नृत्य, गायन व वादनाचा त्रिवेणी संगम असणारा ‘नुपूरनाद म्युझिक व डान्स फेस्टिव्हल’ येत्या ३० एप्रिल व १ मे रोजी

कला-संस्कृती पुणे-मुंबई
Spread the love

पुणे : भैरवी संगीत प्रसारक मंडळ यांच्या वतीने येत्या रविवार दि. ३० एप्रिल व सोमवार दि. १ मे रोजी नुपुरनाद म्युझिक व डान्स फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असून एरंडवणे डी पी रस्त्यावरील मॅजेंटा लॉन्स या ठिकाणी दोन्ही दिवस सायं ६ वाजता सदर महोत्सव संपन्न होणार असल्याची माहिती भैरवी संगीत प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध संतूरवादक डॉ. धनंजय दैठणकर यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. सदर महोत्सव हा सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर यासाठी प्रवेश देण्यात येईल असेही डॉ. दैठणकर यांनी सांगितले.

मंडळाच्या सचिव व सुप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना गुरु डॉ. स्वाती दैठणकर, सुप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना व अभिनेत्री नुपूर दैठणकर आणि तरुण पिढीचे आश्वासक संतूरवादक निनाद दैठणकर हे देखील या वेळी उपस्थित होते. यावर्षीच्या महोत्सवास डॉ डी वाय पाटील विद्यापीठाचे विशेष सहकार्य लाभले असून विद्यापीठातर्फे प्र-कुलगुरू डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. 

महोत्सवाबद्दल अधिक माहिती देताना डॉ. धनंजय दैठणकर म्हणाले, “सदर वर्ष हे महोत्सवाचे चौथे वर्ष असून दरवर्षी प्रमाणे यावर्षीच्याही महोत्सवात नृत्य, गायन व वादनाचा त्रिवेणी संगम रसिक प्रेक्षकांना अनुभविता येणार आहे. सुप्रसिद्ध मोहिनीअट्टम नृत्यांगना, नृत्यदिग्दर्शिका गुरु पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत महोत्सवाला सुरुवात होईल.”

एकाच कुटुंबातील आम्ही चौघेही जण कलाकार आहोत. पुणेकर व जगभरातील रसिक प्रेक्षकांनी आम्हाला भरपूर प्रेम दिले. नुपूरनाद महोत्सवाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुण्याबाहेरील कलाकारांची कला अनुभविता यावी या उद्देशाने आम्ही महोत्सवाचे आयोजन करीत आहोत. रसिकांकडून मिळालेले प्रेम, आदर त्यांना कलारुपाने समर्पित करण्याचा आमचा हा एक प्रयत्न असल्याचे गुरु डॉ. स्वाती दैठणकर यांनी आवर्जून नमूद केले. नजीकच्या भविष्यात महाराष्ट्रातील मुंबई, कोल्हापूर, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद यांसारख्या प्रमुख शहरांत नुपूरनाद म्युझिक व डान्स फेस्टिव्हल आयोजित करण्याचा आमचा मानस आहे, असेही त्यांनी सांगितले.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी (रविवार दि. ३० एप्रिल, २०२३) सायं ६ वाजता नुपूरनाद अकादमीच्या विद्यार्थिनी, गुरु डॉ. स्वाती दैठणकर आणि नुपूर दैठणकर यांच्या शिष्या आपल्या नृत्यप्रस्तुतीमधून गुरु पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांना आदरांजली वाहतील. यानंतर दिल्लीस्थित व जयपूर घराण्याच्या सुप्रसिद्ध कथक नर्तिका विधा लाल यांचे कथकनृत्य सादर होईल.

विधा लाल या संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध कथक गुरु गीतांजली लाल यांच्या शिष्या व स्नुषा आहेत. यानंतर किशोरी आमोणकर यांचे शिष्य आणि जयपूर घराण्याचे सुप्रसिद्ध गायक रघुनंदन पणशीकर यांचे गायन होईल. त्यानंतर पं जितेंद्र अभिषेकी यांचे पुत्र व शिष्य शौनक अभिषेकी यांचे गायन होणार आहे. दोघांच्या एकल गायनानंतर जुगलबंदी असा कार्यक्रम यावेळी ते सादर करतील. रघुनंदन पणशीकर व शौनक अभिषेकी अशा प्रकारे पहिल्यांदाच एकत्र गायन करणार आहेत हे विशेष.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात (सोमवार दि. १ मे) सायं ६ वाजता आर्या आंबेकर आणि सहकारी यांच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमाने होईल. कृष्णलीलेवर आधारित सुगम संगीतातील  रचना यावेळी त्या सादर करतील. यानंतर सुप्रसिद्ध संतूरवादक डॉ. धनंजय दैठणकर व त्यांचे शिष्य व सुपुत्र निनाद दैठणकर यांचा संतूर सहवादनाचा अनोखा प्रयोग होईल. डॉ. धनंजय दैठणकर हे पद्मविभूषण पं शिवकुमार शर्मा यांचे ज्येष्ठ शिष्य आहेत. यावेळी उस्ताद अल्लारखां आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचे शिष्य असलेले आदित्य कल्याणपूर हे त्यांना तबलासाथ करतील. दुसऱ्या दिवसाचा आणि महोत्सवाचा समारोप बंगळूरूस्थित भरतनाट्यम नर्तक पार्श्वनाथ उपाध्ये यांच्या सादरीकरणाने होईल. संगीत नाटक अकादमीच्या बिस्मिल्ला खान युवा पुरस्काराने सन्मानित पार्श्वनाथ उपाध्ये हे आपल्या ‘मार्गम्‘ या नृत्य कार्यक्रमाचा प्रीमियर यावेळी पुणेकर रसिकांसमोर प्रस्तुत करणार आहेत.

पद्मविषण पं शिवकुमार शर्मा यांच्या संतूरवादनाने नुपूरनाद म्युझिक व डान्स फेस्टिव्हलच्या पहिल्या महोत्सवाला सुरुवात झाली होती त्यानंतर आजवर देश विदेशातील अनेक प्रख्यात कलाकारांनी या महोत्सवात आपली कला सादर केली असून यामध्ये पद्मश्री पं उल्हास कशाळकर, तालयोगी पद्मश्री पं सुरेश तळवलकर, प्रवीण गोडखिंडी, जयतीर्थ मेवुंडी, पद्मभूषण अलारमेल वल्ली, पद्मश्री मालविका सरूक्कई, रुक्मिणी विजयकुमार, राहुल शर्मा, पद्मश्री व्यंकटेश कुमार, पं संजीव अभ्यंकर यांचा समावेश आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *