गार्गी – मैत्रेयी, राणी चेन्नम्मा – लक्ष्मीबाई, संत बहिणाबाई – कान्होपात्रा यांच्यापासून सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी, कॅप्टन लक्ष्मी, कल्पना चावला, पी. टी. उषा अशा अनेकानेक महिलांनी शिक्षण, ज्ञान, विज्ञान, क्रीडा, पराक्रम, अध्यात्म आदी विविध क्षेत्रांमध्ये यापूर्वीच्या काळात भारताचा गौरव वृद्धिंगत केला आहे. भारतमातेच्या या वीरांगना अगणित आहेत. जागतिक महिला दिनानिमित्ताने त्यांचे स्मरण करीत वर्तमानात प्रेरणादायी कार्य करणाऱ्या असामान्य महिलांचा आपण परिचय करून घेऊ या...
धीरोदात्त मृण्मयी परळीकर
एखाद्या हिर्याला पैलू पाडल्यावर तो अधिक चमकू लागतो किंवा तो अधिक तेजस्वी होतो. असेच हिरे प्रत्येकाच्या कुटुंबात मुलांच्या रूपाने असतात. त्यांना अन्न, वस्त्र, निवारा पालकांच्या छत्राखाली मिळतच असतो. पण त्याही पेक्षा त्यांच्या आयुष्याला चांगले वळण देण्याची गरज असते. धैर्यवान, सामर्थ्यवान, निरोगी, नीतीमूल्ये आणि सामाजिक मूल्यांचे भान असणारी मुले घडविणे पालकांचे कर्तव्य असते. कुटुंबा बरोबरच शाळांमधून, महाविद्यालयातून आणि समाजात घडणार्य चांगल्या गोष्टीतून मुलांवर संस्कार होत असतात. अशाच वातावरणात घडलेली युवती स्वत: पुरता विचार न करता देश पातळीवर विचार करू लागते. आजची ही मुलूखावेगळं काम करणारी, आई आणि वडिलांनी सामाजिक संस्कारांनी घडविलेली मृण्मयी परळीकर ,साप्ताहिक विवेकच्या पाठ्यवृत्तीसाठी 370 कलम रद्द केल्यानंतरचा बदललेला कश्मीर अभ्यासण्यासाठी धाडस दाखविणारी मृण्मयी.
तिच्याशी बोलल्यावर दोनच वर्षापूर्वी पोस्ट ग्रॅजुएट होऊन बाहेर पडलेली राज्यशास्त्राची विद्यार्थिनी, असा देशपातळीवरचा, तोही एकेकाळी धगधगत्या असलेल्या, आजही अशांत असलेल्या कश्मीर बद्दल विचार करते याचे कौतुक वाटले.
नियंत्रण रेषेला लागून असलेल्या पाकिस्तानपासून ६ किलोमिटर वर असलेल्या ‘मच्छल’ एरियात जवानांना आणि लोकांना प्रेरणा देत उभा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ,कारगिल चे जवानांचे स्मृति स्थळ आणि सर्वात मोठा भारताचा तिरंगा बॉर्डरवर फडकताना पाहिला की तरुण मृण्मयी नतमस्तक होते. जवानांचे बलिदान बघून अश्रू ओघळू लागतात. हे बघत असताना मनात ज्या राष्ट्रीय भावना आलेल्या असतात त्यामुळे काश्मीर मध्ये जाऊनही गुलमर्ग वगैरे ठिकाणी जाऊन वेगळे निसर्ग सौंदर्य बघायला जायची मृण्मयीला गरज वाटत नाही. म्हणून ती आपल्या पेक्षा वेगळी आहे.
मृण्मयी ज्ञानप्रबोधिनित शिकली .तिने पुण्याच्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयात राज्यशात्र घेऊन २०२०ला मास्टर डिग्री घेतली आणि Teach for india साठी टिचिंग फेलो आणि फेलो अडव्हायजर म्हणून काम करते. Tree Foundation साठी पण २०१८ साली छत्तीसगड मध्ये जाऊन प्रोजेक्ट केला आहे. (Transformation through Research, Education & Empowerment) . अरुणाचल प्रदेशात जाऊन काम केलं. आणि ३७० कलम रद्द झाल्यानंतरचा काश्मीर प्रदेश त्या नंतर ३ वर्षानी काय बदलला आहे. कसा बदलला आहे हे जाणून घेण्यासाठी काश्मीर दौर्यावर गेली. सद्द स्थिति काय हे जाणून घ्यायला तिने तिथल्या आठवडाभराच्या वास्तव्यात विविध स्तरांतील व्यावसायिक, शेतकरी, कारागीर, युवक, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, विद्यार्थी, महिला, राजकारणी, सरपंच, शरणागत अतिरेकी, लष्करी अधिकारी ते या केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपालांपर्यंत अनेकांच्या भेटी घेतल्या. गप्पा मारल्या. वेगवेगळ्या प्रश्नांमधून त्यांच्या मनातल्या भावना, सल समजून घेण्याचा प्रयत्न केला.
मृण्मयी ज्या तरुणांना भेटली त्यातील रिसर्च करणारा एक तरुण म्हणाला ,इथल्या सतत सक्रिय असणार्या अतिरेकी संघटना ,त्यांना असलेला पाकिस्तानचा पाठिंबा आणि दीर्घ काळ कुठलाही ठोस कृतीकार्यक्रम नसल्याने तरुण वर्ग अतिरेकी कारवायांकडे आकर्षित झाला आहे. लहान मुलांना सुद्धा गन चालवून बघण्याचे आकर्षण आहे.ही अॅक्टिविस्ट तरुण मुलं सधन कुटुंबातली आहेत,कुणाला कलेक्टर व्हावस वाटती, कुणाला देशासाठी सैन्यात जावेसे वाटतेय, ती चांगल्या संधीच्या शोधात आहेत”असे आशादायक चित्र मृण्मयी ने अनुभवले.
मच्छल मध्ये मराठा रेजिमेंट काम करते तिथे शिवरायांचा पुतळा टीआर आहेच पण तिथे शिवजयंती उत्सव साजरा केलं जातो. मच्छल मेला भरतो, लष्कराच ढोल लेझीम पथक आहे. सीमा सुरक्षा या मुख्य कामा पलीकडे जाऊन, सर्व काश्मिरी लोकांना देशाच्या प्रवाहात आणण्यांचे जिवापाड प्रयत्न लष्कराचे जवान करतात.कलमं रद्द झाल्यानंतर आणखी एक बदल झालं की, आत्ता पर्यन्त अस्तीत्वात नसलेले पक्के रस्ते तिथे बांधले गेले. दळण वळणाची साधने निर्माण झाली.
मृण्मयी म्हणते, काश्मीर मध्ये शिक्षणाचा अभाव नाही तर राष्ट्रीय शिक्षणाचा अभाव आहे. प्रेरणा देणारी व्यक्तिमत्वे चंद्र शेखर आझाद ,स्वामी विवेकानंद, राणा प्रताप यांची चरित्रच तिथे माहिती नाहीत. त्यामुळे असे आदर्शच डोळ्यासमोर नाहीत. तिथे घडणार्य अतिरेकी कारवायांबद्दल तरुणांच्या मनात चीड आहे.
मृण्मयी जेंव्हा तिथल्या राज्यपालांना भेटते तेंव्हा “ही कलमं रद्द होणं आवश्यकच होतं. ती रद्द झाल्यामुळे राष्ट्राच्या मुख्य धारेत, मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत होते आहे. इथे लागू नसलेले जवळजवळ 180 कायदे थेट लागू झाले. त्यासाठी कोणतीही वेगळी प्रक्रिया करावी लागली नाही. पुढेही करावी लागणार नाही.
विकासासाठी, समृद्धीसाठी शांतता आवश्यक असते. इथे सतत दहशतीचं वातावरण. शांततेशिवाय प्रगती साधणार कशी? 370, 35 अ रद्द झाल्यामुळे इथे शांतता नांदू शकेल. आता काश्मिरी वेगळा न राहता भारताचा, या राष्ट्राचा, नागरिक म्हणून ओळख बळकट होईल आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी ते पूरक ठरेल.”असे कश्मीर च्या परिस्थितीचे आश्वासक बोल तिला ऐकायला मिळतात. आणि राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यावर तिथे राबवत असलेल्या अनेक योजनांची यादीच तिला ऐकायला मिळते. हीच तिथल्या बदलांची नांदी आहे असे मृण्मयी म्हणते. तिच्या संशोधक नजरेतून तिने आपल्या समोर काश्मीरचे वास्तव चित्रण उभे केले आहे.
चांगले शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या चांगल्या संधी सोडून सेवा वृत्तीने आणि जोखीम घेऊन काम करण्याची प्रेरणा मृण्मयीला तिच्या कुटुंबातून आणि शाळा महाविद्यालयातून मिळाली.. मुलीच्या जन्मापासून आयुष्यभरच तिला चांगल्या संधी देऊन ,चांगले लक्ष देऊन जडण घडण केली तर अशा अनेक ‘अचिव्हर’ तयार होतील असे वाटते .
– डॉ. नयना कासखेडीकर