भारतीय लष्कराला ‘टेलर मेड’ थिएटर कमांड्सची गरज: माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे

थिएटर कमांड्स भारतासाठी काळाची गरज
थिएटर कमांड्स भारतासाठी काळाची गरज

पुणे(प्रतिनिधी)–लष्करातील ‘थिएटर रायझेशन’ किंवा ‘थिएटर कमांड्स’ ही काळाची गरज आहे. हे मान्य करण्यात कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, हे मॉडेल राबवताना केवळ जगाचे अनुकरण न करता भारताच्या भौगोलिक आणि सुरक्षा आव्हानांचा विचार करून एक ‘टेलर मेड’ आणि कस्टमाईज्ड मॉडेल तयार करणे आवश्यक आहे, असे मत माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे (पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी) यांनी सोमवारी व्यक्त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाचे संस्थापक ज. स. करंदीकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय सुरक्षा आणि माध्यमांची भूमिका’ या विषयारील व्याख्यानात ते बोलत होते. पांडे यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि माध्यमांची भूमिका या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी आधुनिक युद्धतंत्रात माहितीचे महत्त्व, लष्कराचे आधुनिकीकरण आणि सोशल मीडियाचे आव्हान अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकला.

पांडे म्हणाले, जगात थिएटर कमांड्सचे विविध मॉडेल्स उपलब्ध आहेत. परंतु, भारताने केवळ दुसऱ्या देशांच्या मॉडेलचे अनुकरण न करता आपल्या देशाच्या विशिष्ट सुरक्षा आव्हानांना लक्षात घेऊन एक स्वतःचे ‘टेलर मेड’ आणि कस्टमाइज्ड मॉडेल तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी दीर्घकालीन दृष्टीकोन असायला हवा आणि हे मॉडेल केवळ येत्या २-३ वर्षांचा विचार करून नाही, तर पुढील २५ ते ५० वर्षांचा विचार हे मॉडेल असावे. लष्कराने कोणतेही अर्धवट उपाय (सोल्यूशन) अमलात आणू नये. जी काही यंत्रणा उभी केली जाईल, ती सुरुवातीपासूनच अशा प्रकारे असावी की जी देशाला दीर्घकाळ चांगली सेवा देऊ शकेल. थिएटर रायझेशनच्या गरजेबाबत कोणताही वाद असू नये, ही काळाची गरज आहे. जरी हा विषय गुंतागुंतीचा असला आणि त्यावर लष्कराच्या विविध विभागांमध्ये भिन्न मते असली, तरी योग्य वेळी योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे असे त्यांनी नमूद केले.

अधिक वाचा  पुढील युद्धे सायबर आणि अंतराळात! भारतीय लष्कर 'फ्युचर रेडी' होत असल्याचा लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदींचा दावा

मजबूत लोकशाहीसाठी सुरक्षित राष्ट्र आणि मुक्त, विश्वासार्ह व जबाबदार माध्यमे या दोन्ही गोष्टींची नितांत आवश्यकता असून, माध्यमे ही केवळ प्रेक्षक नसून ती राष्ट्रीय सुरक्षा परिसंस्थेचा एक ‘नॅशनल स्ट्रॅटेजिक असेट’ आणि लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहेत, असे त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय सुरक्षेची व्याप्ती आता केवळ सीमेवरील संरक्षणापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती बहुआयामी आणि आंतरविद्याशाखीय झाली आहे. जनरल पांडे यांनी स्पष्ट केले की, आजच्या काळात आर्थिक सुरक्षा, सामाजिक एकात्मता, सायबर क्षेत्र आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा  वापर करून पसरवली जाणारी चुकीची माहिती ही राष्ट्रीय सुरक्षेपुढील मोठी आव्हाने आहेत. प्रगत तंत्रज्ञानामुळे युद्धाचे स्वरूपही बदलले असून, आता पारंपारिक युद्धासोबतच ‘हायब्रिड’, ‘नॉन-कॉन्टॅक्ट’ आणि माहितीवर आधारित युद्धे (Information Warfare) लढली जात आहेत. आज माहिती ही लष्करी मोहिमांच्या नियोजनाच्या केंद्रस्थानी आली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकमत तयार करणे आणि नॅरेटिव्ह तयार करणे हे लष्करी सामर्थ्याइतकेच महत्त्वाचे झाले आहे.

अधिक वाचा  ग्रामपंचायत निवडणूक: जात वैधता प्रमाणपत्रासाठी हस्तलिखित अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावावर भाष्य करताना जनरल पांडे म्हणाले की, स्मार्टफोनमुळे आज प्रत्येक नागरिक हा ‘ब्रॉडकास्टर’ आणि ‘कंटेंट क्रिएटर’ झाला आहे. अशा परिस्थितीत खरी माहिती आणि बनावट नॅरेटिव्ह यातील फरक ओळखणे कठीण झाले असून, ब्रेकिंग न्यूजच्या दबावाखाली व्यावसायिक स्वातंत्र्यासह देशभक्तीचा समतोल साधणे हे पत्रकारांपुढे मोठे आव्हान आहे. लष्कराच्या वतीने माध्यमांकडून असलेल्या अपेक्षा स्पष्ट करताना त्यांनी ‘५आर’ या फ्रेमवर्कची मांडणी केली. यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी (जबाबदारी), रिस्ट्रेन (संयम), रेसिलियन्स (चुकीच्या माहितीला बळी न पडणे), रिपोर्टिंग (घटनात्मक मूल्ये) आणि रिपब्लिक (देशहिताला प्राधान्य) या पाच तत्वांचा समावेश आहे.

पूर्वी लष्कर माध्यमांपासून दूर राहणे पसंत करत असे, परंतु आता हा दृष्टिकोन बदलला आहे. लष्कराला आता हे उमजले आहे की, माध्यमे हे प्रभावी ‘मेसेंजर्स’ ठरू शकतात, ज्यांच्या माध्यमातून समाजात योग्य संदेश पोहोचवता येतो. संकटकाळात नागरिकांना अचूक माहिती देणे, अफवांना आळा घालणे आणि राष्ट्रीय आत्मविश्वास वाढवणे ही माध्यमांची मुख्य कार्ये आहेत. भारतासारख्या व्हायब्रंट लोकशाहीमध्ये शत्रू राष्ट्र ‘मिस-इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून सामाजिक भेदांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकते, अशा वेळी सामाजिक स्थिरता आणि राष्ट्रीय रेसिलियन्स टिकवून ठेवण्यासाठी माध्यमांची भूमिका अत्यंत निर्णायक असेल, असेही त्यांनी  नमूद केले.

अधिक वाचा  इंदिरा आयव्हीएफ तर्फे मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी बेटी बचाव बेटी पढाव अभियानास सुरुवात

 थिएटर रायझेशन म्हणजे काय

थिएटर रायझेशन (Theaterisation) म्हणजे देशाच्या तिन्ही लष्करी दलांना (भूमी सेना, नौदल आणि हवाई दल) एकाच छताखाली आणून एकात्मिक कमांड तयार करणे. युद्धाच्या वेळी किंवा आपत्कालीन परिस्थितीत तिन्ही दलांनी स्वतंत्रपणे काम न करता एकाच कमांडरच्या नेतृत्वाखाली एकत्रितपणे लढणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. भारतामध्ये भविष्यातील युद्धांना तोंड देण्यासाठी आणि लष्करी सुधारणांसाठी हे पाऊल उचलले जात आहे, ज्या अंतर्गत चीन आणि पाकिस्तानच्या सीमेसाठी स्वतंत्र थिएटर कमांड्स प्रस्तावित आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love