Corona Vaccine: आमच्यापासून कोरोना लस अजून किती दूर आहे?

आरोग्य राष्ट्रीय
Spread the love

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—रोज प्रसारमाध्यमांमध्ये कोरोना लसीच्या वृत्ताने नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, लस बाजारात येण्याची प्रक्रिया काय असते हे समजून घेतल्याशिवाय नक्की लस बाजारात कधी येणार याबाबतचा आपला भ्रम दूर होणार नाही. जगभरात वाढत्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लस शोधण्याचे कामही जोरात सुरू आहे. परंतु आतापर्यंत 100% यश ​​मिळू शकलेले नाही. अलीकडेच, ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे  शास्त्रज्ञ तयार करीत असलेल्या लसीने सर्वांच्या मनात आशेचा किरण निर्माण केला आहे. तथापि, कोरोनापासून मुक्त होण्यासाठी आपल्याला आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

जगभरात लस विकसित करण्याचे काम सुरु आहे. भारतात मानवी चाचण्यांना सुरुवात झाली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या म्हणण्यानुसार, बुधवारपर्यंत जगातील 165 पेक्षा जास्त लसींवर अनेक देशांमध्ये काम सुरु आहे. तथापि, केवळ एका लसीला मर्यादित प्रयोगासाठी मान्यता मिळालेली आहे.

लस तयार करण्याचे मुख्य टप्पे

पडताळणी:- यामध्ये विषाणू पेशींवर कशा पद्धतीने परिणाम करतो हे बघितले जाते. मग त्याच व्हायरस प्रोटीनचा उपयोग रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी केला जाऊ शकतो की नाही हे पाहिले जाते. त्यानंतर अँटीजेन्स ओळखले जातात आणि प्रतिपिंडे (एंटीबॉडीज) बनविली जातात.

प्री-क्लिनिकल ट्रायल:-मानवी चाचणी करण्यापूर्वी ती लस सुरक्षित आहे की नाही याची खात्री केली जाते. त्याच्यासाठी प्राण्यांवर प्रयोग केले जातात. त्यामध्ये यश मिळाल्यानंतरच पुढचे प्रयोग केले जातात.

क्लिनिकल ट्रायल: या अंतर्गत मानवांवर चाचणी केली जाते. त्याचे सुद्धा तीन टप्पे आहेत.पहिल्या टप्प्यातील चाचणी 18-55 वर्षे वयोगटातील 20-100 निरोगी लोकांवर केली जाते. त्यांच्यातील रोग प्रतिकारशक्ती तयार होते आहे की नाही हे पाहिले जाते. दुसर्‍या टप्प्यात, 100 पेक्षा जास्त मानवांवर प्रयोग केला जातो. या टप्प्यात मुले आणि वृद्धांचा देखील समावेश केला जातो. जेणेकरून चाचण्यांचे परिणाम विविध वयोगटात कसे होतात हे तपासले जाते. तिसऱ्या टप्प्यात, शेकडो लोकांवर चाचणी केली जाते. चाचणीनंतरचे सर्व परिणाम व्यवस्थित असतील तरच लस निर्मितीला यश मिळाल्याची घोषणा केली जाते.

मान्यता कशी मिळते?

तिसरा टप्पा यशस्वी झाल्यास लस तयार करण्यासाठी सरकारची मान्यता आवश्यक आहे. यासाठी, सर्व टप्यांचा डेटा, परिणाम आणि निष्कर्ष याचा अहवाल सादर करावा लागतो.  त्यानंतरच मंजुरी देण्याचा निर्णय घेतला जातो. मंजुरी मिळाल्यानंतर औषध किंवा लसीचे उत्पादन सुरू होते.

ही लस कुठल्याही देशाची असो,  दुसर्‍या देशाला पुन्हा त्याची चाचणी घेण्याचा अधिकार असतो. कधीकधी इतर देश औषध किंवा लसीच्या निष्कर्षाच्या आधारे थेट मंजुरी देऊन टाकतात. कुठल्याही औषधाला मंजुरी मिळणे ही अमेरिकेत सर्वात अवघड गोष्ट आहे. याबाबतीत अमेरिकन एजन्सी फूड अँड ड्रग्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए) अत्यंत कठोर आहे.

सध्या कोणत्या लसी कोणत्या अवस्थेत आहेत

बाजारात येण्यापूर्वी लसीला बरेच टप्पे पार करावे लागतात. गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनावरची लस तयार करण्याच्या प्रयत्नांत शास्त्रज्ञ गुंतले आहे.  आतापर्यंत 142 लसी पूर्व-क्लिनिकल स्तरावर आहेत. याचा अर्थ असा की मानवांवर त्याचा प्रयोग होणे बाकी आहे.

चाचणीच्या पहिल्या टप्प्यात 19 लस आहेत. या लसींच्या संदर्भात त्या किती सुरक्षित आहेत आणि किती डोस द्यावा याची पडताळणी सुरू आहे. आतापर्यंत 13 लस दुसर्‍या टप्प्यात पोहोचल्या आहेत. त्यांच्या  चाचण्या सुरक्षित पद्धतीने सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत फक्त चार लस तिसर्‍या टप्प्यात पोहोचल्या आहेत. म्हणजे त्यांची चाचणी आता समुहावर केली जात आहे. फक्त एक लस अशी आहे जीला मर्यादित प्रयोगासाठी परवानगी देण्यात आली आहे.

आमच्यापासून कोरोना लस अजून किती दूर आहे?

रशियाच्या सेचिनोव्ह विद्यापीठाचा दावा आहे की लस सप्टेंबरपर्यंत येईल. तर या वर्षाच्या अखेरीस  लस बाजारात उपलब्ध होईल, असा अमेरिकेच्या मॉडेर्नाने  दावा केला आहे. युरोपियन मेडिसीन एजन्सीच्या म्हणण्यानुसार, त्याची लस पुढील वर्षाच्या सुरूवातीस तयार होईल.जायडस कॅडिलाची लस 2021 च्या सुरुवातीला अपेक्षित आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *