याची त्यांची वृत्ती असत. स्वताचा आनंद दुसऱ्याच्या मनात  निर्माण करण्याचे कसब या पीढीत होते.  घरात वेगळा पदार्थ केल्यास अगदी चाकरमाणसां पर्यत त्याचा घास आग्रहाने जात. आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करताना,  कुटुंबातील नंणद/जावू अथवा शेजारणीच्या मुलालाही नवीन कपडे घेणारी (मध्यमवर्गीय) कृटुंबातील गृहिणी या पीढीत होती. काटकसरीतही हा आनंद दोन कुटुंबात साजरा होत असे. स्वताच्या मुलासह इतरांचे मुल ही आनंदी व्हावे ही साधी सरळ  भावना यात असत.

अगदी नवीन साडीची घडी मोडण्याकरिता एरवाद्या शेजारणीला, जावेला /नंणदेला किंवा अगदी एरवाद्या गरीबा घरच्या सुनेला – लेकीला देण्याची पद्धत मोठ्या प्रेमाने स्त्रीया पार पाडत. खंरतर हा काळ, वर्षाला दोन साडयांपर्यत सिमित असलेला, कटकसरीचा काळ होता. परंतू ही होती त्या काळातील मनाची श्रीमंती. 

आज मात्र आनंदही साजरा करताना आपण अनेकदा स्व – केंद्रीत वृत्तीचे प्रदर्शन नकळत घडवितो. इतरांपेक्षा मी वेगळी व श्रेष्ठ कशी?  हे फक्त माझ्याच कडे आहे, हे सिद्ध करण्यात आज अनेक स्त्रीया आपले मानसिक संतुलन बिघडवून बसतात.  प्रेम, माया, स्नेह, त्याग, आपुलकी या दागिन्यांचा साज चढवून पूर्वी अनेक स्त्रीया मनाच्या श्रीमंतीचे दर्शन घडवित. हे गुणांचे लेणं चढवून अधिकच  देखण्या दिसत मात्र दुदैवाने आज अनेक स्त्रीया मनातील इर्षा, स्पर्धा, मत्सर, हेवा, श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा हव्यासा पोटी आपल्या मनाचे दारिद्रयच   वाढवित व प्रदर्शित करीत असतात.

अनेक कुटुंबांमधे कपड्यांचे कपाट ओसंडत वाहू लागले तरी नवीन कपडे केवळ दुसऱ्यांच्या कपडयांचे वेड पहात, त्यांच्याशी स्पर्धा करण्यात नवीन कपडे घेतले जातात. खंरच या स्पर्धेची गरज असते का? आपला पैसा व कपटातील जागा याचा विनोयोग नक्कीच यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने होवू शकतो हे कधीतरी समजून घेतले पाहिजे.

कोरोना संसर्गाने आपल्याला, आपल्यातील अनेक त्रुटींवर काम करण्यास उद्युक्त केले आहे. आपल्या needs व wants यातील ठळक फरकही समजाविला आहे. मुख्य म्हणजे आपल्या मनाची श्रीमंती व आपल्यातील माणुसपण व माणुसकी चा धर्म वाढविणारे गुण ही शिकविले. स्त्रीया या कुटुंब – समाजाच्या सकस बांधणीतील एक महत्वाचा घागा असतात.  संसर्ग, आपत्ती यामुळे अनेक स्त्रीयांनी आपली हक्काची माणसे गमाविली. संसर्ग व आपत्तीमुळे ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे आज अनेक कुटुंबांचे अगदी छोटे – छोटे आनंद देखील  हेरावून घेतले आहेत.  या कुटुंबांचे दुःख जाणण्याकरिता आपल्यातील कृतज्ञतेचा भाव फार महत्वाचा ठरतो.

आपल्या दैनंदिन व व्यवाहारिक आयुष्यात कृतज्ञतेचा भाव असणे खुप गरजेचे असते. मात्र आज नेमका हाच भाव कुठेतरी स्वकेंद्रीत व भोगवादीवृत्ती वाढीस लागल्यामुळे हरविला आहे.

खरतर कृतज्ञता व अनुभूतीचा भाव हा कधीच कोरडा असू शकत नाही. कृतज्ञता व सहअनुभूती व्यक्त करताना, काही मदत इतरांना करताना देण्याऱ्याने देताना, घेणाऱ्याच्या भूमिकेत स्वतःला नेणं… ते सारे क्लेष क्षणभर अनुभवणे व पुन्हा देण्याच्या भूमिकेत येण आणि इदं न मम असे म्हणत यज्ञवृत्तीने मदत / दान करणे ही मनोवृत्ती महत्वाची असते.

मैत्रिणींनो आपण आपल्या कुटुंबाचा कणा आहोत, कुटुंबाचा आनंद – समाधान अबाधित रहावा याकरिता झटत असतो.  हीच भावना थोडीशी अधिक विस्तारित करीत एक आशेचा /आनंदाचा दिवा आपल्या परिचयातील / नात्यातील कुटुंबात लावू. आपला आनंदात त्यांनाही सहभागी करून घेवू. उदया पासून श्रावण महिना सुरु होत आहे. आता तर सणांची रेलचेल सुरु होणार. कितीतरी सण – उत्सव साजरे होणार. कधी गोडाचा घास, कधी नवीन कपडे तर कधी ओंजळभर धान्य तर कधी आपल्या कुटुंबात त्यांचे स्वागत करूयात. देवाने आपल्याला काय काय दिले आहे त्याची यादी करू व हा कृतज्ञतेचा भाव वाढवू. असे म्हणतात देण्याने परस्परांमधे स्नेह वाढीस लागतो व मनाची श्रीमंतीही.

चला, तर मग थोडी मनाची श्रीमंती वाढवू व आपल्या आनंदात काही दुर्लक्षित, आपत्तीग्रस्त अथवा वियोगाचे दुःख उरी बाळगुन, पुन्हा एकदा जगू पाहणाऱ्या कुटुंबांच्या मनात आपल्या मनातील आनंद रुजवू व आपल्या आनंदातील सहप्रवासी वाढवू.

स्मिता कुलकर्णी

९८२२७५२०५६

प्रांत समुपदेशन आयाम प्रमुख

कुटुंब प्रबोधन गतिविधी

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *