नवी दिल्ली – भारत देशाने सर्व नागरिकांच्या मदतीने भारतातील कोरोना महामारी, संकटाचा सामना व व्यवस्थापन युरोपीय देशांपेक्षा अधिक कार्यक्षम आणि यशस्वी रितीने केले. यासंबंधाने भारताने जगासमोर प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा रोल मॉडेल म्हणून एक उत्तम उदाहरण ठेवले आहे. असे गौरवोद्गार विज्ञान तंत्रज्ञान व पंतप्रधान कार्यालयाचे (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह (Dr. jitendra Sinha) यांनी काढले.
जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (Jawaharlal Nehru University), राष्ट्रीय सेवा भारती आणि पुणे स्थित स्पार्क या संस्थेच्या संयुक्त विद्ममाने ‘डिझास्टर रेझिलिएंट मेथडॉलॉजीज फॉर पॅन्डेमिक’ (Disaster Resilient Methodologies for Pandemic) या विषयावर एका राष्ट्रीय परिषदचे आयोजन बुधवारी (१२ ) रोजी करण्यात आले. या परिषदेच्या उद्घाटन सत्रात डॉ. जितेंद्र सिंग बोलत होते. दिल्ली स्थित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कनव्हेशन सेंटरमध्ये या एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय परिषदेसाठी १४ पेक्षा अधिक राज्यांमधून तिनशेहून अधिक संशोधक, अभ्यासक व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ. जितेंद्र सिंग, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या कुलगुरू प्रा. शांतिश्री पंडित, राष्ट्रीय सेवा भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष पन्नालाल भन्साळी, नॅशनल इन्स्टियट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट दिल्लीचे संचालक व प्रकल्प प्रमुख डॉ. अनिल गुप्ता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती पुणे महानगराचे तुकाराम नाईक, क्रस्ना डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. पल्लवी जैन, स्पार्कचे संचालक महेश पोहनेरकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रमुख पाहुण्यांसह इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी कोविड असिस्टन्स रिसर्च डॉक्युमेंटेशन (CARE) प्रकल्पाच्या केस स्टडी बुकचे प्रकाशनही करण्यात आले. या पुस्तकात पश्चिम महाराष्ट्रात विविध सामाजिक संस्थांनी कोरोना व त्यानंतरच्या काळात केलेल्या मदत कार्याचा समाजशास्त्रीय पद्धतीने अभ्यास व त्यापासून झालेल्या सकारात्मक परिणामांचा संशोधनपर अभ्यास मांडण्यात आला आहे.
पुढे बोलताना डॉ. सिंह म्हणाले की, कोरोना साथीच्या रोगाने विद्यार्थ्यांमध्ये जैवतंत्रज्ञान हे संशोधन आणि विकासाचे क्षेत्र म्हणून पाठपुरावा करण्याची जिज्ञासा निर्माण केली आहे. त्यांनी नंतर युवा सहभागींनी राष्ट्र उभारणीत योगदान देण्यावर भर द्यावा असा आवाहनही त्यांनी केले.
त्याआधी डॉ. शांतीश्री पंडित यांनी जेएनयूविद्यापीठाने नेहमीच एक मजबूत राष्ट्र निर्माण करण्यासाठी काम केले आहे याविषयी विवेचन केले. जनकल्याण समितीचे तुकाराम नाईक यांनी आपत्तीच्या काळात जनकल्याण समितीचे अधिकारी आणि स्वयंसेवकांनी दिलेल्या प्रभावी मदत कार्याची माहिती दिली. तर डॉ. पल्लवी जैन यांनी कृस्ना डायग्नोस्टिक्सने महामारीच्या काळात आलेल्या अनुभवांबची मांडणी केली. व कंपनीने कोरोना काळात शासनासोबत मिळून राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. प्राजक्ता परकाळे हिने कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
दिवसभर दोन सत्रांमध्ये झालेल्या या परिषदेत विविध आव्हानांच्या काळात पुरेशा मदत कार्यासाठी करावयाची तयारी, अशा मदत कार्यात समाजाचा सहभाग व कोरोना महामारीच्या निमित्ताने आलेल्या अनुभव व यशस्वी मदत कार्याची चर्चा व भविष्यात अशा संकटांचा कसा सामना केला जावा यासंबंधाने अभ्यासक, संशोधक आपली अभ्यासपूर्ण मते मांडली. ज्यामध्ये डॉ. युनिसेफच्या डॉ. वीना बंदोपाध्याय, एम्सचे संचालक डॉ. संजय राय, पीपीसीआरचे संचालक मनोज पोचट आदींचा समावेश होता.