रंगभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) विपरीत परिणाम होणार नाही : नसिरुद्दीन शाह, परेश रावल या ज्येष्ठ रंगकर्मींनी व्यक्त केला विश्वास

श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सव पुणे (Shriram Lagoo National Natya Mahotsav Pune)
श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सव पुणे (Shriram Lagoo National Natya Mahotsav Pune)

कृत्रिम बुद्धिमत्तेचा कितीही शिरकाव झाला, तरी रंगभूमीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाही. रंगभूमी हा जिवंत आणि उत्स्फूर्त आविष्कार असतो. एआय हा त्याला पर्याय ठरू शकणार नाही, असा दृढ विश्वास ज्येष्ठ रंगकर्मी नसिरुद्दीन शाह आणि परेश रावल यांनी सोमवारी येथे व्यक्त केला. रंगभूमीवरील उर्जेची सळसळ एआय आणू शकत नाही, असे रावल म्हणाले, तर अनेक प्रलोभने असूनही रंगभूमीवरील प्रयोग हाऊसफुल आहेत, असे निरीक्षण नसिरुद्दीन शाह यांनी नोंदवले.

पुणेस्थित महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि लागू कुटुंबियांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे अध्यक्ष एस. पी कुलकर्णी, नाट्य महोत्सवाचे संचालक प्रसाद वनारसे, आनंद लागू, डाॅ. मोहन आगाशे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

उपस्थितांशी संवाद साधताना नसिरुद्दीन शाह आणि परेश रावल यांनी शालेय जीवनापासूनच्या काळाची स्मृतिरम्य सफर घडवली. स्पर्धात्मक उपक्रमांतून स्वतःमधील अभिनयाची आवड लक्षात आली होती, असे दोघेही म्हणाले. नसिरुद्दीन यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील (एनएसडी) अनुभवकथन केले. परेश रावल यांनी गुजराती रंगभूमीवरील आठवणींना उजाळा दिला.

अधिक वाचा  माऊली, तुकोबांच्या पालख्यांचे पुण्यनगरीत आगमन..

एनएसडी आणि नंतर फिल्म ॲड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये पुण्यात शिकताना नट प्रशिक्षित नसला तर चालेल, पण नट शिक्षित असलाच पाहिजे, हे माझ्या लक्षात आले, असे शाह यांनी आग्रहपूर्वक सांगितले. शेक्सपिअरची नाटके अभ्यासक्रमाचा भाग म्हणून वर्गात शिकवली जायची तेव्हा मला झोप येत असे, पण तीच नाटके रंगभूमीवर बघताना वेगळीच जादू घडत असताना, मी पाहिली आणि अभिनय हाच पुढचा मार्ग, हे मला समजले. चित्रपटांनीही माझ्यावर अशीच जादू केली. परेशच्या अभिनयानेही मी असाच प्रभावित झालो होतो. प्रशिक्षण आणि शिक्षण यामध्ये फरक आहे, हे मला एनएसडी आणि एफटीआयआयमुळे समजले. प्रशिक्षण तुम्हाला अनुकूल वातावरण, सुविधा मिळतात. खरे तर जीवनच खूप काही शिकवत असते. अभिनयाचे मूलभूत घटक शिकवलेच जात नव्हते. मी पुण्यात एफटीआयआयमध्ये आलो, आणि मला दिशा मिळाली. नट म्हणून मला शिक्षित करण्याचे श्रेय एफटीआयआयचे आहे, असे शहा म्हणाले.

अधिक वाचा  Bharatiya Chhatra Sansad : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीत १५ व्या भारतीय छात्र संसदेचे आयोजन

परेश रावल यांनी इंटरक्लास स्पर्धेच्या निमित्ताने अभिनय करताना, वाट सापडल्याचा उल्लेख केला. गुजराती रंगभूमीवर प्रयोग होत असत, पण बारकावे नसायचे. मराठी रंगभूमी मात्र सुरवातीपासून समृद्ध होती आणि आजही आहे. एनएसडीचे नावही मला ठाऊक नव्हते आणि मी या संस्थेचा अध्यक्षही झालो, असा गमतीदार उल्लेख रावल यांनी केला. शशी कपूर यांनी लाख रुपये स्क्वेअर फूट भाव असूनही, त्या जागेत पृथ्वी थिएटर अबाधित राखले, याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. खेल या नाटकात मी नसिरभाईंचा दिग्दर्शक झालो, तेव्हा मलाच त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायच्या आहेत, हे जाणवले. पण आमच्यामध्ये उत्तम केमेस्ट्री होती.

पत्रकारांशी संवाद साधताना या दोन्ही रंगकर्मींनी अभिनय, युवा पिढी, नव्या काळाची आव्हाने याविषयी मते व्यक्त केली. संहिता सशक्त असेल, तर नटाचे काम अर्धेअधिक सफल होते, असे ते म्हणाले. मी विचार करणारा अभिनेता नाही. मी समजून घेऊन मुक्तपणे सादरीकरणावर भर देतो, असे रावल म्हणाले. नसिरभाईंच्या अभिनयात सत्यता, सखोलता, कालातीतता आणि ऊर्जा यांचा प्रत्यय मला येतो, असेही ते म्हणाले. तर विचार आणि कृती एकत्रितपणे आविष्कृत व्हावी, असे नसिरभाईंनी सांगितले. परेश हा उत्कृष्ट अभिनेता आहे, हे मला खेल, फिराक यामधून लक्षात आले होते, असे नसिरभाई म्हणाले. डिजिटल युगात वावरणारी असली तरी युवा पिढीवर माझा प्रगाढ विश्वास आहे. रंगभूमीचे काही खरे नाही, हे वाक्य मी माझ्या लहानपणापासून ऐकत आलो आहे. आजही रंगभूमी जिवंत आहे आणि पुढेही राहील, असे ते म्हणाले.

अधिक वाचा  ‘पूर्णम’ करीत असलेले कार्य समाजभान जागृत करणारे

आनंद लागू म्हणाले, श्रीराम लागू यांच्या नावाने राष्ट्रीय नाट्य महोत्सव सुरू होणे, ही आनंददायी बाब आहे. नाटक किंवा रंगभूमी हा व्यक्तीला अधिकाधिक सुसंस्कृत करणारा घटक आहे, ही डाॅ. लागू यांची भूमिका होती. त्याचेच प्रतीक म्हणजे हा महोत्सव आहे.

नाट्य महोत्सवाचे संचालक प्रसाद वनारसे यांनी नाट्य महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. सेंटरचे सचिव राजेश देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. अमोल पालेकर,  दिलीप प्रभावळकर,  सतीश आळेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love