पुणे- देशातील अनेक कंपन्यांना लस निर्मिती करता आली असती परंतु, दोनच कंपन्यांना लस निर्मितीची परवानगी किंवा अधिकार दिल्यामुळे मोनोपोली निर्माण करून लोकांच्या जीविताशी खेळण्याचे पाप केंद्र सरकार करते आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये केला. दरम्यान, इंग्रजांच्या काळात देखील ‘स्पॅनिश फ्ल्यू’ सारख्या महामारीमध्ये मोफत लस देण्यात आली होती. केंद्र सरकारने या देशाच्या दुश्मन देश असलेल्या पाकिस्तानला फुकट लस दिली परंतु, जनतेकडून पैसे घेत आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
आज (दि. 24 एप्रिल) नाना पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह पुण्याच्या विभागीय आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लस मोफत देण्याचे निवेदन दिले त्यानंतर ते बोलत होते.
पटोले म्हणाले, दर शंभर वर्षांनी कोरोना सारखी महामारी जगामध्ये येते. 1920 मध्ये स्पॅस्निश फ्ल्यू नावाचा आजार आला होता. त्यावेळी इंग्रजांचा काळ होता. इंग्रजांनी सुद्धा मोफत लसीकरण केले होते. त्यानंतर अनेक महामाऱ्या देशांमध्ये आल्या. पोलिओ सारख्या आजाराच्या लसीचे डोस मोफत आपण चौकाचौकात दिले. त्यामुळे कोविड महामारीच्या काळात केंद्राने देशाची जनता आपली आहे असे समजून सर्वांना सर्वांना मोफत लस उपलब्ध करून दिली पाहिजे अशी मागणी पटोले यांनी केली.