पुणे(प्रतिनिधी)—पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सिरम इन्स्टिटयूटला भेट दिल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली. सिरम इन्स्टिट्यूट तयार करीत असलेली कोव्हीशिल्ड लस सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत आणि प्रथम भारतात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान प्रत्येक महिन्याला 4 ते 5 कोटी डोसची निर्मिती केली जात आहे.कोव्हीशिल्ड लस पूर्ण सुरक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या लसीमुळे 70 टक्के नागरिकांना रुग्णालयाची गरज पडणार नाही असेही यावेळी पूनावाला यांनी संगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) येथील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लस विकास, उत्पादन, वितरण, साठवण आणि व्यवस्थापन प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. सायरस पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला, कार्यकारी संचालक नताशा पुनावाला, शास्त्रज्ञ तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मोदी दिल्लीला रवाना झाल्यानंतर आदर पूनावाला यांनी पत्रकार परिषद घेतली. ते काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पूनावाला म्हणाले,पंतप्रधान मोदी यांच्याशी आम्ही अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात केली आहे.त्यांना कोव्हीशिल्ड लसीच्या उत्पादन प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. पंतप्रधान लसीच्या पूर्ण प्रक्रिया व तयारीबाबत समाधानी आहे.
कोरोनावरील कोव्हीशिल्ड लसीच्या तिसऱ्या चाचणीवर आमचे लक्ष आहे.लोकांपर्यंत लस पोहचवण्यासाठी तयारी केली जात आहे. जुलै 2021 ते 2021 पर्यंत 30 ते 40 कोटी डोस उपलब्ध केले जाणार आहे. लसीची किंमत सर्वसामान्य नागरिकांना परवडेल आणि ती सर्वांना उपलब्ध करून दिली जाणार आहे असेही पूनावाला म्हणाले.