शिवसेनाप्रमुख ज्या मोजक्या लोकांच्या पायाला स्पर्श करत त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे होते- संजय राऊत


मुंबई -हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ज्या मोजक्या लोकांच्या पायाला स्पर्श करत त्यामध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे एक व्यक्तिमत्त्व होते. बाबासाहेब इतिहास सांगत होते आणि बाळासाहेब इतिहास घडवत होते, अशा भावपूर्ण शब्दांत शिवसेना खासदार, सामनाचे कार्यकारी संपादक असे संजय राऊत यांनी बाबासाहेब पुरंदरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातले आगळेवेगळे नाते उलगडून दाखविले आहे.

बाबासाहेबांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यावेळी त्यांनी बाबासाहेब आणि बाळासाहेबांच्या जिव्हाळ्याच्या नात्याच्या काही आठवणी सांगितल्या.

महाराष्ट्रामध्ये जो इतिहास लोकांपर्यंत पोहोचला नव्हता तो बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या वाणीतून, लेखणीतून आणि नाट्यकृतीमधून जगभरात पोहोचवला. बाबासाहेब पुरंदरे हे फक्त शिवशाहीर नव्हते तर महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनाचे एक अविभाज्य अंग होते. प्रत्येकाच्या कुटुंबात कोणत्या ना कोणत्या रुपाने त्यांना स्थान होते. शिवसेना परिवाराशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नसले तरी इतिहासाच्या पानापानांवर यापुढे आपल्याला आढळतील. इतिहास कसा सांगावा आणि कसा पोहोचवावा याचा ते आदर्श परिपाठ होते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महिला बचत गट सन्मान सोहळा

बाबासाहेब पुरंदरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाते जिव्हाळ्याचे होते. बाळासाहेब ज्या मोजक्या लोकांच्या पायाला स्पर्श करत त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे होते. अनेकदा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यासंदर्भात ते बाबासाहेबांसोबत चर्चा करत असत. दोघांनाही इतिहास घडवण्याचे वेड होते. बाबासाहेब इतिहास सांगत होते आणि बाळासाहेब त्याचा आधार घेऊन इतिहास घडवायचा प्रयत्न करत होते. दोघांमध्येही अतूट नाते होते. मातोश्रीवरुन जेव्हा बाळासाहेबांची अंत्ययात्रा निघाली आणि शिवाजी पार्क येथे पोहोचली तेव्हा एका इमारतीच्या खिडकीमध्ये बाबासाहेब उभे होते तेव्हा त्यांना भावनाविवश होऊन बाळासाहेबांना अभिवादन करताना आम्ही पाहिले आहे, असे भावपूर्ण उद्गार आहे संजय राऊत यांनी काढले आहेत.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love