राज्याचा बारावीचा निकाल जाहीर; ८९.७९% विद्यार्थी उत्तीर्ण : मुलींची पुन्हा एकदा बाजी

महाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर; ८९.७९% विद्यार्थी उत्तीर्ण, मुलींची पुन्हा एकदा बाजी
महाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर; ८९.७९% विद्यार्थी उत्तीर्ण, मुलींची पुन्हा एकदा बाजी

पुणे(प्रतिनिधी)–महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने  फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल  शनिवारी (२ मे २०२६) घोषित करण्यात आला. यंदा राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून, गेल्या वर्षीच्या (९१.८८%) तुलनेत निकालात २.०९ टक्क्यांची घट झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी मुलांच्या तुलनेत सरस कामगिरी केली असून मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९३.१५ टक्के आहे, तर मुलांचे प्रमाण ८६.८० टक्के इतके नोंदवण्यात आले आहे.

शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी हा निकाल पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केला. मंडळाचे  सचिव डॉ. दीपक माळी यावेळी उपस्थित होते. यंदा राज्यभरातील नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यावसायिक अभ्यासक्रम आणि आयटीआय अशा विविध शाखांसाठी एकूण १४ लाख ४४ हजार ७१३ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १४ लाख ३३ हजार ५८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यातील १२ लाख ८६ हजार ८४३ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. खाजगी विद्यार्थी म्हणून १७ नंबरचा फॉर्म भरून बसलेल्या एकूण ३६ हजार ९४१ विद्यार्थ्यांपैकी २९ हजार ६३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ८०.२१ इतकी नोंदवण्यात आली आहे. तर पुनर्परीक्षार्थी म्हणजेच रिपीटर विद्यार्थ्यांच्या गटात ५० हजार ३४६ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १८ हजार ३४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या निकालाची टक्केवारी ३६.४४ आहे.

कोकण अव्वलस्थानी

विभागीय निकालांचा विचार करता, कोकण विभागाने ९४.१४ टक्क्यांसह राज्यात आपले पहिले स्थान कायम राखले आहे. त्यापाठोपाठ पुणे विभाग ९१.२५ टक्क्यांसह दुसऱ्या, तर अमरावती विभाग ९०.९२ टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. इतर विभागांमध्ये नाशिक (९०.७२%), मुंबई (९०.०८%), कोल्हापूर (८९.९७%), छत्रपती संभाजीनगर (८८.६८%) आणि नागपूर (८८.६७%) या विभागांचा समावेश असून लातूर विभागाचा निकाल ८४.१४ टक्के लागला असून तो राज्यात सर्वात कमी आहे.

अधिक वाचा  Jain Boarding Land Sale Controversy : जैन बोर्डिंग जमीन वादाला निर्णायक वळण : बिल्डर विशाल गोखले यांची माघार

शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेची बाजी

शाखांनुसार निकालात विज्ञान शाखेने ९६.४४ टक्क्यांसह बाजी मारली आहे. वाणिज्य शाखेचा निकाल ८७.०३ टक्के, कला शाखेचा ७८.०२ टक्के, व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचा ८२.७४ टक्के आणि आय.टी.आय. शाखेचा निकाल ८१.७८ टक्के लागला आहे.

२६ विषयांचा निकाल १०० टक्के

विशेष म्हणजे मंडळाच्या एकूण १५३ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. नियमित विद्यार्थ्यांसोबतच ३६,९४१ खाजगी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, ज्यांचा निकाल ८०.२१ टक्के लागला असून ५०,३४६ पुनरपरीक्षार्थींपैकी ३६.४४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच ८,३६७ प्रविष्ट दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी ९०.५८ टक्के विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

मुलींचे यश आणि दिव्यांग विद्यार्थ्यांची कामगिरी

निकालाच्या परंपरेनुसार यंदाही मुलींनी मुलांपेक्षा ६.३५ टक्क्यांनी सरशी केली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.१५ असून मुलांची टक्केवारी ८६.८० इतकी आहे. तसेच, राज्यातील ८,३६७ दिव्यांग विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, त्यापैकी ७,५७९ विद्यार्थी यशस्वी झाले असून त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९०.५८ आहे.

कॉपीमुक्त अभियान आणि ताणतणावमुक्तीसाठी उपाय

परीक्षेचे संचालन ‘कॉपीमुक्त’ वातावरणात करण्यासाठी शासनाने कडक पावले उचलली होती. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिसरात झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यंदा प्रथमच प्रश्नपत्रिकांची वाहतूक करणाऱ्या सहायक परिरक्षकांसाठी (रनर) जीपीएस प्रणाली अनिवार्य करण्यात आली होती आणि गोपनीय पाकिटे उघडतानाचे मोबाईल चित्रीकरणही करण्यात आले. दरम्यान, कॉपीमुक्त अभियान आणि कारवाया परीक्षा पारदर्शक होण्यासाठी राबवलेल्या ‘कॉपीमुक्त अभियानाचा’ मोठा परिणाम निकालावर दिसून आला आहे. यंदा गैरप्रकारांच्या एकूण १ हजार ९८३ प्रकरणांची नोंद झाली असून यात १४६९ प्रकरणे सामूहिक कॉपीची आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यात १५ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत (अमरावती ८, संभाजीनगर ३, नागपूर ३, लातूर १). कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी १०० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, ज्यात छत्रपती संभाजीनगरमधील ४३ आणि अमरावतीमधील ५० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

अधिक वाचा  Sunetra Pawar: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार उद्या घेणार शपथ; राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरही शिक्कामोर्तब

विद्यार्थ्यांना व्यावसायिक परीक्षांच्या (NEET, JEE) तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, या उद्देशाने परीक्षा नेहमीपेक्षा १० दिवस आधी घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी मुख्य विषयांच्या पेपरमध्ये किमान एक दिवसाचा खंड ठेवण्यात आला होता आणि पेपरच्या निर्धारित वेळेनंतर १० मिनिटांचा अतिरिक्त वेळही देण्यात आला होता. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी राज्य स्तरावर १० समुपदेशकांची आणि विभागीय स्तरावर जिल्हा निहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती असे कुलकर्णी यांनी सांगितले.

गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रिया

निकालानंतर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी करायची आहे किंवा उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत हवी आहे, त्यांच्यासाठी रविवार ३ मे ते १७ मे २०२६ या कालावधीत मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. गुण पडताळणीसाठी प्रति विषय ५० रुपये, तर छायांकित प्रतीसाठी प्रति विषय ४०० रुपये शुल्क ऑनलाइन भरावे लागेल. उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम छायांकित प्रत घेणे अनिवार्य असून त्यानंतर पुढील ५ दिवसांत ३०० रुपये प्रति विषय शुल्क भरून अर्ज करता येईल. जेईई आणि नीट यांसारख्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या अर्जांना प्राधान्य दिले जाणार आहे. जे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी जून-जुलै २०२६ मध्ये पुरवणी परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

अधिक वाचा  दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची कोणतीही चर्चा चालू नाहीये : जयंत पाटील

गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रात महत्त्वाचे बदल

यावर्षी मंडळाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि क्रांतीकारक निर्णय घेतला आहे. आता विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र  एकाच ए-४ आकाराच्या कागदावर एकत्रित दिले जाणार आहे. या निर्णयामुळे छपाईच्या खर्चात जवळपास ३ कोटी रुपयांची बचत झाली आहे. तसेच, आतापर्यंत गुणपत्रिकेवर आडनाव आधी असायचे, मात्र या वर्षापासून आधार कार्ड किंवा ‘अपार आयडी’ प्रमाणे प्रथम विद्यार्थ्याचे नाव, मग वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव असा बदल करण्यात आला आहे. या नवीन गुणपत्रिकेवर क्यूआर कोड आणि विद्यार्थ्याचा फोटो यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्येही देण्यात आली आहेत अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.

 डिजिटल पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत विचार

पर्यावरण आणि भविष्यातील वाटचाल या परीक्षेसाठी तब्बल २ हजार मेट्रिक टन कागद वापरावा लागला. हे लक्षात घेता, भविष्यात पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी डिजिटल पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत मंडळ विचार करत असल्याचे संकेत मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी दिले.

 

 

 

  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love